स्कायमेटचा अंदाज, गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
नवी दिल्ली : राज्यात थंडीचा कडाका वाढलेला असतानाच अवकाळी पावसाने जोर धरला आहे. सांगली, कोल्हापूरनंतर काल रात्री नगर शहरात जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळीही तुरळक पाऊस झाला असून आजपासून पुढील ४८ तास पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाच्या या नव्या अंदाजाने शेतकरी धास्तावले आहेत.
खासगी हवामान अंदाज संस्था स्कायमेटने (Skymet) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह बिहार, झारखंड, रायलसीमा या भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप या राज्यात मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. ८ जानेवारी रोजी मध्य प्रदेश आणि राजस्थानात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे.
हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवेळी येणा-या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.