
वायकरांशी संबंधित आणखी सात ठिकाणांवर ईडीची छापेमारी
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून जोगेश्वरी (Jogeshwari) येथील भूखंडासंबंधी चर्चेत असलेलं प्रकरण लवकरच निकालात निघणार आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) कचाट्यात सापडणार आहेत. रवींद्र वायकर यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापेमारी (ED raids) केली. ऐन निवडणुकीच्या ठाकरे गटाचा आणखी एक प्रमुख नेता अडचणीत सापडल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने रवींद्र वायकर यांच्या घरी धाड टाकली. आज सकाळी सात वाजल्यापासून ही छापेमारी सुरू होती. ईडीच्या १० ते १२ जणांच्या पथकाने त्यांच्या घरी झाडाझडती सुरू केली. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह वायकरांशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, काही कागदपत्रं मिळतात का? याची चाचपणी केली जात आहे.
जोगेश्वरी भागात मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलं व त्याची परवानगी त्यांनी पालिकेकडून घेतली नव्हती, असा आरोप त्यांच्यावर आहे. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला होता. सप्टेंबर महिन्यात या प्रकरणी कारवाई करत ईडीने वायकरांसह त्यांची पत्नी व इतर सहा संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पुढील कारवाई करत ईडीने वायकर यांच्याविरोधात केस दाखल केली. आता ईडीच्या छापेमारीतून काय पुढे येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.