उद्घाटनाच्या लगबगीत अयोध्यानगरी

Share

प्रमोद मुजुमदार: ज्येष्ठ पत्रकार

प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहताना बघणे ही डोळ्यांचे पारणे फेडणारी घटना आहे. एखाद्याच्या जगण्यात ‘राम’ असणे परिपूर्णतेचे सूचक असते, तर ‘राम’ नसणे अर्थहिन जगणे सूचित करून जाते. सध्या अयोध्या राम मंदिरात साजऱ्या होणाऱ्या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत गढून गेली आहे. रस्ते, गल्लीबोळापासून हमरस्त्यापर्यंतचा परिसर नव्या नवलाईने झळाळून निघतो आहे. अयोध्येतील वास्तव्यात दिसणारे हे लोभस चित्र. समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहताना बघणे ही डोळ्यांचे पारणे फेडणारी घटना आहे. आजही भारतीय मनावर राम अधिराज्य करतो. माता-पित्यांप्रती श्रद्धा-प्रेम, बंधुभाव, मैत्र, पत्नीप्रेम, कुटुंबवत्सलता, प्रजारक्षण, पीडित-शोषितांचा उद्धार, उत्तम संघटन, अभेद्य योद्धा, शिष्यशिरोमणी अशा एक ना अनेक विशेषणांनिशी उल्लेखली जाणारी ही देवता पुराणकाळातील असली तरी वर्तमानातही वेगवेगळ्या संदर्भात तिचा सर्रास उल्लेख होतो. सध्या राम मंदिरात साजऱ्या होणाऱ्या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत अयोध्या गढून गेली आहे.

रस्ते, गल्लीबोळापासून हमरस्त्यापर्यंतचा परिसर नव्या नवलाईने झळाळून निघतो आहे. रामाच्या काळात होते तसे लोभस रूप या नगरीला पुन्हा प्राप्त व्हावे आणि वातावरणात तितकेच मांगल्य असावे, यासाठी प्रत्येक यंत्रणा जीवाचे रान करताना दिसत आहे. अयोध्येतील वास्तव्यात हे लोभस चित्र पाहायला मिळत आहे. एखाद्याच्या जगण्यात ‘राम’ असणे परिपूर्णतेचे सूचक असते, तर ‘राम’ नसणे अर्थहिन जगणे सूचित करून जाते. म्हणूनच हा भारतीयांच्या श्वासात सामावलेला देव आहे, असेही आपण म्हणू शकतो. अशी श्रद्धा आणि अलोट प्रेम असल्यामुळेच आजही रामनवमीच्या दिवशी रामाच्या देवळात पाळणा सजतो. शृंगारलेल्या पाळण्यातील लहानग्या रामलल्लाला प्रेमाने जोजवले जाते. श्रद्धापूर्वक पाळणा गायला जातो. सुंठवडा वाटून त्याच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. घरोघरी रामाचे नवरात्र बसते. सांज-सकाळी पूजा-अर्चना होऊन रामचरित्रातील सूरस कथांचे श्रवण, वाचन केले जाते. अशा या रामाने आपल्या आयुष्यात वनवास भोगला. न केलेल्या चुकीची शिक्षा घेतली. मात्र कलियुगातही त्याचा वनवास काही कमी कष्टाचा नव्हता. आपल्या हक्काच्या स्थानी येण्यासाठी आताही त्याला अनेक वर्षे वाट पाहावी लागली. मात्र राम मंदिराच्या उभारणीमुळे आता हा वनवास संपला आहे, असेच म्हणावे लागेल.

