
हिंगोलीत भीषण अपघात
हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, एका दुचाकीच्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये हा अपघात घडला. काल रात्रीच ही अपघाताची घटना घडली, मात्र या ठिकाणी जास्त रहदारी नसल्याने त्यांना रात्री कोणाचीही मदत मिळाली नाही आणि सकाळी हा अपघात उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण वाणी गावावर शोककळा पसरली आहे. आकाश कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव अशी मयत व्यक्तींची नावे आहेत.
हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातील रहिवासी असलेले आकाश जाधव हे काल सायंकाळी आपल्या आई कलावती जाधव आणि वडील कुंडलिक जाधव यांना घेऊन वैद्यकीय कामानिमित्त रुग्णालयात निघाले होते. दरम्यान, अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे डिग्रस वाणी गावाच्या शिवारात त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. या अपघातामध्ये आकाश जाधव यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलीस दाखल...
डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याची माहिती अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना देऊन, मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी गर्दी केली.