
निकालाच्या निकषांनुसार राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतीत अजित पवारांचीच बाजू वरचढ
मुंबई : शिवसेनेतील (Shivsena) पक्षफुटीनंतर गेले दीड वर्ष ज्याची वाट पाहिली, तो आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification) निकाल काल लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अनेक महिने अभ्यास केल्यानंतर निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने लावला. कोणत्याही बाजूचे आमदार अपात्र ठरवण्यात आले नाहीत. मात्र, शिंदेंची शिवसेना खरी आहे असे नमूद करण्यात आले. निकाल लावताना विधीमंडळातील बहुमताचा विचार करण्यात आला, जे अर्थातच शिंदेच्या शिवसेनेकडे होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) बाबतीतही सारखीच घटना घटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यांच्यातील पक्षफुटीनंतर आता सुनावणी पार पडत आहे. या प्रकरणातही बहुमताचा विचार करण्यात आला आणि कालच्या निकालाप्रमाणेच सर्व निकष लावण्यात आले तर सर्वच बाबींमध्ये अजित पवारांची (Ajit Pawar) बाजू भक्कम असल्याचे दिसते. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाची धाकधूक वाढली आहे.
अजित पवारांचीच बाजू वरचढ
जर विधीमंडळात बहुमताचा आधार घेण्यात आला असेल तर अजित पवारांची बाजू वरचढ ठरते. राष्ट्रवादीच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४० हून अधिक आमदार हे अजित पवारांकडे आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष जर राष्ट्रवादी कुणाची यावर निकाल देणार असतील आणि शिवसेनेप्रमाणे त्यांनी जर बहुमताचा आधार घेतला तर अजित पवारांच्याच बाजूने निकाल लागण्याची शक्यता जास्त आहे.
व्हिपसंदर्भात कसा होऊ शकतो निर्णय?
बहुमताप्रमाणेच पक्षाच्या व्हिपसंदर्भातही राहुल नार्वेकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांचा व्हिप त्यांनी ग्राह्य धरला नाही. त्यांनी शिंदे गटाचा व्हिप योग्य असल्याचं सांगत भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली. याचा फायदा अजित पवार गटाला होण्याची शक्यता आहे. शिवसेनेप्रमाणे न्याय लावला तर शरद पवार गटाचे व्हिप जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती चुकीची ठरवली जाईल आणि अजित पवार गटाचे व्हिप अनिल पाटील यांची निवड योग्य ठरवली जाईल. व्हिपच्या बाबतीत अजित पवार गटाची बाजू अजून स्पष्ट आणि वरचढ आहे. कारण अनिल पाटील हे राष्ट्रवादीच्या फुटीच्या आधीही व्हिप होते. अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनिल पाटील हे त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना व्हिपचा निर्णय घ्यायला अजून सोपं होणार आहे.
आमदार मात्र अपात्र ठरण्याची शक्यता कमी
राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवण्यास नकार दिला. त्यांनी दोन्ही बाजूंकडील याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र केलं नाही. त्याच प्रमाणे जर त्यांनी राष्ट्रवादीबाबत निर्णय घेतला तर शरद पवार असो वा अजित पवार गट असो, दोन्ही बाजूकडील आमदार अपात्र ठरणार नाहीत.