आसामचे पर्यटन मंत्री जयंत मल्ल बरुआ यांनी दिली माहिती; इतर विकास योजनांचाही घेतला आढावा
दिसपूर : देशभरात रामभक्तांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे (Ram Mandir inauguration) वेध लागले आहेत. २२ जानेवारील रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गेली कित्येक वर्षे ज्या राम मंदिरासाठी हिंदूंनी (Hindu) आपलं रक्त सांडलं त्या राम मंदिराचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या दिमाखदार सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या (Ayodhya) नगरी सज्ज झाली आहे. या महत्त्वाच्या दिवशी आपल्या हातून कोणतंही कुकर्म होऊ नये, यासाठी आसाम सरकारने (Assam government) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आसाममध्ये २२ जानेवारी हा दिवस ‘ड्राय डे’ (Dry day) म्हणून घोषित करण्यात आला आहे.
‘ड्राय डे’ म्हणजेच, या दिवशी राज्यात दारूची दुकानं (Wine shops) बंद राहणार आहेत. संपूर्ण राज्यात २२ जानेवारीला दारूविक्री बंदी असेल. हा नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आसामचे पर्यटन मंत्री जयंत मल्ल बरुआ (Jayanta Malla Baruah) यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं की, “मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राम मंदिर उद्घाटनानिमित्त राज्यात कोरडा दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
उद्योजक महिलांसाठी आसाम सरकारचं मोठं पाऊल
जयंत मल्ला बरुआ म्हणाले, “या बैठकीत, मंत्रिमंडळानं मिसिंग, राभा हसोंग आणि तिवा समुदायांचे आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार वाढवण्यासाठी तीन विकास परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिषदांसाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाईल. या व्यतिरिक्त, या बैठकीत बचत गट अंतर्गत नोंदणीकृत महिलांसाठी सध्याच्या योजनेअंतर्गत आर्थिक पॅकेज मंजूर करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. उद्योजक महिलांना त्यांच्या उपक्रमासाठी ही मदत होईल. राज्यातील सुमारे ४९ लाख महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.”, अशी माहिती बरुआ यांनी दिली.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय
“४ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) च्या व्याप्तीचा विस्तार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. एवढंच नाही तर या लोकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचा आरोग्य विमाही मिळणार आहे. पूर्वी हे लोक यासाठी पात्र नव्हते कारण ते सरकारी कर्मचारी होते.”, असंही जयंत मल्ला बरुआ यांनी सांगितलं.