फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे
झपाट्याने बदलत चाललेली कुटुंब व्यवस्था, बिघडलेली सामाजिक रचना, विभक्त होण्याकडे वाढलेला कल, महिलांमध्ये असणाऱ्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या फालतू कल्पना, जोडीदाराकडून केल्या जाणाऱ्या आवाजावी अपेक्षा, संपुष्टात येत चाललेली साधी समाधानी प्रवृत्ती आणि आपण कामावते आहोत, सुशिक्षित आहोत याची धुंदी, त्यामुळे वाढत चाललेले पती-पत्नीमधील घटस्फोट आजमितीला सगळ्यांसाठी मोठं आव्हान आहे. अनेक आणि कल्पनेपलीकडील कारणे या वाढत्या घटस्फोटामागे असतात.
छोट्या-छोट्या किरकोळ वाद-विवादामुळे, घरोघरी होणाऱ्या कलहामुळे, पती-पत्नींमधील समजूतदारपणा आणि संवादाचा अभाव माहेरील लोकांचा प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप यामुळे फक्त पुरुषच नाही, तर महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात घटस्फोट घेण्याला प्राधान्य देताना दिसतात. या लेखात आपण पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत, त्यांच बाहेर अफेअर आहे, त्याने बाई ठेवली आहे, त्याने एखाद्या बाईला घरात आणून ठेवलं आहे, तो एखाद्या महिलेकडे राहायला गेला आहे, तो बायकांवर पैसे उडवित आहे, तो सतत लफडी करतोय, म्हणून फारकत घेऊन वेगळे होणे ही भूमिका अनेक महिलांची असते.
घटस्फोट घेतल्यावर पुढे काय? मुलं असल्यास त्यांचं काय? आपलं भवितव्य काय? आपल्या आई-वडिलांना काय वाटेल, माहेरील कुटुंबात यांचे काय पडसाद उमटतील? सासरचे कितपत आपल्या नवऱ्याच्या अशा वागणुकीला जबाबदार आहेत? त्याच्या अनैतिक संबंधास सासरचे पाठिंबा देत आहे का? त्याला पाठीशी घालत आहेत का? यावर विचार करणे आवश्यक आहे. सासरच्या लोकांचा अजिबात दोष नसेल, तर नाहक त्यांना आपण घटस्फोट घेतल्यास किती मनस्ताप होईल हा दूरचा सखोल विचार अनेक महिला करताना दिसत नाहीत.
आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत म्हणून त्याला सोडून द्यायचे, वेगळे व्हायचे, त्याच्यापासून कायमचे लांब जायचे या निर्णयातून नेमक काय साध्य होणार आहे, याचा सर्वांगीण विचार होणे आवश्यक आहे. आपल्या नवऱ्याने चुकीचं पाऊल उचललं, तो भरकटला, त्याने प्रतरणा केली, धोका दिला, आपला विश्वासघात केला, आपल्या भावनांशी तो खेळला म्हणून तो आपल्या मनातून उतरला हे शंभर टक्के खरे आहे. कोणतीही स्त्री आपला नवरा कोणासोबत वाटून घेऊ शकत नाही. नवरा जेव्हा परस्त्रीशी संबंध ठेवतो तेव्हा पत्नीचा आत्मसन्मान, मान, तीच स्थान सगळंच डळमळीत होत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
नवरा त्याच्या अशा चुकीच्या वागणुकीमुळे आपल्याला मनस्ताप देतोय, आपली मानसिकता बिघडते आहे, आपली भावनिक पिळवणूक होते आहे, सहनशीलता संपली आहे, हे बरोबर आहे. मात्र पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत म्हणून त्याच्यापासून कायदेशीर मार्गाने विभक्त होण्याआधी बायकोने काही गोष्टींवर सखोल विचार करणे अपेक्षित आहे.
सर्वप्रथम तर आपण स्वतः कुठे कमी पडलो आहोत का? ज्यामुळे आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटते आहे? आपल्यातील, आपल्या स्वभावातील वागण्या-बोलण्यातील अशा कोणत्या गोष्टी, सवयी अथवा अवगुण आहेत किंवा आपण त्याचा संसार करायला कुठे कमी पडलो आहोत, त्याच्या कोणत्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलेलो नाही, यावर आत्मपरीक्षण जरूर करावे. आपल्या बाजूने आपल्याला कोणत्याही स्वरूपाची चूक जाणवत असेल, तर ती उणीव भरून काढण्याचा पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न करावा.
आपल्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा जर नवऱ्याला दुसऱ्याच स्त्रीमध्ये स्वारस्य वाटतं असेल, तरीही तातडीने फारकत घेण्याचा निर्णय न घेता त्याला स्वतःला बदलण्याची संधी आणि वेळ जरूर द्यावा. एकत्र राहून ते करणे शक्य होत नसेल, खूप मानसिक तणाव येत असेल, तर काही कालावधीसाठी लांब राहून पण आपण परिस्थिती बदलण्याची वाट पाहू शकतो. आपल्या सासरचे नातेवाईक, नवऱ्याची मित्रमंडळी जर पूर्णपणे तुमच्या बाजूने असतील, तर परिस्थिती बदलणे खूप सोपं आहे. त्यामुळे धीर धरणे, थोडी वाट पाहणे, संयम ठेवणे गरजेचे आहे.
नवऱ्याच्या आयुष्यात आलेली दुसरी स्त्री कोणत्या हेतूने त्याच्या जवळ आली आहे, हे समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. जेव्हा कोणतीही महिला एखाद्या विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवते, मूल-बाळ असलेल्या माणसाशी प्रेमप्रकरण करते तेव्हा हे लक्षात घ्यावे की चूक फक्त आपल्या नवऱ्याची नाही, तर समोरील स्त्रीने तिचे वैयक्तिक हेतू, स्वार्थ, फायदा यासाठी देखील त्याला प्रेमाच्या, शारीरिक सुखाच्या जाळ्यात ओढलेले असू शकते. सर्वसामान्यपणे विवाहित पुरुषाच्या आयुष्यात आलेल्या बहुतांश स्त्रिया या स्वतः घटस्फोटित, पतीचे निधन झालेल्या, अविवाहित अथवा स्वतःच्या पतीपासून विभक्त असलेल्या असतात, असे जाणवते. त्यामुळे आपण पण याच स्त्रियांच्या समूहात स्वतःला नेवून ठेवायचे की आपला संसार सावरण्यासाठी अशा स्त्रियांकडे दुर्लक्ष करायचे, ते आपण ठरवायचे असते.
आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात आलेली कोणतीही परकी महिला कधीही कायमस्वरूपी त्याच्या आयुष्यात राहणारी नसते, कारण त्यांचे संबंध फक्त एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी निर्माण झालेले असतात. शारीरिक आकर्षण तसेच एकमेकांचा वापर करणे हा अशा नात्यांचा केंद्रबिंदू असतो. आपण बायको म्हणून जे कर्तव्य अथवा जबाबदारी पार पाडू शकतो आणि जे कायदेशीर अधिकार पत्नीला असतात, ते कोणत्याही परक्या स्त्रीला नसतात. त्यामुळे आपले वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, कायदेशीर सर्व हक्क आबाधित ठेवणे आपल्याच हातात असते. नवऱ्याच्या आयुष्यातील दुसरी स्त्री फक्त त्याची प्रेयसी असते, तिचे आपल्या घरातील इतर कोणाशीच काही लागेबांधे नसतात, तर बायको ही सासरच्या कोणाची तरी सून, कोणाची तरी मामी, काकी, भावजय, जाऊ, वाहिनी अशा अनेक नात्यांत गुंतलेली असते.
नवऱ्याचे अफेअर आहे म्हणून घटस्फोटचा निर्णय घेण्याआधी नवऱ्याच्या, त्याच्या घराच्या इतर जमेच्या बाजू पण लक्षात घेणे आवश्यक आहे. इतर काही बाबतीत जर आपला नवरा योग्य असेल, परिपूर्ण असेल, सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारा असेल, कर्तृत्ववान असेल, त्याचे आर्थिक व्यवहार, नोकरी, व्यवसाय इत्यादींमध्ये तो यशस्वी असेल, आपल्याला व आपल्या मुलांना आर्थिक स्थिरता देणारा, सुरक्षा देणारा असेल, निर्व्यसनी असेल, पत्नी म्हणून आपला आदर करणारा, आपल्यावर प्रेम करणारा, आपल्याला सुख-दुःखात साथ देणारा, आपली काळजी घेणारा असेल, तर केवळ तो दुसऱ्या कोणत्या स्त्रीमध्ये काही कालावधीसाठी गुंतला किंवा त्याच्याकडून असे संबंध ठेवण्याची चूक झाली म्हणून त्याला कायमच दूर लोटणं अयोग्य आहे. त्यामुळे नवरा कोणामध्ये गुंतला म्हणून तो गुंता सोडवायला घटस्फोट हाच एक पर्याय नाही. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे आपण म्हणतो, त्यामुळे नवऱ्याला सांभाळून घेणे, सावरणे, त्याला माफ करणे, झालं गेलं विसरून परत संसाराला लागणे, नक्कीच शक्य आहे.
कायदा, पोलीस प्रशासन नक्कीच तुमच्या पाठिशी आहेत, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आहेत. आपले कोणतेच प्रयत्न यशस्वी होत नसतील, नवऱ्याकडून कोणताही सकारात्मक बदल त्याच्या वागणुकीत केला जात नसेल, तर मग गांभीर्याने विचार करून कायद्याचा आधार नक्कीच घ्या. अनेक महिला पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणारा मानसिक आघात, मनस्ताप याला कंटाळून आजही आत्महत्या करताना दिसतात. नवऱ्याच्या सासरच्या त्रासाला कंटाळून फक्त स्वतःचे जीवन न संपविता आपल्या मुलाबाळांना घेऊन अनेक महिला मृत्यूला कवटाळतात. इतकी टोकाची भूमिका पण महिलांनी अजिबात घेऊ नये. आपल्या बाजूने शक्य ते सर्व प्रयत्न करून पण परिस्थिती सुधरत नसेल, तर अशा भावनाशून्य व्यक्तीसाठी आपले आयुष्य संपविण्यात काहीच अर्थ नाही.