कार्यकर्त्यांनी केलेले शक्तिप्रदर्शन पडणार महागात
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात (Nagpur Bank scam) आरोपी ठरलेले काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. सुरुवातीला त्यांना आरोपी ठरवल्यानंतर पाच वर्षांची शिक्षा आणि साडेबारा लाख रुपयांचा दंड कोर्टाने सुनावला. यानंतर तब्येतीचे कारण सांगत त्यांनी रुग्णालयात थांबण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथल्या डॉक्टरांनीच ते व्यवस्थित असल्याचे सांगत त्यांची रवानगी तुरुंगात केली. त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आली. यानंतर सुनील केदारांच्या जामीनालाही राज्य सरकारने कडाडून विरोध केला होता. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले. अखेर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला, पण त्यानंतरही सुनील केदार यांच्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीत.
सुनील केदार यांना जामीन मिळाल्यानंतर काल कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. यावेळेस कारागृहातून बाहेर पडताना पोलिसांची परवानगी नसताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले शक्तिप्रदर्शन सुनील केदार यांना चांगलंच महागात पडणार आहे. कारण, पोलिसांनी या सर्व प्रकरणात वाहतुकीत अडथळा आणल्याप्रकरणी सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांवर बुधवारी रात्री धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काल कारागृहापासून नागपूरचे संविधान चौकापर्यंत सुनील केदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली होती. विशेष म्हणजे काही अटी आणि शर्तीवर केदार यांना जामीन मिळाला होता, त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे केदार यांच्या अडचणी वाढणार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआरमध्ये गंभीर गोष्टींची देखील नोंद केली आहे.
एफआयआर मध्ये कोणत्या गोष्टींची नोंद?
नागपूर सेंट्रल जेलमध्ये अनेक जहाल नक्षलवादी आणि काही दहशतवादी कैदेत आहे. असे असतानाही सुनील केदार यांची काल जेलमधून सुटका होताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जेलच्या समोरील परिसरात गर्दी केली होती. एक दिवस आधीच सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी गर्दी करण्यात येऊ नये अशी सूचना पोलिसांनी दिली होती. तरी देखील गर्दीकरून घोषणाबाजी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जेल परिसर संवेदनशील असून, त्या ठिकाणी असे कृत्य करण्यात येऊ नये असे सांगूनही केदारांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी करत घोषणाबाजी केली असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. केदार जेलमधून बाहेर येताच कारच्या सनरूफमधून बाहेर निघून कार्यकर्त्यांना जेल समोरच अभिवादन करत होते. त्या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी त्यांची कार थांबून त्यांना हार घातले. असा सर्व तपशील पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवला आहे.
वाहनांच्या नंबरचा एफआयआरमध्ये उल्लेख…
एवढेच नाही तर कालच्या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या २० पेक्षा जास्त चारचाकी वाहनांचे नंबरही पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे. या गाड्यांचा तपशील पोलीस शोधत असून, पोलिसांना शंका आहे की या सर्व गाड्या विविध बेकायदेशीर कृत्यांमध्ये लागलेल्या माफीयांशी संबंधित असू शकतात. त्यामुळे पोलिसांच्या तापसानंतर सुनील केदार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.