Monday, June 30, 2025

रायगड जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी

रायगड जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी

पेणमधील अनेक पेट्रोल पंपात पुरेसे इंधन


पेण : केंद्र शासनाच्या वतीने वाहन चालकांच्या संदर्भात हिट अँड रनच्या नवीन धोरणाच्या निषेधार्थ देशभरासह महाराष्ट्रातील अनेक वाहन चालकांनी तीन दिवसीय संप पुकारलेला होता. या संपामध्ये पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे चालक देखील सहभागी झाल्याने पुढील काही दिवस पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवेल या भीतीनं पेणसह रायगड जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर अचानक वाहनधारकांनी गर्दी केली. वाहतूक बंद असल्याने अनेक पेट्रोल पंपावरचा डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा संपत आला आहे. तर, काही ठिकाणी शिल्लक असलेल्या पेट्रोल डिझेल मिळावा यासाठी वाहनधारकांनी एकच गर्दी केलेली आहे.



ट्रक आणि टँकरच्या संपामुळे राज्यातील अनेक पेट्रोल आणि डिझेलचे टँकर कंपनी व पेट्रोल पंपावर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर इंधन पोहोचू शकले नसल्याने यापुढे देखील संप सुरूच राहिला तर पेट्रोल डिझेल इंधन मिळणार नाही या भीतीने अनेकांनी आपल्या गाड्यांमध्ये जादाचा पेट्रोल टाकण्यासाठी पेणसह अलिबाग, नागोठणे, रोहा, महाड, पोयनाड, पाली, खोपोलीसह रायगड जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर गर्दी केली होती.


पेण शहरातील पेट्रोल पंपामध्ये सध्याच्या स्थितीला पुरेसे इंधन असल्याने या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी लाईन लागली असली तरी जोपर्यंत पंपामध्ये पेट्रोल आहे, तोपर्यंत आम्ही जनतेला सेवा देत राहणार असल्याचे पेण मधील सर्वच पेट्रोल पंपाचे मालक सांगत आहेत. पंप मालकांच्या या लोकहितवादी निर्णयाचे पेणकरांनी स्वागत केले आहे.

Comments
Add Comment