काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे
कोणत्याही स्त्री – पुरुषांमधील अनैतिक विवाहबाह्य संबंध असोत की विवाहित, एकल स्त्री – पुरुष यांच्यामधील रिलेशनशिप असो, कोणत्याही नात्यातील नियमबाह्य अनुचित शारीरिक संबंध असोत, त्याचे जाहीर प्रदर्शन करणे, सामाजिक भान न ठेवता राजरोस स्वतःची अनैतिकता अभिमानाने मिरविणे, कसलीही तमा न बाळगता चुकीच्या नात्यांना देखील समाजात, सार्वजनिक ठिकाणी मिरवणे आणि स्वतःला अत्यंत फॉरवर्ड, पुढारलेले, आधुनिक मतांचे आहोत, सगळेच करतात मग आम्ही केले तर काय बिघडले हे दाखविण्याचा प्रयत्न करणे यांचे प्रमाण वाढत चाललेले दिसते.
बनावट नात्याला अधिकृत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याला वेगवेगळे लेबल लावून आपल्या दुष्कृत्याला समाजापुढे अभिमानाने दाखविणे ही जणू आज फॅशन झाली आहे. पहिली पत्नी अथवा पती हयात असताना, घटस्फोट झालेला नसताना भलत्याच व्यक्तीला द्वितीय पत्नी अथवा पती म्हणून समाजापुढे आणणे, अत्यंत सहजरीत्या तसा अभिनय करणे सातत्याने वाढत आहे. ही त्याच्यासोबत असते बरं का, हा तिच्या ताब्यात आहे, ही आधी अमुक बरोबर होती, आता हा पकडला आहे. हिला त्याने वापरले, फिरवून सोडले, आता ही अमुकच्या घरात शिरली आहे, हा तिच्या नादी लागला आहे, तिने त्याला पैशासाठी धरले आहे, तो तिला वापरतोय, असे बोलणे सर्रासपणे आपल्या कानावर पडत असतात.
कुटुंबात, समाजात, सार्वजनिक ठिकाणी, आजूबाजूला असलेल्या लहान – मोठ्या, वयोवृद्ध लोकांचा विचार न करता, खऱ्या नात्यांची तमा न बाळगता सर्व नितीमूल्ये, संस्कार, मर्यादा ओलांडून आपल्या तकलादू रिलेशनचे सार्वजनिक प्रदर्शन करणे, एकमेकांप्रति अतिप्रेम, अतिजवळीक, अतिउत्साह, अतिबांधिलकी, काळजी, शारीरिक लगट आणि घसट चारचौघांत दाखवून अनेक महिला आणि पुरुष स्वतःची सामाजिक प्रतिमा मलीन करून घेताना दिसतात. विशेष म्हणजे अशा चुकीच्या नात्यामध्ये वाहवत गेलेल्या महिलासुद्धा कुठेही न घाबरता, न लाजता, न कोणाची भीड बाळगता, पुढचा- मागचा कोणताही विचार न करता बिनधास्त ज्याच्याशी चुकीचे संबंध आहेत त्या पुरुषासोबत वावरतात. कुठलाही कायदेशीर लग्नाचा आधार नसताना, अनेक महिला आणि पुरुषसुद्धा स्वतःला एखाद्याची बायको अथवा नवरा म्हणून घोषित करतात.
आपलं नातं खोटं आहे, चुकीचं आहे, आपलं नातं कोणत्याही अख्त्यारीत बसत नाही, ते समाजमान्य नाही, बेकायदेशीर आहे, तत्कालिक आहे हे माहिती असून सुद्धा स्त्रिया जेव्हा स्वतःची इज्जत, अब्रू, मर्यादा सोडून जर परपुरुषासोबत उघड उघड अशा संबंधांचे प्रदर्शन करीत असतील, तर फक्त पुरुषांना दोष देण्यात अर्थ नाही. ज्या नात्यातून भविष्यात काहीच पदरी पडणार नाहीये त्या नात्याचा गाजावाजा करण्यात आणि बदनाम होण्यात महिलांना कोणतं साहस, कोणतं प्रेम आणि कोणतं सुख मिळतं हा खूप मोठा वैचारिक विषय आहे. अनेक महिला आपल्या मुलांचा, घरातल्यांचा, आई – वडील, सासरचा विचार न करता रक्ताच्या हक्काच्या लोकांना, नात्यांना झुगारून कोणाच्याही आयुष्यात स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी खरं प्रेम आहे, खरं नातं आहे, ज्या नात्याला नैतिकतेचा आधार आहे, ज्या नात्याला नाव आहे आणि समाजात ज्या नात्याचे स्थान आहे, अशा कोणत्याही ठिकाणी दिखावा अथवा उथळपणा पाहायला मिळत नाही. तशी गरज पण भक्कम पायावर उभ्या असलेल्या नात्याला वाटत नाही. जे नातेसंबंध समाजमान्य असतात, सर्वानुमते स्वीकारलेले असतात त्या ठिकाणी संयम, सहनशीलता, शांतता, सभ्यता, आदर निदर्शनास येतो. उलटपक्षी ज्या ठिकाणी चुकीच्या माध्यमातून, अयोग्य पद्धतीने, नैतिकता धुडकाऊन पोकळ आणि पोरखेळ असल्याप्रमाणे संबंध ठेवलेले असतात तिथे जास्तीत जास्त दिखावा स्पष्ट जाणवतो आणि आजमितीला ही वागणूक अनेकांना अंगवळणी पडलेली दिसून येते.
जी गोष्ट चुकीची आहे ती खरं तर करायचीच नसते, त्यातून ती केलीच किंवा घडलीच तर लपवायची असते, लपवायचा प्रयत्न तरी करायचा असतो. पूर्वी कोणाला कळू नये, समजू नये, कुठे आपलं नाव खराब होऊ नये, कोणी आपल्याला अयोग्य समजू नये; कुटुंबात, समाजात बदनामी, मानहानी होऊ नये, आपल्या मुलांना भविष्यात आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे मान खाली घालायला लागू नये, आपल्या घरातील ज्येष्ठांना कुठे कमीपणा वाटू नये, म्हणून असे नातेसंबंध झाकायचे असतात. इतकी नीतिमत्ता तरी पाहायला मिळत होती; परंतु आजकाल हा केविलवाणा प्रयत्न पण कोणी करताना दिसत नाही. जे आहे ते खुलेआम करणे, कोणाला न घाबरता करणे, कोणाची दखल न घेणे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोणाची पर्वा आणि कोणाशीच काही घेणं – देणं नसल्यासारखं सर्व मर्यादा धुडकावून स्त्री – पुरुषांमधील अनैतिक संबंधांनी समाजात धुडगूस घातल्याचे दिसते.
प्रामुख्याने पाहिले तर विवाह झालेली, बऱ्यापैकी वय असलेली, मुलं मोठी असलेली, बरोबरीला मुल – मुली आलेली असणारे महिला – पुरुष जास्तच आत्मविश्वास आणि बेफिकीरपणा अंगी बाळगून स्वतःच्या विवाहबाह्य रिलेशनशिप, प्रेमप्रकरण यांचे उदात्तीकरण करताना दिसतात. विवाहित तसेच एकल महिलांनी सुद्धा खरं तर आपले चारित्र्य, आपली सार्वजनिक प्रतिमा जास्त काळजीपूर्वक सांभाळणे आवश्यक असते; परंतु स्वतःवर असलेल्या फाजिल आत्मविश्वासातून त्या जास्त भरकटलेल्या दिसतात. समाजात, सार्वजनिक ठिकाणी वावरताना, आपली देहबोली, हावभाव, वागणं – बोलण, सवयी सगळे पाहत असतात. अशा वेळी अशा पद्धतीने राहणाऱ्या जोड्या त्यांचे चुकीचे संबंध आणि त्यातून घडणारी चुकीची कृत्य मात्र उफाळून बाहेर पडत असतात.
आधीच नातं खोटं, तात्पुरतं, फायद्यापुरतं आणि तकलादू असत. दोघेही काही ना काही सुप्त हेतू मनात ठेवून, गरज आहे म्हणून, गंमत म्हणून अथवा पर्याय म्हणून एकत्र आलेले असतात. अशी नाती बाहेरून जितकी बहरलेली दिसतात तितकीच ती आतून कसमकुवत असतात, पोकळ असतात. म्हणूनच आपलं सगळं कस उत्तम सुरू आहे, आम्हाला आमच्या करणीचा कसलाच गम-पस्तावा नाही हे त्यांना समाजात दाखवावे लागते. चारचौघात वावरताना एकमेकांचा हात धरणे, फ्लर्ट करणे, एकमेकांना धक्के मारत चालणे, नजरेने विचित्र इशारे करणे, हातवारे करणे, एकमेकांना वाटेल ते वाटेल तसे बोलणे, अतिलाडाने वागणे, सतत एकमेकांना खेटून राहणे, एकमेकांना जास्तीत जास्त महत्त्व देणे, मोठमोठ्याने हसणे आणि इतरांना आपल्याकडे आकर्षित करून आपले एकमेकांत किती प्रेम आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे, इतरांना आपल्या जवळ आणून आपण पण कसे नॉर्मल आयुष्य जगत आहोत हे दर्शविण्यासाठी कसरत करणे, तसे वायफळ प्रयत्न करणे इतक्या खालच्या पातळीवर अनेक रिलेशनशिपमधील जोड्या गेलेल्या दिसतात.
