Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकपंतप्रधान मोदींच्या नियोजित दौऱ्यातील कार्यक्रमांची यादी ऐनवेळी वाढल्याने प्रशासकीय यंत्रणांची धावपळ

पंतप्रधान मोदींच्या नियोजित दौऱ्यातील कार्यक्रमांची यादी ऐनवेळी वाढल्याने प्रशासकीय यंत्रणांची धावपळ

गोदाघाट चमकू लागला, मातीही उचलण्याला प्राधान्य, जुने पडक्या वाड्यांवर कापडाचे आच्छादन

सत्यजीत शाह

पंचवटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये शुक्रवारी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी आल्यानंतर दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीची पूजा, महाआरती आणि श्री काळाराम मंदिरात दर्शन आणि पूजा करून महाआरती करणार आहेत. मोदींच्या अशा अचानक लांबलेल्या दौऱ्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. तसेच, गोदाघाटासह परिसर सुंदर दिसावा या हेतूने अतिक्रमण काढून परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी भिंतीचित्रे काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत. निलगिरी बाग ते तपोवनापर्यंत रोडशो होणार आहे. त्यानंतर ते थेट रामकुंड येथे येणार असून रामकुंड येथे गोदावरी नदीची पूजा करून गोदावरीची महाआरती करणार आहेत. तसेच, यानंतर जगप्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन पूजा करून आरती करणार आहेत. अशाप्रकारे मोदींच्या पूर्व नियोजित कार्यक्रमात अचानक वाढीव बदल झाल्यामुळे जिल्हा प्रशासन डोळ्यात तेल घालून कामाला लागलेली दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवार दि. १० रोजी सकाळी पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, राजू पाचोरकर, विजय ढमाळ, रणजित नलवडे यांच्यासह सर्व युनिटचे अधिकारी, स्कॉडचे अधिकारी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांसह बैठक घेत सुरक्षा आणि बंदोबस्ताचा आढावा घेतला.

चोख बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली असल्याने बाहेर गावावरून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था मंगल कार्यालय, मनपाचे हॉल याठिकाणी करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोदावरी आरती, पूजेसाठी १० मिनिटे आणि श्री काळाराम मंदिरात पूजा आणि महाआरतीसाठी २५ मिनिटे थांबणार आहेत. यासाठी एसपीजी स्कॉडने संपूर्ण परिसराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात येणार असल्याने मंदिराच्या बाहेर असलेल्या इमारती, वाडे यांच्या भिंतींवर चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडून रामायणातील आणि प्रभू रामचंद्रांची चित्रे काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने, परिसरातील पडक्या वाड्यांच्या आणि मोकळ्या असलेल्या भिंती आता चांगली धार्मिक चित्रे जागा घेऊ लागल्याने संपूर्ण परिसर नाविन्यपूर्ण दिसायला लागला आहे. एक चैतन्याचे वातावरण निर्माण होऊ घातले आहे.

संपूर्ण पंचवटी परिसराची अवस्था अत्यंत बिकट झालेली असून त्यात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने ती काढण्यासाठी मनपा अतिक्रमण विभागाची धावपळ उडाली आहे. तर संपूर्ण गोदाघाट परिसरात झालेले अतिक्रमण काढणे देखील डोकेदुखी ठरणार आहे. त्यात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने अनेक अडचणी निर्माण झालेल्या दिसत आहे.

पंतप्रधान मोदी काळारामाचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याने या परिसरातील अतिक्रमण करून उभारलेल्या टपऱ्या, दुकाने अतिक्रमण निर्मूलन विभागाने काढून घेण्याच्या सूचना दिल्याने व्यावसायिकांनी आपली दुकाने हटवून परिसर मोकळा केला आहे. तसेच परिसरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. संपूर्ण गोदाघाट परिसरात स्वच्छता कर्मचारी कचरा संकलन करून रस्त्याच्या कडेला साचलेली माती देखील उचलून घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर चकाचक होणार असल्याचे चित्र प्रथमच नाशिककरांना पहायला मिळत आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाढलेल्या दौऱ्यामुळे संपूर्ण गोदाघाट परिसरासह पंचवटी परिसरात ठिकठिकाणी मनपाचे अधिकारी पाहणी करत सूचना देताना दिसत आहेत. गोदाघाट परिसरात अनेक धोकादायक पडके वाडे असल्याने त्याची पाहणी करून योग्य प्रकारे कापड लावून झाकण्यात येणार आहेत. तसेच अजून कुठे काही कमतरता राहू नये यासाठी देखिल अधिकारीवर्ग बारकाईने काम करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -