आशेची सोनेरी किरणे…

Share

स्वाती पेशवे

नव वर्षातील सुरुवातीचे दिवस नवतेचे स्वागत करण्याचे, त्या आनंदात बुडून जाण्याचे असतात. सध्या आपण सगळेच ते अनुभवित आहोत. त्यातच हिंदूंचे अस्मिता केंद्र असणारे भव्य राम मंदिर उभे राहत असून, लवकरच त्यात रामलल्ला विराजमान होत असल्यामुळे आता उत्साह शिगेला पोहोचला आहे. या उत्सवापाठोपाठ देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतील. अशा अनेक घटना या वर्षाला वेढून टाकणाऱ्या ठरतील.

नवीन वर्षाच्या स्वागताचा सूर अजूनही कानात गुंजत आहे. आणखी काही दिवस नववर्षाची नवलाई अनुभविण्यात, त्याची मजा घेण्यात जातील. या सगळ्यातून मिळणारा आनंद अपूर्व असतो. नवतेचे सहर्ष स्वागत करण्याची माणसाची प्रवृत्तीच त्याला देखणे भविष्यचित्र रेखण्यास प्रेरित करीत असते. आताही तेच चित्र पाहायला मिळत आहे. हे वर्ष तर नानाविध घटनांनी गजबजलेले राहणार आहे. एकीकडे आत्तापासूनच घराघरात राम मंदिराच्या घंटेचे ध्वनी येऊ लागली आहे. हिंदूंच्या अस्मितेचे केंद्रस्थान असणारे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मंदिर उभे राहण्याचा आणि त्यात रामलल्लाची विधिवत स्थापना होण्याचा दिवस जवळ येत असताना हा उल्हास नववर्षाच्या आनंदाला उधाण आणणारा असेल, हे निश्चित. या देखण्या सोहळ्यानंतर देश लोकशाहीच्या उत्सव तयारीला लागेल. आगामी लोकसभा निवडणूक तसेच राज्यातील विधानसभा निवडणूक या दोन मोठ्या घटना आपल्याला व्यग्र आणि व्यस्त ठेवतील. देशात आणि राज्यात नवीन सरकारने कार्यभार सांभाळेपर्यंतच हे वर्षही मावळतेकडे कललेले असेल. या वर्षात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पुढील पाच वर्षांतील देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारण आदींची दिशा ठरविणाऱ्या असतील. एकंदरच हा संपूर्ण काळ धावपळीचाच असेल, पण त्यामुळे २०२४ ‘हॅपनिंग’ असेल.

या सगळ्यातून काही तरी चांगलेच घडणार आहे. शेवटी त्या आशेवरच आपण जगत असतो. चांगले घडण्याची आस असते, नूतनाचा ध्यास असतो, म्हणूनच मानवाला प्रत्येक क्षण, मिनिट, तास, दिवस, आठवडा आणि मास या घड्यांमध्ये लपेटलेल्या प्रत्येक नववर्षाचे कौतुक असते. एवढा प्रचंड पसारा सांभाळत आपली धरा या तेजस्वी ताऱ्याभोवती एक रिंगण घेते तेव्हा तिच्यासवे आपणही नकळत भास्कराशी एका अदृश्य धाग्याने वेढले जातो. हे धागे एकमेकांना जोडले जातात तेव्हाच आपल्या आयुष्याची दोरी लांबते, बळकट होते. सरत्या वर्षासवे अस्तित्वाभोवती गुंडाळले जाणारे हे धागे आपल्याला समृद्ध करीत असतात. या धाग्यांमध्ये मानसन्मान, आदर, कीर्ती-संपत्तीचे मोती ओवले जातात आणि आयुष्याचा साज सजत राहतो. नवे वर्ष ही सामोरी येणारी एक रम्य वाट असते. हिरवळीने व्यापलेली, नवलाईने सजलेली… एका अंतरावरून पाहताना त्यातील कुठलेच खाचखळगे दिसत नसतात. कुठले वळण धोक्याचे, कुठले अपघाती, कुठले सुखाच्या बेटावर नेणारे, कुठले काट्यांची बोचऱ्या जखमा देणारे… काही म्हणजे काही कळत नसते. एखादा लहानगा जीव निरागस-निर्व्याज मनाने तसेच दृष्टीने समोरच्या नव्या खेळण्याकडे पाहतो, तीच निरागसता नव्या वर्षाकडे पाहतानाही असते. नावीन्याचा तोच ध्यास, नवे काही हाती लागल्याचा तोच आनंद प्रत्येक वेळी खुणावत असतो. म्हणूनच नववर्षाचे स्वागत करताना प्रत्येकाच्या मनात कुठे तरी दूरवर जाऊन लपलेला तो लहानगा जीव आपले अस्तित्व दाखवितो. वय, पद, हुद्दा सगळे बाजूला पडते आणि पावले नवतेच्या तालावर नकळत ठेका धरतात.

