अयोध्या रामभूमी ट्रस्टतर्फे अक्षता वाटप सुरू
मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात श्री रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान श्री रामलल्लाची पूजा केलेल्या अक्षता राम भूमी ट्रस्टतर्फे रामभक्तांना घरोघरी जाऊन देण्यात येणार आहेत. आरएसएस, विश्व हिंदू परिषद, हिंदू संस्था, अध्यात्मिक संस्था यांच्यामार्फत या अक्षता घरोघरी पोहोचविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील ९० लाख कुटुंबांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक योगदान दिले होते. त्या प्रत्येकाच्या घरी विहिंपचे कार्यकर्ते पोहोचतील आणि मंदिराबाबत माहिती देणारे एक पत्रक, अक्षता व प्रभू रामचंद्रांचा फोटो देतील. १ ते १५ जानेवारीपर्यंत राज्यभरातील ७० हजार कार्यकर्ते घरोघरी संपर्क करणार आहेत.
देशभरातील घराघरात या अक्षता पोहचाव्यात याकरिता प्रत्येक विभागामध्ये टीम तयार करण्यात आली आहे. या अक्षता देवघरात ठेवायच्या आहेत. २२ जानेवारी या दिवशी रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर त्या अक्षता आपण चांगल्या कार्यासाठी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्री रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ११:०२ मिनिटांनी करण्यात येणार आहे. या दिवशी संध्याकाळी घरोघरी ५ दिव्यांची आरास देवघरात लावायची आहे. प्रत्येकाने आपल्या घरी ५ दिवे देवघरात लावायचे आहेत. या ५ दिव्यांपैकी २ दिवे हे देवघरात, २ दिवे घराच्या बाहेर तर एक दिवा हा तुळसीसमोर लावायचा आहे. २२ जानेवारी रोजी श्री रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर रामलल्लाची पूजा केलेल्या अक्षता आपल्या माथ्यावर घेऊन आशिर्वाद घ्यायचे आहेत.