
नवी दिल्ली : क्रिकेट विश्वचषकात (Cricket Worldcup) आपल्या तुफान गोलंदाजीने ज्याने भल्याभल्या खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवले तो भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला (Mohammad Shami) आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे आज खेलरत्न पुरस्कारांच्या वितरणाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यात क्रिकेट विश्वात भारताचे नाव उंचावल्यामुळे मोहम्मद शामीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
नुकत्याच झालेल्या विश्वचषकात मोहम्मद शामी याने सर्वांनाच प्रभावित केले होते. दुखापत असतानाही मोहम्मद शामी याने दमदार कामगिरी केली होती. त्याच्यासह २६ जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन) आणि रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन) यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
शामीने यावर्षी भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली होती. शामी पहिल्या ४ सामन्यात खेळू शकला नाही. यानंतर संधी मिळताच त्याने कहर केला. शामीने स्पर्धेत ७ सामने खेळले, ज्यात त्याने सर्वाधिक २४ विकेट घेतल्या. शामीने विश्वचषकात ५.२६ च्या सरासरीने या विकेट घेतल्या. मात्र, भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
शामी म्हणाला की, "हा पुरस्कार मिळाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण अख्खं आयुष्य निघून गेलं तरी पुरस्कार मिळत नाही. पण आज पुरस्कार मिळतोय, यामुळे अभिमान वाटतो आहे. यापेक्षा मोठा आनंद दुसरा असूच शकत नाही", अशा भावना त्याने व्यक्त केल्या.