Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीSuresh Wadkar : दादा दमाशिवाय कुणालाच दमात घेत नाही!

Suresh Wadkar : दादा दमाशिवाय कुणालाच दमात घेत नाही!

अजितदादांविषयी असं का म्हणाले गायक सुरेश वाडकर?

माझी ‘ती’ इच्छा अजितदादांनी पूर्ण करावी : सुरेश वाडकर

नाशिक : नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे काल चौथा सुविचार गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात भाषण करताना सुरेश वाडकर यांनी अजितदादांजवळ त्यांची एक इच्छा व्यक्त केली. ही मागणी दादा आणि भुजबळ पूर्ण करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सुरेश वाडकर म्हणाले, “नाशिकमध्ये अनेक प्रतिभावान मुलं आहेत. गाणं शिकण्यासाठी, या क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी नाशिकहून अनेक मुलं मुंबईला येतात. प्रत्येकाला मुंबईला येणं, राहणं शक्य होत नसल्यामुळे नाशिकमध्ये एक संगीत शाळा काढावी अशी माझी इच्छा आहे. माझा तसा अट्टाहास होता. त्यामुळे मी इथे जागा घेत होतो. परंतु, मला जागेचं व्यवहारज्ञान नसल्याने माझी फसवणूक झाली आहे. दादाला (अजित पवार) हे सगळं माहिती आहे. त्यामुळे दादाने मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना दम दिला. दादा दमाशिवाय कुणालाच दमात घेत नाही.” सुरेश वाडकर बोलत असताना मंचावर उपस्थित असलेल्या अजित पवारांनीही त्यांना या प्रकरणाची माहिती असल्याचे सांगितले.

सुरेश वाडकर म्हणाले, “संगीत शाळा काढण्याचं माझं स्वप्न आहे. माझं ९० टक्के काम झालं आहे. उरलेलं १० टक्के काम का होत नाही हेच मला कळत नाही. हे काम रखडलंय आणि तेच माझं दुःख आहे. इथे चांगली शाळा झाली असती आणि मी आवडीने ती शाळा स्वतः सांभाळली असती. याबाबतीत छगन भुजबळ यांनीसुद्धा माझी खूप मदत केली आहे. अजित पवार यांनी ही गोष्ट मनावर घेतली तर नक्की माझं काम होईल. मी इथे चांगली संगीतशाळा सुरू करेन अशी माझी खात्री आहे”.

सुरेश वाडकर दोन्ही नेत्यांना उद्देशून म्हणाले, “मुंबईतली माझी शाळा पाहिली तर तुम्हीदेखील खूश व्हाल. त्यामुळे मी तुम्हा दोघांना विनंती करतो मला यातून वाचवा. जसं ‘काका मला वाचवा’ म्हटलं गेलंय, तसंच ‘दादा मला वाचवा’ असं म्हणायची वेळ माझ्यावर आली आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ नक्की माझं स्वप्न पूर्ण करतील, अशी ग्वाही मी त्यांच्याकडून आज मागेन”, असं सुरेश वाडकर म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -