
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी सर्वच राज्यांना थंडीचा तडाखा (Winter season) बसला आहे. इतर वर्षांच्या तुलनेत यावेळेस मुंबईतही (Mumbai) तापमान प्रचंड कमी झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना अखेरीस थंडी अनुभवायला मिळत आहे. तर दुसरीकडे उत्तरेकडील राज्ये पार गारठली आहेत. दिल्लीमध्ये वाढती थंडी आणि धुक्यामुळे पाचव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील पाच दिवस सुट्टी घोषित करण्यात आली आहे. दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी याबाबत माहिती दिली.
दिल्लीच्या शिक्षण मंत्रालयाने काल शनिवारी दिलेल्या सूचनेनुसार शाळांच्या सुट्ट्या १० जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्या होत्या. मात्र या आदेशात त्रुटी असल्याचं सांगत काल रात्री हा आदेश मागे घेण्यात आला. त्यानंतर आता सोमवारी शाळा सुरू होणार अशी चिन्हं दिसत होती. आतिशी यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार आता सोमवारपासून केवळ सहावीपासून पुढचे वर्ग सुरू होणार आहेत. पाचवीपर्यंतच्या वर्गांना आणखी पाच दिवस सुट्टी असणार आहे.
दिल्लीमध्ये सध्या थंडीची लाट आली असून, पुढील काही दिवस दाट धुकं राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच दिल्ली परिसरात हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात येतो आहे. या सर्व शक्यतांमुळे दिल्लीमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.