माझे कोकण: संतोष वायंगणकर
कोकणातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला चालल्याची चर्चा नेहमीप्रमाणे उबाठा गटाच्या आमदार-खासदारांनी घडवून आणली. पाणबुडी प्रकल्प कोणाचा? तो प्रकल्प दुसरीकडे नेण्याचा कोणाला अधिकार आहे? तो प्रकल्प नेमका कसला आहे, यातला कशा-कशाचा संबंध नसताना गोबेलस नितीचा वापर करून न्यूज सुटल्या. यातली सत्यता राजकीय नेते, पुढारी यांनी केली नाही की पत्रकारांनीही त्या संबंधी सत्यता तपासली नाही. ‘सिंधुदुर्गातलो पाणबुडी प्रकल्प गुजराताक’ म्हणून सांगून आपण मोकळे झालो. कोकणात एखादा प्रकल्प येतोय असे जाहीर झाले तरीही त्याला पहिला विरोध उबाठा गटाकडून सुरू होतो. यामागचे एक प्रमुख कारण असे आहे की, प्रकल्पावरून राजकारण करणे सोपे जाते. लोकहित यामध्ये कोणाचे आणि काहीही नसते आणि आजवर ते नव्हतेही. कोकणातील जनतेची मानसिकता ही सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेत अधिक आहे. यामुळे विरोधी सूर कोणी आळविला की आपोआपच त्याच सुरात-सूर मिसळायला अनेकजण तयारच असतात. विरोध कशासाठी केला जातोय याची काहीही माहिती नसलेले विरोध करून मोकळे होतात.
कोकणातले आजवर नाहक विरोध झालेले आणि न झालेले प्रकल्प जरी आठवले तरीही अशा प्रकल्पांची संख्या डझनभर होईल. विरोध करायचा राजकीय ‘इश्यू’ करायचा आणि निवडणूक जिंकायची असा एक नवा राजकीय फंडा गेली काही वर्षे सुरू आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, ओबेरॉय पंचतारांकित हॉटेल प्रकल्प, ताज हॉटेल प्रकल्प, सी वर्ल्ड, रिफायनरी प्रकल्प या सर्व प्रकल्पांना एकदा नजरेसमोर आणले तरीही कोकणाने काय कमावलं आणि काय गमावलंय याचा हिशोब आपणच मांडलेला बरा. सी वर्ल्डसारख्या प्रकल्पाने कोणाचेच नुकसान नव्हते. त्या भागातील जमिनी शेतकऱ्यांनी अगोदरच विकलेल्या होत्या; परंतु तिथेही अफवा पसरविल्या गेल्या आणि कोकणातील जनतेने त्यावर सहज विश्वास ठेवला गेला. २०१४ च्या निवडणुकीत विजयी होता आले. त्यानंतर या सी वर्ल्डची लांबी-रुंदी तत्कालीन शिवसेना पुढाऱ्यांच्या भाषणातून कमी-कमी होत राहिली. आता हा प्रकल्प होणार की नाही, हे कोणालाच सांगता येणारे नाही. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार व उद्योगमंत्री नारायण राणे असताना या सी वर्ल्ड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी १०० कोटींची शासनस्तरावर आर्थिक तरतूद करण्यात आली होती. एक सी वर्ल्ड प्रकल्प झाला असता तर अखंड कोकणचे अर्थकारण बदलले असते; परंतु कोकणच्या विकासाला सतत विरोध करणाऱ्यांनी या कोकणच्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याने कोकण २५ वर्षे आपण मागे घेऊन चाललोय. याचा विचार आपण कधीतरी करणार आहोत की नाही. राजकीय नेत्यांनी राजकारण जरूर करावे; परंतु कोकणच्या मुळावर येणारे, कोकणला मागे घेऊन जाणारे राजकारण अजिबात नको. निवडणुकीच्या विजयाची गणिते मांडण्यासाठी लोकांना उठवून घालण्याचे काम केले जाते. चर्चेवर आणि अफवांवर भरवसा ठेवून नकारात्मक चर्चा करून वातावरण बिघडवणाऱ्यांमुळे आजवर कोकणचे नुकसानच झाले आहे. चांगल्या-वाईटाच्या हिशोबाची मांडणी करणार कोण? जेव्हा एखादा प्रकल्प नको म्हणून आपण विरोध करत असू तर चांगलं काय आहे ते आणण्याचा तरी प्रयत्न होतोय काय? विरोध करणारी राजकीय नेतेमंडळी फक्त विरोध करतात. नाकारताना आणखी काय हवंय ते आणण्यासाठी कधी प्रयत्न झाल्याचे आजवर ऐकीवात नाही. यामुळे फक्त नकारघंटाच वाजविली जाते. हे जनतेनेच कधीतरी थांबवावे. वेंगुर्ले निवती रॉक गार्डन येथे पाणबुडी प्रकल्प जेव्हा जाहीर झाला तेव्हाच गुजरातमध्येही पाणबुडी प्रकल्प जाहीर झाले. यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेला म्हणून हाकाटी पिटत बसण्यापेक्षा पाणबुडी प्रकल्पाचे काम लवकर कसे सुरू होईल यासाठी प्रयत्न झाले असते, तर ते अधिक चांगले झाले असते; परंतु खोट्या गोष्टींवर अफवा पसरवून त्यावर आधारित राजकारण करण्याचा प्रयत्न करायचा हाच ज्यांचा राजकीय बेस असेल तर चांगले आणि विकासकाम करण्यासाठी कसे काय प्रयत्न होणार? ते होऊच शकत नाहीत.
पाणबुडी प्रकल्पावरून असे काही राजकारण करण्यात आले ते पाहून हसावं की रडावं हा प्रश्न कुणालाही पडू शकेल. कोकणात आलेला किंवा येऊ घातलेल्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी पाणबुडी प्रकल्पावर बोलायचे हे आश्चर्यकारक आहे. अदानींचा प्रकल्प येऊ दे, नाही तर अंबानींचा प्रकल्प येऊ दे जर कोकणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असतील आणि शेतकऱ्यांना सन्मानजनक योग्य मोबदला मिळणार असेल तर ते चांगले आहे. लोकहिताचे, रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रकल्प कोकणात यायलाच पाहिजेत. कोणताच प्रकल्प नको म्हणणारे आणि विरोध करणाऱ्यांनी एखादा तरी रोजगार उपलब्ध करून देणारा प्रकल्प आणला आहे का? एखादा प्रकल्प आणावा, रोजगार निर्माण करावा मग आपल्या विरोधाला, बोलण्याला अर्थ प्राप्त होतो. अहो, विरोध करणारे प्रत्येक वाडीत, गावात कोकणात आहेतच की. गावात काही होतंय म्हटल्यावर अशांचा विरोधच असतो. कशासाठी विरोध आहे असे विचारले तर ते सांगता येत नसते. पण आमचा ठाम विरोध आहे असे सांगतात. त्यामुळे गावातील ‘टिपिकल’ कोकणच्या माणसाच्या मनातला हा विरोध सकारात्मक विचारातून बदलेल तोच कोकणसाठी सुदीन असेल.