सेवाव्रती: शिबानी जोशी
राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या पुण्यात सर्वत्र कार्य करत होत्या. मात्र आणीबाणीच्या काळानंतर अधिकच एकत्र जमून काहीतरी ठोस कार्य करण्याची गरज पुण्यातल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आणि त्यातूनच जिजामाता स्मारक समिती स्थापना झाली. अबला म्हणवल्या जाणाऱ्या स्त्रीचा आत्मविश्वास जागृत करणे व समाजाशी सर्वांगानी संपर्क साधण्यासाठी सेवाभावी संस्थांची जरुरी आहे हे लक्षात घेऊन जिजामाता स्मारक समितीची स्थापना १० ऑक्टोबर १९७९ ला झाली. सुरुवातीला एका लहान जागेत संस्थेच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर पुण्यातील शुक्रवार पेठेतील ‘भारत भवन’ येथे एका मजल्यावर संस्थेचे काम चालते. या संस्थेच्या अंतर्गत शिक्षण, ज्ञानसंवर्धन, संरक्षण, आर्थिक स्वावलंबन असे उपक्रम सुरू करावेत असा मानस होता.
स्त्रिया व मुलांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, शारीरिक विकास होण्याच्या दृष्टीने उपक्रम सुरू करणे. या उद्दिष्टाला धरून बालवाडी, वाचनालय, आर्थिक स्वावलंबनासाठी गृहउद्योग असे उपक्रम सुरू करण्याचे ध्येय ठरवले गेले होते. संस्था स्थापनेसाठी वंदनीय ताई आपटे, सुमती चितळे, सौभाग्यलक्ष्मी आगाशे, नंदिनी जोशी या सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक रोपटे लावले. आता ते हळूहळू मोठ्या वृक्षात रूपांतरित होत आहे. स्थापनेनंतर विविध प्रकारचे सामाजिक काम महिलांसाठी हाती घेण्यात आले.
१९८४ मध्ये वंदनीय ताईंची ७५ वी होती. त्यानिमित्त ७५हून अधिक काॅर्पोरेशनच्या व खासगी शाळांमध्ये २-३ तासांची शिबिरे घेतली. संस्थेला ज्या राजमाता जिजाऊ यांचे नाव दिलं गेलं आहे त्या जिजामातांच्या पुण्यतिथीला गेल्या ३० वर्षांपासून मानवंदना दिली जाते. वंदनीय ताईंच्या स्मृती दिनी दरवर्षी सेवाव्रती व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. १९९४ ला पुण्यात मोठ्या प्रमाणात चेतना परिषद झाली होती, त्यात संस्थेचा प्रामुख्याने सहभाग होता.
सूर्य नमस्काराचे महत्त्व मुलांना कळावे यासाठी एक वर्ष सूर्य नमस्कार महायज्ञ केला होता. संस्थेचा २००३ ला रौप्य महोत्सवी वर्ष होते. त्यानिमित्तही महिलांसाठी विविध कार्यक्रम झाले. जिजामाता या आदर्श माता होत्या.त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी महिलांसाठी विविध स्पर्धा होतात. पूर्वी संस्था कार्यालयात होत असलेल्या स्पर्धा आता पुणे खूप विस्तारले असल्याने त्या विभागवार व भागश: होतात. म्हणजे पुण्याच्या उपनगरांमध्येही स्पर्धा आयोजित केल्या जातात. गृह उद्योगमार्फत १९८९पासून २०१५ पर्यंत महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शने घेतली होती. २०१५ पर्यंत हा उपक्रम सुरू होता. बालवाडीसोबत संस्कारवर्ग होते. काॅर्पोरेशनच्या खाशाबा जाधव शाळेत दरवर्षी तीन वेळा आरोग्य शिबीर व औषधोपचार व आहार जागृती केली होती. २०२० च्या श्रावण महिन्यापासून एकादशीला गीतापठण सुरू केले आहे. नंतर गीता-गीताई पठण केले. २०२१ पासून सर्वसामान्यांसाठी गीता, ऋषींचे व संतांचे सामाजिक कार्य, सेवाभावी संस्थांचा परिचय अशा विषयांवर व्याख्याने घेत आहेत.
७५ व्या स्वातंत्र्य वर्षात दर महिन्यात एक व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्याचा मोठा समारोप केसरीवाडामध्ये करण्यात आला होता. २ जानेवारीला अयोध्येला श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होत आहे, याचनिमित्ताने गेल्या दिवाळीत आकाशकंदील महिलांमार्फत करण्यात येऊन त्याची विक्री केली गेली. ‘राम मंदिरात, राम मनामनात व राम घराघरात’ या संकल्पनेत दिवाळीत आकाशकंदील केले. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘वाचाल तर वाचाल’ असे आपण म्हणतो.
महिलांनी स्वतःच्या घरगुती कामातून वेळ काढून वाचन करावे आणि स्वतःला विचार समृद्ध करावा या हेतूने वाचनालय स्थापना ४ डिसेंबर १९८२ रोजी झाली.
हे महाराष्ट्र सरकारमान्य मुक्तद्वार वाचनालय आहे. काही दिवाळी अंक व ३५० पुस्तकं एव्हढ्या साहित्यावर सुरू केलेल्या वाचनालयात सध्या १८००० पेक्षा जास्त पुस्तके आहेत. तर ५० नियतकालिके येतात. येथे दरवर्षी साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या वाचनालयाला शासन मान्यताप्राप्त असून इतर ‘ब’ या वर्गात आहे. वाचनालयाची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० अशी आहे. ‘स्त्री’विषयक वाङ्मय, रामायण, महाभारतावरील पुस्तके आणि इतर संदर्भ ग्रंथ जास्तीत जास्त वाचकांना उपलब्ध करून दिली जातात. सुमारे २०० च्या वर संदर्भ ग्रंथ आहेत. दरवर्षी दिवाळी अंक योजना ही सुरू असते. काळाप्रमाणे बदल घडवत आता ज्येष्ठ नागरिक किंवा लांब राहणाऱ्यांना पुस्तके वाचण्यास मिळावी यासाठी ‘घरपोच योजना’ सुरू केली आहे. यासाठी ४-५ ठिकाणी ग्रंथ देव-घेव व दिवाळी अंक देव-घेव चालू आहे.
वाचनालयातर्फे काही सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. गुढीपाडवानिमित्त गीता धर्म मंडळात मीनाताई कानडे यांच्या अध्यक्षतेखाली मंजिरीताई कोल्हटकर यांचे विजय पथ चाल रे या विषयावर व्याख्यान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ज्योत्स्ना सरदेशपांडे यांचं ‘एक असामान्य व्यक्तिमत्त्व’ या विषयावर ओघवत्या भाषेत व्याख्यान, डॉ. रंगनाथन जयंतीनिमित्त अद्वैता उमराणीकर यांचे ‘स्वातंत्र्यशाहीर गोविंद’ या विषयावर व्याख्यान, १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्यदिनी सरिताताई बापट यांनी राष्ट्रध्वजावर कसे प्रेम करावे अशी विविध व्याख्यानं आयोजित केली जातात. त्याशिवाय डॉ. अब्दुल कलाम जयंती व वाचक प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो.
भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात येतात. यंदा या स्पर्धेत १२५ जणींनी भाग घेतला होता. २०१० पासून आरोग्य शिबिरे घ्यायला सुरुवात केली आहे. हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी, त्यासाठी औषधोपचार हे शिबिरांत सामाविष्ट असते. वस्ती भागात सुमारे २००० स्त्रियांची तपासणी केली तसेच स्तन कॅन्सरसाठी व थायरॉइडसाठी तपासणी केली जाते. स्त्रियांच्या आरोग्याच्या जागरूकतेसाठी या शिबिरांचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षभर दर एकादशीला ऋषीवंदना व समाज प्रबोधक संत या विषयावर ऑनलाइन व्याख्याने केली आहेत. गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मणीकाम व क्रोशाचे काम यांच्या स्पर्धा घेतल्या गेल्या. यात ४० गृहिणींनी भाग घेतला. तसेच लहान मुलींसाठी चित्रकलेची स्पर्धा घेतली. ही स्पर्धा ९ ठिकाणांहून घेतली ज्यात २९० मुलांनी भाग घेतला.
गेली चार वर्षे समितीतर्फे गौरी सुशोभन स्पर्धा घेतली जाते. यावर्षी ही स्पर्धा घेताना पर्यावरणपूरक व स्वतःचा वेगळेपणा असणारा १.३० ते २ मिनिटांचा व्हीडिओ मागवला होता. या स्पर्धेत बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून नाशिक, जळगाव, धुळे, नांदेड, मंगळवेढा, भोर, वाई, सातारा, ठाणे, तळेगाव, चिंचवड, पौडगाव, बावडा, अगदी इंदूर, बिलासपूर येथून ५९ व्हीडिओ व १४ फोटो आले होते. महिलांना स्वयंरोजगार मेळावा यासाठी गृह उद्योग विभाग संस्थेतर्फे सुरू करण्यात आला. या अंतर्गत महिलांकडून खाद्यपदार्थ बनवून घेऊन त्याची विक्री केली जाते. यंदा जिजामाता गृहउद्योगातर्फे विक्रीस ठेवल्या होत्या.
हळद, तिखट, हिंग, जिरे, मोहरी, मसाला, कांदा-लसूण मसाला, उपवास भाजणी, साधी भाजणी, शिंगाडा पीठ, शिकेकाई, शेवया, बटाटा पापड, कुरडई, तांदूळ, पापडी, मिरगुंड, साबुदाणा पापडी, इ. हळद अशा वस्तू विक्रीस ठेवल्या होत्या. अंदाजे ६२० किलो, तिखट ७७५ किलो इतर पदार्थांची विक्री झाली. पुणे आता खूप पसरत असल्यामुळे वारजे, बाणेर, बावधन या ठिकाणीही मालाची विक्री करण्यात आली. उत्तम दर्जा, वाजवी भाव यामुळे मालाला खूप उठाव आहे. या खरेदी-विक्रीमुळे अनेक माणसंही जोडली जातात. सध्या एकूण २५ विक्री केंद्रे आहेत व अजून ती वाढवायचा प्रयत्न आहे. विक्रीच्या कामात कोणाला मदत करायची असेल तर माल घरपोच मिळेल अशी योजना ही आता सुरू केली आहे. महिलांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावं यासाठी योगासनाचे वर्ग संस्थेने सुरू केले आहेत.
यंदा १४ ते २१ जून असे १५ दिवस रोज ऑनलाइन वर्ग झाले. योग थेरपी संबंधी माधुरी केळकर यांनी माहिती दिली. ५ जुलैपासून सोमवार, बुधबार, शुक्रवारी सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत ऑनलाइन वर्ग घेतले. २००८ पासून जिजामाता सभागृहात नीलाताई पारखी निरपेक्षपणे योगवर्ग घेतात. २०-२५ जणी याचा लाभ घेतात. दोन वर्षांपासून निःशुल्क ऑनलाइन योग वर्ग असतो, त्यात साधारण ५० उपस्थिती असते. महिलांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्यासाठी शिवण वर्ग सुरू करण्यात आले. सध्या कर्वेनगर व धायरी भागात शिवण वर्ग सुरू आहेत. धायरीमध्ये ८ जणींनी प्रशिक्षण घेतले आणि आणि आता ७ जणींनी अनसूया शिवणगट करून त्यामार्फत शिलाई काम सुरू केले आहे. कर्वेनगरमध्ये ही शिलाई कामं सुरू झाली आहेत.
महिला आर्थिक सक्षम होण्याच्या दिशेने वर्ग वाटचाल करत आहे. ही सर्व कामे करण्यासाठी निरलसपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्या लागतात. सध्या कार्यकारी मंडळात अध्यक्ष आशा साने, उपाध्यक्ष विभावरी वैद्य, कार्यवाहिका म्हणून प्रगती महाजन काम पाहत आहेत. वाचनालय कार्यवाहिका गृहउद्योग विभावरी वैद्य, आरोग्य विभाग राधिका भोजराज, खजिनदाराचे मोलाचे काम स्मिता पांडे पाहत आहेत. अशा रीतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवणवर्ग, गृहउद्योग, योगा वर्ग, वाचनालय, विविध धार्मिक, अाध्यात्मिक कार्यक्रम, व्याख्यान आयोजित करून समाजातील वंचित, दुर्बल, गरीब महिलांच्या विकासासाठी गेली ४४ वर्षे संस्थेतील महिला कार्यकर्त्या निरलसपणे काम करत आहेत.
joshishibani@yahoo. com