Saturday, June 21, 2025

Theatre and Cinema : नववर्ष नाट्य आणि सिनेप्रेमींसाठी ठरणार महागडं!

Theatre and Cinema : नववर्ष नाट्य आणि सिनेप्रेमींसाठी ठरणार महागडं!

कर दरांत होणार वाढ


मुंबई : महाराष्ट्राला नाटक (Plays) आणि चित्रपटांचा (Movies) मोठा वारसा आहे. मराठी रंगभूमीला (Marathi rangbhoomi) प्रदीर्घ असा इतिहास आहे. भारतात पहिला चित्रपटही दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) या मराठी माणसानेच तयार केला होता. मात्र, त्याच मराठी नाटक आणि सिनेमाला फारसा प्रेक्षकवर्ग नसणं ही शोकांतिका आहे. अनेकदा तिकीटांचे दर हे याचं कारण सांगितलं जातं. नाटक पाहण्याची इच्छा असूनही तिकीट परवडत नसल्याने लोक हा खर्च टाळतात. पण आधीच तिकीट परवडत नसताना आता नवीन वर्षात तिकीट आणखी महागणार असल्याने आता प्रेक्षकांना मोठा फटका बसणार आहे.


गेल्या १३ वर्षांपासून मुंबई महापालिकेने रंगभूमी करात वाढ केलेली नाही, पण आता पालिका या करात वाढ करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला आहे. तसेच हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.


या प्रस्तावानुसार वातानुकूलित चित्रपटगृहांतील प्रत्येक प्रयोगाचे ६० वरुन २०० रुपये, तर विनावातानुकूलित चित्रपटगृहांसाठी प्रत्येक शोचे कर हे ४५ वरुन ९० रुपये होणार आहेत. तर नाटकांच्या प्रत्येक प्रयोगावरील २५ रुपये कर १०० रुपये होण्याची शक्यता आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपासून सिंगल स्क्रीनच्या तुलनेत अद्ययावत मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता १३ वर्षानंतर पालिका या करात वाढ करण्याचा विचार करत आहे.

Comments
Add Comment