Friday, May 9, 2025

रिलॅक्स

आनंद देणारा इंगळे

आनंद देणारा इंगळे

टर्निंग पॉइंट - युवराज अवसरमल


आनंद इंगळे या अभिनेत्याने मराठी चित्रपट, नाटकात काम न करता हिंदी चित्रपटसृष्टीत देखील काम केले आहे. आनंद इंगळेचा जन्म पुण्याचा आहे. त्याचे शालेय शिक्षण पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण देखील पुण्यात झाले. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्याने भाग घेतला होता. ‘प्रपंच’ या मालिकेतील त्याने साकारलेला मंग्या ही व्यक्तिरेखा आज देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे. कुंकू, शेजारी-शेजारी या त्याच्या मालिका देखील प्रेक्षकांनी लक्षात ठेवल्या आहेत.


‘माकडाच्या हाती शंम्पेन’ हे नाटक त्याचा जीवनातलं टर्निंग पॉइंट ठरल. या त्याच्या पहिल्या व्यायसायिक नाटकाने त्याला ओळख मिळवून दिली. या नाटकात माकडाची भूमिका त्याने केली होती. या नाटकाचे दिग्दर्शन गिरीश जोशी यांनी केलं होत. संदेश कुलकर्णी, श्रावणी पिल्ले, संदेश जाधव हे कलाकार त्याच्यासोबत होते. प्रेक्षकांच्या भरपूर चांगल्या प्रतिक्रिया त्याला मिळाल्या. त्यानंतर लग्नबंबाळ, व्यक्ती आणि वल्ली, वाऱ्यावरची वरात अशा अनेक प्रसिद्ध नाटकात त्याने काम केले. ‘पाऊलवाट’ या मराठी नाटकातील त्याची विनोदी भूमिका गाजली.या विनोदी भूमिकेसाठी त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला.


‘एका लग्नाची गोष्ट’ या मराठी चित्रपटातील भूमिकेपासून त्याच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. ‘डॅडी’ या हिंदी चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. त्यानंतर त्याची अभिनयाची गाडी सुस्साट वेगाने धावत राहिली. बालगंधर्व, सत्य सावित्री आणि सत्यवान, बदाम राणी गुलाम चोर, उचला रे उचला, गोळाबेरीज, शाळा, कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक, व्ही आर ऑन होऊन जाऊ दे, आंधळी कोशिंबीर, दुसरी गोष्ट, टाइम, मी येतोय, पोस्टर गर्ल, फू फ्रेंडशिप अनलिमिटेड, फुगे, डॉ. काशिनाथ घाणेकर, गोट्या, रणांगण, ये रे ये रे पैसा, तीन अडकून सीताराम, सातारचा सलमान, दे धक्का, दिल दिमाग ओर बत्ती या चित्रपटात त्याने भूमिका केल्या. मोगरा फुलला, सूर सपाटा, रेडीमिक्स, सूर्याची पिल्ले, खरं खरं सांग या नाटकातदेखील त्याने काम केले. अभिनेत्री माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ या चित्रपटात आनंद इंगळेने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याला या भूमिकेविषयी विचारले असता तो म्हणाला की, या चित्रपटामध्ये एका खोताच कुटुंब आहे. त्यामध्ये तीन भावंडं दाखविली आहेत.


त्यांची मुले आहेत. दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर हे तीन भावंडं आहेत. दिलीप प्रभावळकरांच्या मोठ्या मुलाची माझी भूमिका आहे. माझ्या व्यक्तिरेखेचे नाव आत्मा आहे; परंतु त्याला भाऊ म्हणतात. सावंतवाडीतील एका वाड्यामध्ये त्याच शूटिंग झालं होतं. चांगलं कथानक असलेल्या या चित्रपटाला दिग्दर्शकाचा चांगला परिस्पर्श लाभलेला आहे. या चित्रपटाच्या वेगळ्या कथेला माधुरी दीक्षित-नेने निर्माती म्हणून ठामपणे उभ्या राहिल्या, ही आनंदाची बाब ठरली. गेल्या वर्षी पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्लेचा अॅवॉर्ड मिळाला होता. त्याचे ‘८ दोन ७५’ व ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हे चित्रपट येणार आहेत. ‘८ दोन ७५’ या चित्रपटात नायकाच्या वडिलांच्या भूमिकेत आनंद दिसणार आहे. संपूर्ण पंचक्रोशीत वजन असणार असं ते व्यक्तिमत्त्व आहे. सज्जन व देवधर्म मानणारे ते गुरुजी दाखविले आहेत. विनोदी, गंभीर भूमिका करणारा आनंद आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना आनंद देतो, हे नक्कीच.

Comments
Add Comment