
टास्क फोर्सने दिली सूचना; लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार
मुंबई : सध्या देशभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (JN 1) डोकं वर काढलं आहे. ही काळजी करण्याची बाब नसली तरी काळजी घेण्याची मात्र नक्कीच आहे. कोरोना काळात लोकांना वैयक्तिक स्वच्छता राखण्याच्या व मास्क, सॅनिटायझर यांसारखे काही नियम पाळण्याच्या वारंवार सूचना देण्यात येत होत्या. त्यामुळेच आपण कोरोनासारख्या गंभीर महामारीवर (Covid Pandemic) विजय मिळवू शकलो. मात्र, आता पुन्हा एकदा लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लक्षणं दिसताच पाच दिवस गृहविलगीकरणात (Home Isolation) राहण्याचा सल्ला टास्क फोर्सकडून (Task Force) देण्यात आला आहे.
नववर्ष आणि सणासुदीच्या काळामुळे पुढील तीन आठवडे महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांमधील हॉस्पिटलायझेशनकडे (Hospitalization) लक्ष देण्याची गरज असल्याचेही टास्क फोर्सने म्हटले आहे.राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ८६२ झाली आहे. मागील दहा दिवसांत कोरोना रुग्ण संख्येचा आलेख चढाच राहिला आहे. त्यामुळे गृहविलगीकरणाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच वयस्कर व्यक्तींसाठी मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांनी लोकांच्या संपर्कात न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासंबंधी आज नियमावली जारी केली जाऊ शकते.
कोरोनासोबतच जेएन.१ रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थांना सतर्क करण्यात आले असून तयार राहण्यास सांगण्यात आलं आहे. परदेशातून भारतात येणाऱ्यांवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत मात्र त्यांनाही काही दिवस गृहविलगीकरणात राहण्यास सांगण्यात येण्याची शक्यता आहे. विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी टास्क फोर्सकडून काळजी घेतली जात आहे.
राज्यात कोरोनाची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ८६२ वर -
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, काल बुधवारी राज्यात १३८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ८६२ वर पोहचली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण ठाण्यात आहेत. दुसरीकडे राज्यातील एकूण जेएन.१ कोरोना रुग्णांची संख्या ३२ वर पोहचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत.