Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीयुवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकची जागतिक स्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकची जागतिक स्तरावर ब्रॅण्डिंग करण्याची संधी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्यापूर्व तयारीचा घेतला आढावा

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक शहरात 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याचा सांस्कृतिक पंरपरा व नाशिक जिल्ह्याची जागतिक स्तरावर ब्रँण्डिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्या संधीचे आपण सर्वांनी सोने करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आज तपोवन मैदान येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन स्थळाची पाहणी करून महोत्सवाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सुहास कांदे, ॲड. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास धिवसे, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

तपोवन मैदानावर होणार मुख्य कार्यक्रम :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, नाशिक येथे होणाऱ्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सावाच्या अनुषंगाने मुख्य उद्घाटन कार्यक्रम हा तपोवन मैदान येथे होणार असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजन संदर्भात बैठका घेण्यात आल्या आहेत. या महोत्सवाच्या आयोजनासाठी 20 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या मॅस्कट व लोगोचेही अनावरण करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी देशातील विविध देशभरातून जवळपास 8 हजार युवा सहभागी होणार आहेत. त्यांच्या निवास व खानपान व्यवस्थेमध्ये कोणतीही उणीव राहणार नाही, याबाबत काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. हनुमाननगर येथील सुविचार स्पर्धा, युवा संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. महाकवी कालिदास कलामंदीर येथे सांघिक लोकनृत्य, वैयक्तिक लोकगीत व वक्तृत्व स्पर्धा तर महात्मा फुले कलादालनात छायाचित्र स्पर्धा होणार आहे. गंगापुर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात सांघिक लोकगीत व वैयक्तिक लोकगीत आणि उदोजी महाराज म्युझियम येथे यंग कलाकार शिबीर, पोस्टर मेकिंग व कथा लेखन असे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास नारिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

नाशिकचे ब्रँडींग :-

तरूणाईला एक मोठा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न या युवा महोत्सवाच्या माध्यमातून केला जाणार आहे. महोत्सवासाठी शहराचे ब्रँण्डीग करण्यासाठी अनेक उपक्रमांसह शहरात ठिकठिकाणी सजावटीचेही नियोजन करण्यात आले असून स्थानिक युवकांच्या सहभागातून वॉल पेंटीग, लाईटिंग करण्यात येणार आहे. यासोबतच शहरातील स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनही यादृष्टीने उत्तम तयारी करत असून सर्वच यंत्रणांच्या प्रयत्नातून हा युवा महोत्सव अविस्मरणीय होईल, यात शंका नाही, असा विश्वास ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला.
यावेळी विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी युवा महोत्सव यशस्वी होण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. तर युवा महोत्सवात आयोजित कार्यक्रमांच्या तयारीची माहिती क्रीडा आयुक्त यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -