Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीकाऊंटडाऊन सुरू : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज निकाल

काऊंटडाऊन सुरू : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज निकाल

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी निकाल लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी ४ वाजता हा निकाल देणार आहेत. जून २०२२ पासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात होते. त्यानंतर मे २०२३ पासून हे प्रकरण विधानसभा अध्यक्षाच्या कक्षेत आले. तेव्हापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. दरम्यान या निकालामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आतापासूनच सुरू झाल्या आहेत.

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. अशातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. आपण कायद्याच्या चौकटीत काम केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच सोळा आमदारांमध्ये असलेले बुलढाणाचे संजय गायकवाड यांनीही निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘उद्याचा निकाल हा आमच्याच बाजूने असेल. कोणीही काहीही म्हणो मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष, चिन्ह दिले आहे. आमच्याकडे ४०आमदारांचे बहुमत आहे.

निकालापूर्वी राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीला उद्धव ठाकरेंचा आक्षेप, थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

जर न्यायमूर्ती (राहुल नार्वेकर) आरोपीला जाऊन भेटत असतील तर आम्ही त्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी? असा सवाल उद्धव ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेत उबाठा गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

हा खटला आहे ते देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही? हे ठरवणारा निकाल असणार आहे. गेले दोन वर्ष त्यावर चर्चा, सुनावणी, उलट तपासणी सुरू आहे. गेल्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळेत निकाल लावावा असं म्हटलं होतं. ३१ डिसेंबर तारीख दिली होती. ज्याप्रमाणे सुनावणी सुरू होती तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की वेळकाढूपणा करत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्या दहा जानेवराली 11:59 पर्यंत वेळ खेचतील मग निकाल देतील असं वाटतं, असेही ठाकरे म्हणाले. लवाद म्हणून अध्यक्ष महोदय दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले आहेत. याचा अर्थ होतो की आरोपीच न्यायाधिशाला जाऊन भेटले. ते मुख्यमंत्र्यांना तसं भेटले तर हरकत नाही पण खटला सुरू असताना ते भेटले. आरोपीला घरी जाऊन भेटणार असतील तर कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत तुम्ही ऐकायला हवी, ते सांगत आहेत की किती वेळ काढला जात आहे. लोकशाहीचा खून यामुळे होतोय की काय अशी परिस्थिती आहे. त्यात ते उघड उघड भेटत आहेत.आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की तुमच्या डोळ्यादेखत हे घडत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या भेटीवर नार्वेकर म्हणाले, ठाकरे माजी मुख्यमंत्री, त्यांना कल्पना हवी!

“असे आरोप केवळ दबाव टाकण्यासाठी केले जात आहेत. मुख्यमंत्री यांना अध्यक्ष कोणत्या कामासाठी भेटू शकतात याची कल्पना माजी मुख्यमंत्री यांना असायला हवी असे माझं मत आहे. तरी ते का आरोप करत आहेत यामागील हेतू स्पष्ट होतो. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाची कामं असतात. मुख्यमंत्र्यांच्यासोबत माझी बैठक 3 तारखेला नियोजित होती. पण मला कोरोना इन्फल्यूयेनजाची लागण झाली त्यामुळे मी भेटू शकलो नाही. कुलाबाच्या ब्रिजबाबत चर्चा करायची होती. दक्षिण मुंबईतील आठ रस्त्याचा मुद्दा होता. हे सर्व विषय घेऊन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

विधिमंडळातील कंत्राटी कामगार याबाबत भेट होती. जे स्वतः माजी मुख्यमंत्री होते, ज्यांना विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्याची माहिती आहे त्यांनी असे आरोप करणे चुकीचे आहे. आज मी व्हीआयपी लाँजमध्ये अनिल देसाई आणि जयंत पाटील यांना भेटलो. ती काय राजकीय भेट होती का? मी अनेकदा अनेकांना भेटतो ती काय राजकीय भेट असते का? मी त्यांना भेटू नये असा अर्थ होतो का, असे प्रश्न राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -