
विरोधकांनी विरोध केलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना दिल्याने त्यांना पोटशूळ उठला आहे
विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
मुंबई : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांच्या घरी धाड टाकली. आज सकाळी सात वाजल्यापासून ही छापेमारी (ED raid) सुरू होती. यावर विरोधकांनी आकसापोटी ही कारवाई केली असल्याची टीका केली. त्यांच्या या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘कर नाही त्याला डर कशाला? जे काय असेल ते दूध का दूध, पानी का पानी होईल’ असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “रवींद्र वायकरांवर ईडीने टाकलेल्या धाडीची मला माहिती नाही. मी माहिती घेतो. पण ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? ज्यांची काही चूक नसेल, ज्यांना कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे? कोणत्याही प्रकारच्या सूड भावनेने राजकीय आकस ठेवून आमचं सरकार कोणतंही काम करणार नाही”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
विरोधकांना पोटशूळ उठला आहे
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, “कोविडमध्ये त्यांनी किती पैसे खाल्ले हे सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं रेकॉर्डवर आहे. मग आम्ही त्यांना काय म्हणायचं? कफन चोर म्हणायचं की खिचडी चोर म्हणायचं? पुराव्याशिवाय आरोप करू नये. कुणालाही घाबरण्याची काय गरज आहे? जे काय असेल ते दूध का दूध, पानी का पानी होईल. आम्ही आकसापोटी कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्याला पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत. विरोधकांनी विरोध केलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देतोय. त्यामुळेच त्यांना पोटशूळ उठला आहे”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
वायकर यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापेमारी
जोगेश्वरी भागात मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलं व त्याची परवानगी त्यांनी पालिकेकडून घेतली नव्हती, असा आरोप त्यांच्यावर आहे. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला होता. या प्रकरणी रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह वायकरांशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली.