नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासांत ६०२ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात कोविड-१९ च्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४५०० च्या पुढे गेली आहे.
आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात या नवीन जेएन.१ सब-व्हेरियंटचे ३१२ रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. देशातील जेएन.१ सब-व्हेरियंटच्या एकूण रुग्णांपैकी ४७ टक्के प्रकरणे केरळमध्ये आढळल्याने प्रशासन अलर्टवर आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४,५६५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत दहा राज्यांमध्ये जेएन.१ सब-व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. केरळमधून १४७, तामिळनाडूतून २२, कर्नाटकातून ८, गोव्यात ५१, गुजरातमध्ये ३४, महाराष्ट्रात २६ आणि दिल्लीत १६ रुग्णांची नोंद झाली आहे. राजस्थानमध्ये ५, तेलंगणात २ आणि ओडिशात १ रुग्ण आढळून आले आहेत.