रस्त्याच्या कडेला गोळ्या झाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
जालंधर : पंजाबच्या (Punjab News) जालंधरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या स्थानिक नागरिकांनी काल रस्त्याच्या कडेला गोळ्या झाडलेल्या अवस्थेत एक मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना दिली. तो मृतदेह डीएसपी दलबीर सिंग देओल (DSP Dalbir Singh Deol) यांचा असल्याचं आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संगरूरमध्ये तैनात असलेल्या डीएसपींचा बस्ती बावा खेल कालव्याजवळ पडलेला मृतदेह पाहून त्यांचा खून (Murder) करण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएसपी दलबीर सिंग देओल संगरूर येथे तैनात होते. मृतदेह सापडला तेव्हा त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. पंजाब पोलिसांना प्रथमदर्शनी हा अपघात असेल असे वाटले. मात्र, पोस्टमॉर्टममध्ये देओल यांच्या गळ्यामध्ये गोळी अडकल्याचे आढळून आले. घटनेनंतर त्यांचे सर्व्हिस पिस्तूलही गायब असल्याचे निदर्शनास आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जालंधरमधील एका गावात डीएसपी देओल यांचे काही लोकांशी भांडण झाले होते. यावेळी त्यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी गावकऱ्यांशी समेट घडवून आणला.
दुसरीकडे देओल यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री न्यू इयर पार्टीनंतर त्यांनी देओल यांना बस स्टँडच्या मागे सोडले होते. घटनेच्या वेळी देओल यांच्यासोबत त्यांचे रक्षक उपस्थित नव्हते. या प्रकरणी पंजाब पोलीस बसस्थानकाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. देओल यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे, जेणेकरून त्यांच्या मृत्यूशी संबंधित कोणताही सुगावा मिळू शकेल.
दरम्यान, दलबीर सिंग हे एक प्रसिद्ध वेटलिफ्टर होते आणि त्यांना अर्जुन पुरस्काराने (Arjun Awardee) सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस त्यांच्या मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.