केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घातली युवकांना उद्योगासाठी साद
मुंबई : देशाचा जीडीपी वाढला पाहिजे. व्यवसाय व रोजगार वाढला पाहिजे. त्यामध्ये महाराष्ट्राचा अग्रक्रम पाहिजे. युवकांनी आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा वापर हा उद्योग व्यवसाय निर्मितीसाठी करून इतरांना रोजगार दिला पाहिजे. युवकांना व्यवसाय करण्यासाठी जे जे मार्गदर्शन लागेल, कर्जासाठी मदत लागेल, त्यासाठी त्यांनी दिल्ली, मुंबई तसेच कोकणातील माझ्या कार्यालयात येवून मला हक्काने हाक मारा, मी माझ्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या मदतीला नक्कीच ओ देईल व त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात केले.
दै. पुढारीच्या ठाण्यातील एका कार्यक्रमात उपस्थित युवकांना प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मार्गदर्शन करताना तरूणाईला व्यवसाय करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर यांच्यासह विविध राजकीय घटक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
युवकांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की, मी आयुष्याच्या वाटचालीत गरीब तसेच श्रीमंत घरातील युवकांना जवळून पाहिले. बुद्धीमत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही. ती श्रीमतांच्या तसेच गरीबांच्या घरातही जन्माला येत असते. याचे जिवंत उदाहरण आपणापुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. प्रत्येक युवकाने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. ते स्वत: रस्त्याच्या दिव्याखाली शिक्षण घेत परदेशात जावून बॅरिस्टर होवून आले. शिकण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी शिक्षण घेतले, यातून प्रत्येकाने प्रेरणा घेत जीवनात वाटचाल केली पाहिजे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यावेळी म्हणाले.
तामिळनाडू, गुजरातसह अन्य राज्याच्या ग्रामीण भागातील मुले टेक्नॉलॉजीत प्रगत आहेत. आपल्याकडेही हीच परिस्थिती आहे. पण त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. व्यवसाय की रोजगार यात गुंतून न राहता वेळीच निर्णय घ्यावा. कोणता व्यवसाय करावा, कोणत्या व्यवसायाला अधिक मार्केट मिळेल, अधिक नफा मिळेल, अनेकांना रोजगार देता येईल, कोणत्या बँकेत कर्ज मिळेल, याचा युवकांनी अभ्यास करावा. आज देशाच्या निर्यातीमध्ये ५० टक्के सहभाग माझ्याकडे असलेल्या खात्यांचा आहे. देशाच्या जीडीपीपैकी एकून ३० टक्के जीडीपी हा माझ्या विभागांचा आहे. पंतप्रधान मोदींमुळे देश जगात तिसऱ्या क्रमाकांवर आलेला आहे. पंतप्रधान मोदी हे जीडीपी वाढविण्यासाठी वारंवार आढावा घेत असतात. मी माझ्या विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून आपल्या खात्याची निर्यात ५० टक्क्यांवरून ६५ टक्के आणि जीडीपी ३० टक्क्यांवरून ४५ टक्के वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य आपण करणार असल्याचे त्यांना सांगितल्याचे यावेळी नारायण राणे यांनी सांगितले.
देशाच्या विकासाचेआव्हान मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी स्विकारले पाहिजे. प्रत्येक भारतीयांनी त्यात योगदान देणे आवश्यक आहे. युवकांना व्यवसायांना समर्पित होत अधिकाधिक रोजगार निर्मिती केली पाहिजे. व्यवसायात आवड असेल तर आवडीला मुरड न घालता व्यवसाय करा. आपल्या व्यवसायाचा टर्न ओव्हर वाढवा. भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी व्यवसायात झोकून द्या, असे आवाहन नारायण राणे यांनी युवकांना केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्याची प्रशंसा केली. मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री या पदावर कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात दिलेल्या यागेदानाचा आढावा घेताना ठाणे जिल्ह्याच्या विकासात नारायण राणे यांचे योगदान मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सोलापुर विभागातील एक मुलगा हातात पिशवी घेवून आपणास भेटायला आला. बीएस्सी झालेला मुलगा होता. दोन-तीन वर्षे नोकरी केली, पुरेसा पगार नव्हता. हातात असलेली पिशवी हीच त्याची शिल्लक होती. त्याने मला संवादामध्ये उद्योग करण्याची इच्छा व्यक्त करून मदत करण्यास सांगितले. मी त्या मुलाची चौकशी केल्यावर आपण एका पदार्थापासून ऑईल बनवू शकतो व त्या ऑईलला जर्मनीत मार्केट असल्याचे सांगितले. त्याच्याकडे व्यवसायासाठी जमिन होती. मी अधिकाऱ्यांना बोलावून त्याला कर्ज उपलब्ध करून देण्यास सांगितले. आज तो एक चांगला उद्योजकअसून अनेकांना रोजगार देत आहे. ही आठवण सांगताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवकांनी आपणशी संपर्क करावा. त्यांना व्यवसायासाठी लागेल ती मदत व मार्गदर्शन आपण तात्काळ उपलब्ध करून देवू असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.