Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Ram Kadam : प्रभू रामाची चेष्टा सुरू असताना उद्धव ठाकरे, संजय राऊत गप्प का?

Ram Kadam : प्रभू रामाची चेष्टा सुरू असताना उद्धव ठाकरे, संजय राऊत गप्प का?

कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा? मर्दुमकी? की तुम्हांला शिवरायांचा विसर पडला?


आव्हाडांच्या वक्तव्यानंतर राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा


मुंबई : देशभरात सध्या राम मंदिराच्या उद्घाटनाविषयीचा (Ram Mandir Inauguration) उत्साह आहे. सणाप्रमाणेच हा प्रसंग साजरा करण्यात येणार आहे. देशभरातून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याच्या केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तर आव्हाडांच्या पक्षातील नेत्यांनी देखील त्यांना घरचा आहेर दिला. भाजपा नेते राम कदम (Ram Kadam) यांनी आव्हाडांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हे वातावरण शांत होत नाही तोच आता राम कदम यांनी उद्धव ठाकरेंनाही (Uddhav Thackeray) या वादात खेचले आहे. प्रभू रामाची चेष्टा सुरू असताना उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) गप्प का? असा संतप्त सवाल राम कदम यांनी केला आहे.


राम कदम यांनी या संदर्भात थेट उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी आपणांस हे पत्र एक हिंदू म्हणून लिहितो आहे, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही. आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आहात. आपल्या घटक पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाला मांसाहारी असे म्हटले. त्यांच्या या रामभक्तांच्या भावना दुखावणाऱ्या विधानावरून देशभर आक्रोश सुरु झाला. अनेक आंदोलने, निदर्शने झाली. संपूर्ण हिंदू समाज पेटून उठला. त्यानंतर त्यांनी माफी मागावी ही अपेक्षा होती. मात्र त्यांनी माफी न मागता उलट प्रभू राम आणि सीता मदिरा पण करत होते, अशी प्रभू रामाची चेष्टा करणारे काही कागद दाखवून अजून तीव्र भावना भडकविण्याचा प्रयत्न केला.


पुढे राम कदम यांनी म्हटले आहे की, आज देशभरातील समस्त संत साधू समाज, करोडो करोडो रामभक्त आश्चर्य व्यक्त करत आहेत की आपण अथवा आपले प्रवक्ते संजय राऊत गप्प का? स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आव्हाडांवर तुटून पडले. त्यांनी दाखवून दिले की तेच खरे स्वर्गीय बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आहेत. मात्र तुम्ही थंड बसलात, का? कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा? मर्दूमकी? का विसर पडला तुम्हांला शिवरायांचा? हा तर प्रचंड गंभीर विषय आहे. समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा गांभीर्याने घेण्याचा विषय असताना सुद्धा आपण मौन का? हा कैक कोटी मिलियन डॉलरचा महत्वपूर्ण प्रश्न हिंदू समाजाला पडला आहे.



महाभारताप्रमाणे घरबसल्या माहिती पुरवायला संजय आहेच!


भगवान रामाची आव्हाडांनी केलेली चेष्टा तुम्हांला मान्य आहे का? आणि नसेल तर आपण अजून पर्यंत खंडन का केले नाही? प्रत्येक भाषणात अथवा चर्चेत सुद्धा तुमचा आवडता शब्द.. मर्द... मर्द... किमान २५ वेळा उच्चारल्याशिवाय, किंवा तुमच्या भाषेत किंबहुना, कोथळा, कडे कपारी, महाराष्ट्र धर्म, कोठे दडलीय ही शब्द संपदा? त्यामुळे आपण रामभक्तांसोबत आहात की आव्हाडांचे समर्थन करता हे देशभरातील संत साधू समाज आणि हिंदू समाजाला कळले पाहिजे. अन्यथा आपले मौन हे स्पष्ट करेल की आपणास हिंदू धर्माशी काहीही देणे घेणे नाही. आणि होय वेळ मिळाला तर जरूर फेसबुकवर देशभरातील साधू संत आणि हिंदू समाज आपल्या मौन असण्याबाबत काय बोलतो आहे ते जरूर पाहा. नाही तर संजय आहेतच तुम्हाला घरं बसल्या सर्व सांगण्यासाठी. महाभारतातील व्यवस्था आजही आपल्या कडे आहे. समस्त हिंदूना आपल्या उत्तरांची अपेक्षा केवळ शाब्दिक कोट्याची नाही, अशा तीव्र शब्दांत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या मौन असण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment