
कामगारांचा हलगर्जीपणा आला समोर
बुलढाणा : समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Mahamarg) आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना (Accidents) समोर आल्या आहेत. हे अपघात टाळण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना देखील राबवत आहे. मात्र, या मार्गावर पुन्हा एकदा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे, समृद्धी महामार्गावरील पुलाचा ५ दिवसांपूर्वी तुटलेला भाग पुन्हा निखळला आहे. यावरुन या भागाची तात्पुरती डागडुजी करण्यात आल्याचं निदर्शनास येत आहे.
पाच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोरवरील बीड ते सिंदखेड राजा दरम्यान चेनेज ३१९ वरील एका पुलाचा लोखंडी भाग तुटून वर आला होता. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत दुरुस्ती कामास सुरुवात केली आणि तो लोखंडी भाग वेल्डिंग करुन पूर्ववत केला.
मात्र, पाचच दिवसांत त्या भागाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे ज्याच्या हाती हे काम सोपवलं होतं त्या कामगारांनी हलगर्जीपणा केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी तात्पुरती वेल्डिंग करून दुरुस्ती केली आहे. त्यामुळे याकडे पुन्हा एकदा लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.