वर्षे येतात आणि जातात, पण नवतेचा उल्हास कणभरही कमी होत नाही. उलटपक्षी, वाढतच जातो. नवीन वर्षाचे स्वागत करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण प्रत्येकाच्या मनातील भावना मात्र तीच असते. त्यात काहीच अंतर नसते. सरत्या वर्षात होरपळलेला कोणी जीव आता तरी सुखद शिडकावा अनुभवायला मिळेल, या अपेक्षेने नव्या वर्षाचे स्वागत करतो. सरत्या वर्षात आनंदवर्षावात भिजलेल्यांना ओढ असते आणखी चिंब होण्याची. कोणाला इच्छा असते प्रेमाचा शोध पूर्ण करण्याची, तर कोणाला यशप्राप्तीची. कोणी या नवीन वर्षाकडे लक्ष्मीचा दूत म्हणून बघत असतो, तर कोणाला समाधान आणि शांतीचा सांगावा घेऊन आलेल्या नववर्षाला कवटाळण्याची घाई असते. म्हणजेच प्रत्येकाला या ३६५ दिवसांकडून काही ना काही मिळवायचे असते. त्यांच्यासाठी नववर्ष हे दाता असते. बाळाने मूठ घट्ट झाकून घ्यावी आणि त्यात चिमूटभर काळी माती मिळाली तरी ती भविष्याची पायाभरणी करणारी आहे, असे समजून समाधान पावावे इतकी भाबडी आशा असते आपली… ही आशा असेपर्यंत प्रत्येक वर्षाचे स्वागत अगदी जल्लोषात होणार यात शंका नाही.

आज आपल्याला सगळे काही मिळतेय. खरे सांगायचे तर हवे ते सगळे मिळविणे आणि सहजतेने मिळाले नाही तर ओरबाडून घेणे बरेच जण शिकले आहेत. हे ‘कौशल्य’ आपण आत्मसात केले आहे. हवे ते मिळविण्याचे अनेक बरे-वाईट मार्ग आहेत आणि गरज पडेल तसे ते वापरणे ही आजची कार्यशैली आहे. सरळ मार्गाने तूप मिळत नसेल तर बोट वाकडे करावे लागते, हे आपल्याला परिस्थितीने आणि अनुभवाने दाखवून दिले आहे. पण इतके असूनही आपल्याला मिळत नाही तो वेळ. सगळे काही मिळवायला शिकलेला माणूस अद्याप तरी वेळेला आपला गुलाम बनविण्याइतका सक्षम झालेला नाही. म्हणूनच त्याला अप्रूप आहे ते या काळाचे. सर्वांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडणाऱ्या माणसाला वेळेच्या तालावर नाचण्याशिवाय पर्याय नाही. सुख उपभोगण्यासाठी वेळ हाती हवा, जीवनाचा भरभरून आनंद लुटायचा तर वेळ हवा, खूप काही कमवायचे तर वेळ हवा… अन्यथा, कशाचाच उपयोग नाही. हाती वेळ असेल तर प्रश्नपत्रिकेतील राहिलेले अवघड प्रश्न सुटतील आणि चांगले गुण मिळतील, असा आत्मविश्वास असतो. पण वेळच हाती नसेल तर? या ‘तर’ची भीती सतावते, म्हणूनच येऊ घातलेल्या क्षणांच्या स्वागताचा दिमाख वाढतो. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करणारा प्रत्येक जीव कालचक्राबरोबर धावण्याची क्षमता मिळावी आणि टिकून राहावी ही भावना व्यक्त करतो ते यामुळेच. ही आसक्ती या उत्सवाचा एक महत्त्वाचा पैलू आहे, असे म्हणायला हरकत नाही.

नवे वर्ष म्हणजे नवा खेळ. डाव मांडला नसेल तर मांडायचा, मांडलेला डाव पूर्ण करायचा, बिघडलेला डाव सावरायचा आणि जिंकण्यासाठी जोमाने प्रयत्न करायचा इतके हे साधे गणित. आलेले नवीन वर्ष प्रत्येकालाच ही संधी देते. खेळातले काही सवंगडी निघून गेले असले, तरी खेळाच्या प्रत्येक टप्प्यावर नवे काही मिळण्याची शक्यता असतेच. पूर्वीच्या चुकांपासून धडा घेतल्याने खेळ सहजी खिशात घालण्याची ऊर्मी असते. म्हणूनच हा सारीपाट रंजक ठरतो. फासे पडतात कसे आणि चाल घ्यायची कशी याचे ठोकताळे बांधतच सज्जता होते या खेळाची. या खेळाची नशाच काही वेगळी. काळ नामक महापुरुष फासे टाकत राहतो आणि आपण त्यापाठी धावत राहतो. काळाबरोबर धावतो, नेमकी चाल घेतो तो विजयी ठरतो. काळाची पुढची चाल लक्षात घेऊन कृती करतो तो द्रष्टा ठरतो. बदलत्या काळाबरोबर प्रतिस्पर्ध्यांचीही चाल ओळखतो तो अजिंक्य ठरतो. या सगळ्यात मागे पडतो तो मात्र अपयशी ठरतो. कुठल्याही अपयशावर मात करता येते, पण काळाकडून पदरी पडलेले अपयश तुम्हाला प्रवाहापासून दूर लोटते. म्हणूनच आपली क्षमता, योग्यता, पात्रता लक्षात घेऊनच या स्पर्धेत उतरलेले चांगले.

आपल्याला स्पर्धेचा टप्पा ठरविण्याचे स्वातंत्र्य आहे. किती वेगाने धावायचे हे ठरविण्याचा अधिकार आहे. वेगाला लगाम घालण्याचा, त्यावर आरूढ होण्याचा प्रयत्न केला तर दमछाक, ऊरफोड ही ठरलेलीच. कारण त्याची ऊर्जा चिरंतन आहे, अथांग आहे. आपल्या अपूर्व संचयातून क्षणांच्या पखाली ओतायच्या हे त्याचे काम आणि त्यातील मोती वेचायचे हे आपले कर्म. तेव्हा प्रत्येक क्षण हातात पकडायची मनीषा कशाला बाळगावी? कितीही प्रयत्न केला तरी रेतीचे सगळे कण हातात सामावणे नाही आणि त्याची गरजही नाही, कारण त्यातील मोजके सोनेरी कणही संपूर्ण आयुष्याला नवी झळाळी देण्यासाठी पुरेसे असतात. सोन्याच्या चीपाच नव्हे, तर इवलासा वर्खही आपली जादू दाखवून जातो. म्हणूनच जमेल तोवर कालपुरुषाची साथ करावी. एक आनंदयात्रा अनुभवावी आणि एका वळणावर हलकेच त्याचा हात सोडून सुंदरशा विसाव्यापाशी थांबावे. दुरून काळाची पुढे जाणारी वळणे न्याहाळणे हेदेखील खूप सुखद असू शकते. हे थांबणे, असा विसावा घेणे आपल्या शिणलेल्या मनाला नवऊर्जा देणारे ठरू शकते. कदाचित इथेच जगाशी स्पर्धा संपून आपली स्वत:चीच स्पर्धा सुरू होते. हा स्व:त्वाची ओळख होण्याचा काळ ठरू शकतो. कदाचित हा विसावा स्वत:शी संवाद साधण्याची संधी देऊन जाऊ शकतो. म्हणूनच एकीकडे बाहेरच्या कोलाहलाचा अदमास घेत पावले टाकताना, प्रवासात वेग घेताना स्वत:साठी जगण्याची संधीही साधायला हवी, कारण हे जगणेच अधिक सुंदर असेल.

Recent Posts

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

32 minutes ago

Beautiful Anklets : चांदीच्या अँकलेटचे सुंदर ८ डिझाईन्स पहा!

महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…

45 minutes ago

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

59 minutes ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

60 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

2 hours ago