
पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येप्रकरणात पुणे क्राईम ब्रांचने ८ आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींना पुण्याच्या जवळील शिरवळ येथून ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून ३ पिस्टोल, ३ मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे तसेच २ चारचाकी गाड्याही जप्त करण्यात आल्या.
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यातील कोथरूड येथे दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरलं. जमीन आणि पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Gangster Sharad Mohol murder case: Pune Crime branch unit arrests 8 suspects
Read @ANI Story | https://t.co/1HUiny7xFh#SharadMohol #Pune #Police pic.twitter.com/7hY2ujy1f6 — ANI Digital (@ani_digital) January 6, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणी ८ जणांना पुणे-सातारा रस्त्यावरील किकवी-शिरवळदरम्यान अटक करण्यात आली. या आरोपींकडून ३ पिस्टोल, ३ मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे तसेच २ चारचाकी गाड्याही जप्त करण्यात आल्या.
भाचा आणि मामाच ठरला शरद मोहोळचा कर्दनकाळ!
कुख्यात गुंड शरद मोहोळ याची काल पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी ८ तासात फिल्मी स्टाईलने सर्व आरोपींना अटक केली. यानंतर आज पत्रकार परिषद घेत पुणे पोलिसांनी संपूर्ण कारवाईचा थरार सांगितला.
शरद मोहोळ याच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडल्या. मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर दोन जणांनी रस्त्यावर गोळीबार केला. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्याबरोबर फिरायचा. आरोपी साहिल याचा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले या दोघांचे शरद मोहोळसोबत वैमनस्य होते. यामुळेच हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासाच पोलिसांना माहिती मिळाली आहे.
दोन गाड्यांमध्ये दोन वकील होते. त्यांचा सहभाग काय होता. हे तपासात समोर येणार आहे. मुन्ना पोळेकर सुतारदरा परिसरात राहतो. गेल्या २० ते २५ दिवसांपासून तो शरद मोहोळ याच्या कार्यालयात जात होता. पोलिसांनी या प्रकरणात कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आयुक्त रितेशकुमार, पुणे शहर यांनी सहायक पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे व पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे गुन्हे शाखा, पुणे शहर यांना तात्काळ आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे गुन्हे शाखा, पुणे शहर व सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ सुनिल तांबे यांनी गुन्हे शाखेची ९ पथके तयार करुन आरोपीच्या शोधासाठी पुणे शहर परिसर, मुळशी, सातारा, पुणे ग्रामीण व कोल्हापुरच्या दिशेने रवाना केली होती.
दरम्यान खंडणी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार, आरोपी गुन्हा केल्यानंतर चारचाकी वाहनातून पळून गेले होते. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिसांना आरोपी मुंबई-बंगळुर हायवेने साताऱ्याच्या दिशेने गेल्याचे दिसले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ज्या चारचाकीने जात होते. त्या कारला पोलिसांनी ट्रॅक केले. त्यानंतर ते खेड शिवापूर टोलनाका पास होवून पुढे जात असल्याची माहिती प्राप्त झाली. नंतर पोलीस आरोपीच्या शोधाकरीता तात्काळ साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले.
पोलीस अधिक्षक सातारा यांच्याशी संपर्क साधून पुणे पोलिसांनी सातारा मार्गावर व शिरवळ, आणेवाडी टोलनाका, महाबळेश्वर फाटा, वाई परिसरात नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध घेत असताना पुणे सातारा रोडवर किकवी जवळ तपासात निष्पन्न झालेली संशयित स्विफ्ट गाडी पोलिसांना दिसली. या गाडीचा पोलिसांनी पाठलाग केला. या गाडीतून आरोपींना अटक केली.
यामध्ये १) साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर वय २० वर्ष, रा. शिवशक्ती नगर, गल्ली नं. २७/७ सुतारदरा कोथरुड पुणे, २) नामदेव महीपती कानगुडे वय ३५ वर्षे, रा. भुगाव ता. मुळशी जि. पुणे ३) अमित उर्फ अगर मारुती कानगुडे वय २४, रा. लेन नं. ९५ स्वराज्य मित्र मंडळ पर्वती पुणे, ४) चंद्रकांत शाहू शेळके वय २२ वर्ष, रा. लेन नं. ९४ जनता वसाहत पर्वती पुणे, ५) विनायक संतोष गाव्हणकर वय २० वर्ष, रा. पौड, ता. मुळशी जि. पुणे, ६) विठ्ठल किसन गांदले वय ३४ वर्ष, रा. शिवकल्याण नगर सुतारदरा कोथरुड पुणे, ७) अॅड. रविंद्र वसंतराव पवार, वय ४० वर्ष, रा. नांदेगाव ता. मुळशी जि. पुणे. ८) अॅड. संजय रामभाऊ उड़ान वय ४३ वर्ष, रा. भुसारी कॉलनी कोथरूड पुणे आणि स्वीफ्ट गाडी, महिंद्रा एसयुव्ही या वाहनांसह ताब्यात घेतले. गुन्हयात वापरलेले ३ गावठी पिस्टल, ३ मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे, ८ मोबाईल हॅन्डसेट, रोख रक्कम असा एकूण २२ लाख ३९ हजार ८१० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
आर्थिक आणि जमिनीच्या वादातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शरद मोहोळ आणि त्याचे कुटुंबीय कोथरुडमधील सुतारदरा परिसरात राहतात. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळ कार्यालयातून घराकडे जात होता. त्यावेळी ही घटना घडली. मोहोळच्या गळ्याजवळ, छातीवर आणि उजव्या खांद्याजवळ गोळ्या लागल्या. तर एक गोळी आरपार गेली. गंभीर जखमी अवस्थेत मोहोळला कोथरूडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.