पोस्टाने पत्र रवाना, मूळ गुन्हेगारांना अभय देणार की फौजदारी करणार
नाशिक : ‘गोंधळी की झाड गल्ली १२?’ या मथळ्याखाली ‘दै. प्रहार’ने जिल्हा शासकीय रुग्णालयातील बनावट जात प्रमाणपत्राचा गोंधळ आणि त्याची चौकशी करताना जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलेली पत्रचाराची पतंगबाजी निदर्शनास आणली होती. या वृत्ताची शाई सुकते ना सुकते तोच “त्या” कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात आणण्यासंदर्भातले जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सहीचे पत्र पोस्टाने त्याच्या घरी पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.
मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या त्या महिला कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार? त्या महिला कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्तीनंतर मिळवलेले कथित जात प्रमाणपत्र कुठल्या सक्षम अधिकाऱ्याने दिले? ते खोटे होते म्हणून त्या वारस कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात आणली जात असेल तर ते प्रमाणपत्र सादर करणारी सेवा निवृत्त महिला कर्मचारी, प्रमाणपत्र देणारे सक्षम अधिकारी, ते जात प्रमाणपत्र स्वीकारून वारसाला नोकरी देऊ करणारे तत्कालीन प्रशासन अधिकारी, क्लार्क यांच्यावर कारवाई होणार का? हा गंभीर प्रकार असल्याने, बनावट दस्त तयार करणे, शासनाची दिशाभूल करणे, फसवणूक करणे आदी गंभीर कलमाखाली फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होईल का? आदी प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. त्या कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात आणून या प्रकरणावर पडदा टाकीत इतर दोषींना वाचविता येणार नाही, अशा प्रतिक्रिया आता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वर्तुळात ऐकायला मिळत आहेत.