हा एक-दोन नव्हे तर तब्बल ४९२ वर्षांचा अखंड संघर्ष होता. त्यानंतर ३७ वर्षांची अखंड जनजागृती होती. मागे वळून बघायचे तर ९ नोव्हेंबर १९८९ रोजी बिहारच्या कामेश्वर चौपाल यांनी ऐतिहासिक पायाभरणी समारंभात उद्घाटनाचा दगड ठेवून राम मंदिराच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली. २००३ मध्ये, १५२८ पूर्वी वादग्रस्त जागेवर हिंदू संरचनेच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने फोटोग्राफीसाठी रडार लहरींचा वापर करून ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. या पाहणीत जमिनीच्या अगदी खाली पसरलेल्या संरचनेचे अवशेष उघड झाले. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांची सत्यता तपासण्यासाठी उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाद्वारे उत्खनन सुरू केले. त्यातून समोर आलेल्या माहितीवरील अहवालानुसार जमिनीच्या खाली उत्तर भारतीय शैलीतील मंदिर अस्तित्वात असल्याची पुष्टी केली आहे. पुढे सप्टेंबर २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने सर्व दिवाणी खटले एकत्रितपणे सोडवताना मंदिर पाडण्याचा निर्णय कायम ठेवला. तथापि, लढलेल्या क्षेत्राचे तीन स्वतंत्र विभागात विभाजन करण्याचा ठराव झाला. सहभागी पक्षांपैकी कोणत्याही पक्षाने हा निर्णय स्वीकारला नाही. परिणामी, सर्व पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. मार्च २०१९ मध्ये तीन सदस्यांसह मध्यस्थी समिती स्थापन करून निराकरण करण्याचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात ठेवण्यात आला होता.

न्यायमूर्ती कलीफुल्ला, चेन्नई (सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त), बी. श्रीराम पांचू, चेन्नई (मद्रास उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील) आणि श्री श्री रविशंकर यांच्यामार्फत मार्चमध्ये मध्यस्ती प्रक्रिया सुरू झाली आणि जुलैच्या अखेरीस मध्यस्ती शक्य नसल्याचे मान्य करण्यात आले. नंतर सर्वोच्च न्यायालयाने ६ ऑगस्टपासून सर्व अपिलांची नियमित सुनावणी करण्याचे आदेश दिले. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांचे पूर्ण खंडपीठ स्थापन करण्यात आले. त्या अंतर्गत ४० दिवस आणि १७० तास नियमितपणे सर्व पक्षांची मते ऐकण्यात आली. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी सुनावणी पूर्ण झाली. ९ नोव्हेंबर, २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने एकमताने निर्णय दिला की भारत सरकारने १९९३ मध्ये विवादित चौदा हजार एकर जमीन आणि त्याच्या सभोवतालचे संपादन हे प्रभू रामाची हक्काची मालमत्ता असल्याचे निश्चित केले होते. या व्यतिरिक्त, संपूर्ण ७० एकर जागेवर मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणारा वेगळा ट्रस्ट तयार करण्याचे सरकारला निर्देश देण्यात आले. त्यानुसार ५ फेब्रुवारी २०२० रोजी ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या नावाने ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ५ ऑगस्ट २०२० रोजी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन करून मंदिराच्या बांधकामाचे उद्घाटन केले. देशाच्या पवित्र नद्या आणि तीर्थक्षेत्रातील पवित्र पाणी तसेच माती भूमिपूजन समारंभासाठी समर्पित करण्यात आली. आता हाती घेतलेल्या या कार्याची उत्तम परिणिती दृष्टिक्षेपात आहे.

अयोध्येत उभे राहत असणारे राम मंदिर समाजातील सर्व वर्गाला सुखावणारे आहे. अयोध्येतील सध्याचे वातावरण पाहता या मंदिर निर्माणाचा आनंद प्रत्येकावर सकारात्मक परिणाम करत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. इथे सर्व जातीधर्माचे, पंथाचे लोक आपापल्या परीने खारीचा वाटा उचलण्यात गर्क आहेत. म्हणूनच हे सर्वांचे मंदिर असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. या भव्य मंदिरासाठी लागलेला निधी अफाट आहे, पण तो कोणा मोजक्या धनदांडग्यांकडून घेतलेला नाही तर दोन वर्षांपूर्वी सर्वसामान्यांकडून निधी गोळा करण्याचे अभियान राबवून मंदिरासाठी लागणारा पैसा उभा करण्यात आला आहे. त्यामुळेच या मंदिर निर्माणाशी समाजातील सर्व जनांची नाळ जोडली गेली आहे. मंदिरात रामलल्ला विराजमान होताना, विधिवत पूजा संपन्न होताना यातील सर्वांना उपस्थित राहणे शक्य नसले तरी आपापल्या ठिकाणी देवतेची पूजा करून आणि मुहूर्तावर रामलल्लाचा अभिषेक संपन्न होऊन प्रतिष्ठापना झाल्यानंतर आरती करून लोक आहेत त्या जागेवरून या समारंभाचा भाग बनू शकतात.

या समयी यथाशक्ती नैवेद्य वाटप करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ही कृतीदेखील समाजातील बंधुत्व वाढवण्याचे काम करेल. वनवास संपवून राम, सीता आणि लक्ष्मण नगरीत परतले तेव्हा लोकांनी गुढ्या उभारून आणि दारी दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते, असे म्हणतात. हाच संदर्भ ध्यानी धरत मंदिरात रामलल्ला विराजमान होतील, त्या दिवशी सायंकाळी लोकांनी आपल्या दारासमोर पाच दिवे लावावेत आणि आनंद व्यक्त करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. दारासमोर उजळणारा हा प्रकाश आपली अस्मिता जागवणारा असेल. गेली कित्येक वर्षे आपण न्याय्य हक्कासाठी तीव्र लढा दिला आहे. यासाठी अनेकांनी अपार कष्ट भोगले आहेत. काहींनी त्यात आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळेच दिव्याची ही रोषणाई त्यांच्या स्मृतींना अभिवादनही असू शकते.

सध्या अयोध्या या भव्य-दिव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत गढून गेली आहे. रस्ते, गल्लीबोळापासून हमरस्त्यापर्यंतचा परिसर नव्या नवलाईने झळाळून निघतो आहे. रामाच्या काळात या नगरीचे होते तसे लोभस रूप पुन्हा प्राप्त व्हावे आणि वातावरणात तितकेच मांगल्य असावे, यासाठी प्रत्येक यंत्रणा जीवाचे रान करताना दिसत आहे. मुख्य म्हणजे मंदिर बांधताना पर्यावरणरक्षणाचा बारकाईने विचार केला गेल्यामुळे इथल्या जैवविविधतेला अजिबात धक्का लागलेला नाही. इतक्या वास्तूंचे बांधकाम सुरू असले तरी शंभर वर्षांपेक्षा अधिक जुने असणारे अनेक डेरेदार वृक्ष जपले गेले आहेत. त्यातील काही वृक्षांचा घेर इतका मोठा आहे की, खालची जमीनही दिसू नये. अशा प्रकारे गतकाळातील स्मृतिचिन्हे, वास्तू आणि वस्तू जपल्यामुळे इथे नव्या-जुन्याचा उत्तम संगम बघायला मिळणार आहे.

मंदिराची देखरेख, सुरक्षा व्यवस्था, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता होणारी धांदल टाळण्यासाठी इथे सर्व पातळ्यांवर व्यवस्था करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, सुरक्षेच्या कारणात्सव इथे अग्निशामक यंत्रणा उभारली आहे. त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची सोयही मंदिर व्यवस्थापनाकडूनच केली गेली आहे. यामुळे लागणाऱ्या पाण्याचा भार अयोध्येतील स्थानिक जलव्यवस्थापन यंत्रणेवर दिलेला नाही. त्याचप्रमाणे सांडपाण्याच्या निचऱ्याची सोयही मंदिर व्यवस्थापनाने केली आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र प्लांट उभारण्यात आले आहेत. साहजिकच तो भारही स्थानिक प्रशासन यंत्रणेवर येणार नाही. विकलांग, वयस्क भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठीही इथे खास सोय केली आहे. त्यांच्यासाठी व्हिलचेअर्स उपलब्ध आहेतच, खेरीज लिफ्ट आणि सरकत्या जिन्याची सोयही करण्यात आली आहे. त्यामुळे या लोकांनाही देवाचे दर्शन घेणे सहजशक्य होईल. अशा एक ना अनेक पातळ्यांवरून परिपूर्ण ठरलेले हे काम आपल्यापैकी प्रत्येकाच्या पसंतीस उतरेल अशी आशा करूया आणि या अनोख्या सोहळ्यात सहभागी होऊया.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

2 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

3 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

3 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

4 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

4 hours ago