Saturday, July 13, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखरेव्ह पार्ट्यांचा नंगानाच वेळीच रोखा

रेव्ह पार्ट्यांचा नंगानाच वेळीच रोखा

ठाणे शहर पूर्वी मध्यमवर्गीयांचे शहर म्हणून ओळखले जात होते. मराठमोळे शहर होते आणि पुण्याची छाप होती. पण आता ठाणे शहराने आपली जुनी संस्कृती सोडून दिल्याचे दिसते. ठाण्यात सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाच्या सुरुवातीलाच रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले. ठाण्याच्या संस्कृतीला रेव्ह पार्ट्या म्हणजे एक काळा डाग आहे. ठाण्यासारख्या मराठमोळ्या शहरात रेव्ह पार्टी आयोजित केली जाणे हे एक मोठे आश्चर्य आहे. ठाण्याच्या कासार वडवली परिसरात रविवारी रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. याबाबतची खबर मिळताच पोलिसांनी छापा मारला आणि अनेकांना अटक करण्यात आली. तसेच १०० तरुण मुला-मुलींनाही पकडण्यात आले. यावरून तरुण पिढीला रेव्ह पार्टीचे वेड लागले आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे ही बाब अतिशय धोकादायक आणि तितकीच चिंताजनकही आहे. पकडण्यात आलेली ही सर्व मुले सामान्य घरातील, मध्यम वर्गतील नसली तरीही कोवळ्या वयात त्यांना अमली पदार्थांचे वेड लागणे हे कोणत्याही समाजाच्या दृष्टीने एक अरिष्ट्यच आहे. या रेव्ह पार्टीचे आयोजन केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

ठाण्यात रेव्ह पार्टी होते आणि विरोधक याचे राजकीय भांडवल करणार याची पूर्ण कल्पना असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण स्वतःकडे घेतले आणि या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या पार्टीत ज्या अमली पदार्थांचा वापर करण्यात आला त्यांची यादी वाचली, तर डोके चक्रावते. एलएसडीपासून ते कोकेनपर्यंत अनेक अमली पदार्थांचा समावेश होता. या सर्व घटनेतून एक बाब अगदी स्पष्ट होते ती ही की संपूर्ण महाराष्ट्राला व्यसनाने विळखा घातला आहे. ललित पाटील प्रकरणाने तर या अमली पदार्थांचे रॅकेट किती खोलवर पसरलेले आहे याची कल्पना येते. ललित पाटील या गुन्हेगाराला शिवसेना उबाठा गटात कुणी आणले आणि त्याला शिवबंधन कुणी बांधले हे सर्व राज्याला ठाऊक आहे. ड्रग माफियाशी संबंध असलेल्या उबाठा गटाला ललित पाटील प्रकरणामुळे जोरदार झटका बसला आहे.

उबाठा गटाच्या प्रवक्त्यासोबत त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. मुळात राज्यात जे ड्रग्स सापडत आहेत त्यामागे ललित पाटीलचा हात आहे की नाही हे ठामपणे आताच सांगता येत नसले तरी राज्यात हे अमली पदार्थ उपलब्ध करून देण्यात ज्या लोकांचा हात आहे त्यांचा पुरता पर्दाफाश करणे आवश्यक आहे. रेव्ह पार्टीत जे अमली पदार्थ विकले जातात ते अत्यंत महाग असतात. सामान्य परिस्थितीत असलेल्या मुलांच्या ते आवाक्याबाहेर असतात. या मुलांचे आई-बाप हे अतिशय श्रीमंत असतात आणि चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे त्यांची पोहोच खूप मोठी असते. सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी गेले तर अनेक धक्कादायक सत्य बाहेर पडेल.

ललित पाटील या प्रकरणाच्या मुळाशी नसला तरी राज्यात ड्रग्जचा प्रसार करण्याचे उदात्त कार्य त्याने केले आहे. त्याच्यामुळेच महाराष्ट्रात अमली पदार्थांचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे. रेव्ह पार्टीत सापडलेली मुले ही बड्या बापाची मुले आहेत. त्यांना इतके अफाट पैसे पुरवणारे हेच बाप आहेत. पोलीस केवळ समज देऊन सोडून देतात म्हणून ही रेव्ह पार्टीची विकृती वाढीस लागली आहे. या सर्वांवर कठोर कारवाई झाली तरच भविष्यात असे प्रकार होणार नाहीत. उबाठा सरकार होते तेव्हा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान रेव्ह पार्टीतच सापडला होता. त्याला सोडवण्यासाठी माजी मंत्रीच उतावीळ झाले होते. आज ते तुरुंगातून जामिनावर बाहेर आहेत.

आर्यन खानवर ड्रग प्रकरणी कारवाई करणाऱ्या वानखेडे याच्याच मागे हे मंत्री लागले होते. या प्रकरणात उबाठा सेनेकडे संशयाने पाहिले गेले हे मात्र वास्तव आहे. ललित पाटील प्रकरण असो की दिशा सलियन मृत्यू प्रकरण, सुशांत सिंग कथित आत्महत्या प्रकरण, संशयाची सुई ही उबाठा सेनेकडेच जात आहे. रेव्ह पार्टी हेही याच प्रकरणातील एक कडी आहे. तथापि या प्रकरणाच्या चौकशीतून जे काही सत्य आहे ते बाहेर येईल आणि ड्रग रॅकेट चालविणारे तुरुंगात जातील आणि राज्यात सुरू असलेले अमली पदार्थांचे रॅकेट व रेव्ह पार्ट्यांचा नंगानाच रोखण्यात सरकारला यश येईल हे नक्की.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -