कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील (uddhav thackeray group) एका तालुकाध्यक्षाने एक लाखाला तीन लाख रुपये बनवून नोटा छापून देण्याचा प्रकार सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीत शिवसेना ठाकरे गटाचा कागल तालुका अध्यक्ष अशोक बापू पाटील (वय ५१, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल) हा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यासह मेहरूम अल्ताफ सरकवास (वय ४१) ही महिला आणि सलील रफिक सय्यद (वय ३०, दोघे रा. घटप्रभा, जि. बेळगाव, कर्नाटक) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख रोख आणि नोटा छपाईचे साहित्य असा दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच या तिघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
संशयित अशोक पाटील हा कर्जबाजारी आणि आर्थिक गरजवंतांना हेरुन कर्नाटकातील साथीदारांच्या मदतीने तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.