
शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिर्डी येथील शिबीराचा आज समारोप होत आहे. काल आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी श्री राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कालचा दिवस चांगलाच गाजला. जितेंद्र आव्हाड यांनी राम आमचा आणि तो बहुजन असल्याचे वादग्रस्त विधान केले. राम शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. ते शिकार करून खायचे. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वक्तव्याबाबत राज्यात सत्ताधारी आक्रमक झाले असतानाच आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आव्हाडांना घरचा आहेर दिला.
स्वपक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी देखिल आव्हाडांना सल्ला दिला आहे. खडसे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांना वडीलकीच्या नात्याने सांगतो. त्यांनी अशी वक्तव्य करु नये. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अशी वक्तव्य टाळावी. जितेंद्रने काल विषय सांगितला की श्रीराम मांसाहारी होते. त्यांचे ते व्यक्तिगत मत असू शकते. ते पक्षाचे मत असेल असे मला वाटत नाही. ज्या ठिकाणी श्रद्धेचा, भावनेचा विषय असतो, यापेक्षा महत्वाचे म्हणजे समोर निवडणुका असताना असे वादग्रस्त वक्तव्य टाळावे, असे मी त्यांना वडीलकीच्या नात्याने सल्ला देतो. तो माझा अधिकार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.