Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Baramati Agro : रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोसह ६ ठिकाणी ईडीची छापेमारी

Baramati Agro : रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोसह ६ ठिकाणी ईडीची छापेमारी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारमती अ‍ॅग्रो (Baramati Agro) मधील कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने (ED) छापेमारी केली आहे.


सक्तवसुली संचलनालयाने आज (५ जानेवारीला) बारामती ॲग्रोच्या पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये ईडीने सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे.


गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस आली होती. आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने छापेमारी केल्यानंतर कंपनीत इतर कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही.


आमदार रोहित पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल..."


बारामती अ‍ॅग्रो कंपनी ही आमदार रोहित पवारांची कंपनी आहे. ही कंपनी बारामती तालुक्यातील पिंपळी येथे आहे. आज सकाळी तपास यंत्रणा येथे पोहोचली. सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान हे अधिकारी येथे पोहोचले. तेव्हापासून चौकशी सुरू आहे. त्याशिवाय मुंबईसह इतर ठिकाणीही धाडी मारल्या आहेत.


दरम्यान, रोहित पवार यांना गेल्यावर्षी बारामती अ‍ॅग्रो कंपनीतील कथित गैरव्यावहार प्रकरणी नोटीस मिळाली होती. याप्रकरणी रोहित पवार यांनी दोन मोठ्या नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यांच्या सांगण्यावरुन माझ्या कंपनीत छापेमारी झाल्याचे ते बोलले होते.


राष्ट्रवादी काँग्रेसमून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांचं आतापर्यंतचे काम हे उल्लेखनीय आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाची बाजू सांभाळत रोहित पवारांनी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. तर अजित पवार गटाच्या प्रत्येक नेत्याने रोहित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

Comments
Add Comment