हे सगळे करताना त्या स्त्री पुरुषाला आपण किती बिनधास्तपणे आपलं प्रेम, जवळीक, सहवास याची अनुभूती घेतोय असे वाटतं असले तरी लोकांच्या दृष्टीकोनातून हा थिल्लरपणा, बाहेरख्यालीपणा आणि व्याभिचार असतो. असे विचित्र वागणारे, सर्वसामान्य विवाहित जोडप्यानं पण लाज वाटावी, इतरांना मान खाली घालायला लागावी असे अनैतिक नात्याचं प्रदर्शन करणे यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या मनातून असे स्त्री – पुरुष उतरतात. त्यांना तोंडावर जरी कोणी काही बोलत नसले, तरी विशेष करून आपल्या अनैतिक संबंधांचा बाजार मांडणाऱ्या महिलांकडे पाहण्याचा इतर पुरुषांचा दृष्टिकोन वेगळा होतो, तिच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. तिला समाज चुकीच्या नजरेने पाहतो, तिच्याबद्दल चुकीचे बोलले जातं, तिची बदनामी केली जाते.
समाजाचे, चाकोरीचे नियम तोडून स्वतःच्या रेलशनशिपचे बाजरीकरण करताना पुरुषांना इतका फरक पडत नाही. पुरुषाने एखादी बाई पटवली, फिरवली अथवा ठेवली, लफडं केल तर काय एवढ विशेष?, असे म्हणून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात; पण जी स्त्री अशा नात्यात गुंतून स्वतःला जाहीरपणे बदनाम करून घेते तिला, तिच्या मुलांना भविष्यात खूप अपमानाला, मानहानीला तोंड द्यावं लागत. समाजात अशा मुक्तपणे उघड उघड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या, बेकायदेशीर आणि अनैतिक संबंधला, अफेअरला खरं आयुष्य समजून बसणाऱ्या, स्वतःच्या प्रतिष्ठा पणाला लावलेल्या, स्वतःच्या मान – सन्मानाला किंमत न देणाऱ्या, स्वतःहून परक्या पुरुषासोबत मिरवणाऱ्या महिलाबद्दल चुकीची शेरेबाजी सुरू होते, अशा स्त्रीला तोंडावर जरी कोणी काही बोललं नाही, तिची चूक तिच्या लक्षात आणून दिली जात नाही अशा महिलांकडे, जोड्यांकडे लोक विरंगुळा म्हणून बघतात, त्यांची मजा बघतात, पण कोणीच त्यांच्या भानगडीत पडायला जात नाहीत. अशा स्त्रीला वेळीच कोणी समजावून सांगितले नाही, अडविले नाही, तिच्या बेलगाम वागणुकीला कोणीच थांबविले नाही, चांगला सल्ला दिला नाही, तर ती या फसव्या मायाजाळात अधिकाधिक गुंतत जाते आणि स्वतःच आयुष्य तसेच भविष्य खराब करून घेते.
अनेकदा पुरुष सुद्धा अशा प्रकरणात प्रमाणापेक्षा जास्त गुरफटून स्वतःच्या संसाराची हानी करून घेतात. अशा पद्धतीने वावरणाऱ्या, वागणाऱ्या जोड्यांना कोणी आळा घालायचा प्रयत्न केला तरी ते एकूण अमलात आणण्याची त्यांची मानसिकता नसते. जोपर्यंत अशा खोट्या आणि दिखाऊ प्रेमाची धुंदी त्यांच्या डोक्यात असते, तोपर्यंत टिकाऊ प्रेम आणि नातेसंबंध कसे आणि काय असतात हेच त्यांना उमगलेले नसते.