
अयोध्या : देशभरातील हिंदू (Hindu) ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना (Ram Mandir inauguration) होणार आहे. एखाद्या सणाप्रमाणे हा क्षण साजरा करण्यासाठी सर्व हिंदू तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता गर्भवती मातांनाही (Pregnant women) आपल्या पोटी राम जन्मावा, २२ जानेवारी रोजी रामलल्लासोबतच आपल्या बाळाचाही जन्म व्हावा, अशी इच्छा आहे. त्यासाठी अयोध्येतील प्रसूती रुग्णालयांमध्ये २२ जानेवारीला शस्त्रक्रियेसाठी अनेक जोडप्यांकडून अर्ज दाखल होत आहेत.
ज्या महिलांची प्रसूती तारीख २२ जानेवारीच्या जवळपास आहे, अशा महिलांनी २२ जानेवारीलाच आपल्या बाळाचा जन्म व्हावा, अशी विनंती करणारे अर्ज करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, २२ जानेवारीलाच प्रसुती होणे नैसर्गिकरित्या शक्य नाही. त्यासाठी सिझेरियन पद्धतीने शस्त्रक्रियाच करावी लागणार आहे. मात्र, या शस्त्रक्रियेसाठीही तयार असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे इतर वेळी दिवसातून जास्तीत जास्त १४ ते १५ सिझेरियन शस्त्रक्रिया करणार्या रुग्णालयाने २२ जानेवारी रोजी तब्बल ३५ शस्त्रक्रियांचे नियोजन केले आहे.
कानपूर सरकारी रुग्णालयातील विभागप्रमुख डॉ. सीमा द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रुग्णालयाच्या लेबर रूममध्ये आम्हाला रोज १४-१५ दाम्पत्यांकडून २२ जानेवारीलाच डिलिव्हरी व्हावी, असे अर्ज येत आहेत. अशा स्थितीत सामान्य पद्धतीने प्रसूती होणं निव्वळ अशक्य आहे. आम्ही त्यांना यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल, हे समजावून सांगितलं आहे. अनेकदा आम्हाला पालकांकडून अशा प्रकारच्या विनंती येतात. काही पालक तर त्यांना कुणीतरी सांगितलेल्या मुहूर्तावरच बाळाचा जन्म व्हावा यासाठी मागे लागतात. अशा वेळी मुदतपूर्व प्रसूतीमधून निर्माण होणाऱ्या अडचणींकडेही दुर्लक्ष करण्याची त्यांची तयारी असते”, असं द्विवेदी यांनी नमूद केलं.
आम्ही १०० वर्षांपासून राम मंदिराची वाट पाहात आहोत
दरम्यान, काही गर्भवती महिलांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. “रामलल्लांच्या आगमनाच्या दिवशीच आमच्या बाळाचा जन्म व्हावा अशी आमची इच्छा आहे. गेल्या १०० वर्षांपासून आम्ही राम मंदिराची वाट पाहात आहोत. आमच्या बाळाचं या जगात आगमन होण्यासाठी हा एक खूप सुदैवी योग असेल”, अशी प्रतिक्रिया एका गर्भवती महिलेने दिली आहे.