मुंबई : केंद्रीय गृहसचिवांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने ट्रक आणि टँकरचालकांना त्यांचा देशभरातला संप मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर ट्रक, टेम्पोसह इतर वाहने रस्त्यावर धावू लागली आहेत. मालवाहतूकदारांनी संप जरी मागे घेतला असला तरी सलग दोन दिवसांच्या संपामुळे राज्यात अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे
मुंबईत बुधवारी पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली आहे. ट्रान्सपोर्ट युनियनने जरी आपल्या संप मागे घेतला असला तरी मुंबईत काही ठिकाणी काल दिवसभर लोकांमध्ये गैरसमज पसरल्यामुळे पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या दिसल्या.
काही ठिकाणी साठा संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहेत तर काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर साठा आहे. मात्र पहाटेपासूनच आजही मुंबईकरांनी डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या आहेत. राज्यातील सर्व पेट्रोल पंपांना इंधन उपलब्ध होण्यास बुधवार रात्र उजाडणार असल्याने गुरुवार सकाळपासून सर्व पेट्रोल पंपावर इंधन मिळणार असल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात येत आहे.