Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीBMC नोकरी सोडून वर्षाला ३ कोटी कमवणारा कोण हा अवलिया?

BMC नोकरी सोडून वर्षाला ३ कोटी कमवणारा कोण हा अवलिया?

मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचारी सुनील चौहान यांनी नोकरी सोडून कागदी पिशव्या निर्मितीचा उद्योग सुरू केला. आज त्यांनी स्वतःच्या हिमतीवर तीन कोटींच्या वर उलाढाल असलेला व्यवसाय उभा केला. आपल्या खडतर प्रवासाविषयी चौहान यांनी प्रहारच्या गजाली कार्यक्रमात दैनिक प्रहार टीम सोबत संवाद साधला. यावेळी दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनीष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

वेड व्यवसायाचे…

तेजस वाघमारे

गुजराती म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर उद्योगधंदा करणारा माणूस उभा राहतो. नोकरी करण्याऐवजी व्यवसायाला प्राधान्य देणारे अशी ओळख गुजरात, राजस्थान आदी राज्यांतील नागरिकांनी स्व:कर्तृत्वाने निर्माण केली आहे. त्यापैकी एक म्हणजे सुनील चौहान. मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळविण्यासाठी काही जण वशिलेबाजी लावतात. पण महापालिकेतील नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय उभारणाऱ्या चौहान यांनी उद्योगपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून त्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

१९१२ मध्ये सुनील चौहान यांचे आजोबा नोकरीसाठी गुजरातहून मुंबईत आले. मुंबई महानगरपालिकेकडून मोफत वीज, पाणी, राहण्यास घर मिळाल्याने त्यांनी सफाई कामगाराची नोकरी स्वीकारली. त्यानंतर सुनील चौहान यांच्या वडिलांना महानगरपालिकेत नोकरी मिळाली. वडिलांच्या जागी आईलाही नोकरी मिळाली. बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले असल्याने सफाई कामगाराची नोकरी करायची नसल्याचे त्यांनी ठरवले होते; परंतु २००५ मध्ये आईचे निधन झाल्याने अखेर त्यांना महापालिकेत नोकरी स्वीकारावी लागली. त्यावेळी ३ हजार ८०० रुपये पगार होता. या पगारात कुटुंब चालविणे कठीण होते. याबाबतची तक्रार कामगार आयुक्तांकडे केली. समान काम करणाऱ्या लोकांमध्ये पगाराची मोठी तफावत होती. त्यामुळे लोकांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाकडे तक्रार केली. या सोबतच महापालिकेतील कामगार संघटनांना पत्र दिले. पण पदरी निराशा आली. हार न मानता पुन्हा आयोगाला पत्रव्यवहार केला, पण राज्याच्या तत्कालीन सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवल्याने सफाई कर्मचाऱ्यांची परिस्थिती आयोगाला पाहता आली नाही. याबाबत सचिवांशी संपर्क केल्यानंतर अखेर आयोगाने मुंबईला भेट दिली. याप्रसंगी कामगारांची स्थिती प्रत्यक्ष पाहून आयोगाला धक्का बसला. महापालिका सरकारी यंत्रणा दाद देत नसल्याने न्यायासाठी चौहान यांनी स्वतःची सफाई कामगार विकास संघ नावाने संघटना स्थापन करून सफाई कर्मचाऱ्यांच्या समान काम, समान पगाराची मागणी लावून धरली. अखेर महापालिका प्रशासनाला खाडा बदली धोरण गुंडाळावे लागले. पगाराचा लढा यशस्वी झाल्यानंतरही ते शांत बसले नाहीत. सफाई कर्मचाऱ्यांच्या व्यसनमुक्तीसाठी आठवड्यातील एक दिवस ते या कामगारांसाठी देतात.

महापालिकेच्या नोकरीत मन रमत नसल्याने राजीनामा देत सुनील चौहान यांनी कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कपड्याचे दुकान टाकले आणि दुसऱ्या महिन्यापासून देशभरात नोटाबंदी लागू झाली. यामुळे सहा महिने तोट्यात व्यवसाय करावा लागला. या अनुभवाने डगमगून न जाता कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी पुन्हा व्ययसाय सुरू केला. यासाठी एमएसएमईमधून केंद्र सरकारचे अनुदान मिळवले. भिवंडी येथे कागदी पिशवी बनविण्याचा कारखाना सुरू केला. मार्केटिंगचे स्किल अंगी असल्याने त्यांनी दुकाने-हॉटेल यांना भेट देऊन ग्राहक मिळवले. या व्यवसायात त्यांचा मुलगा, कुटुंबातील व्यक्ती हातभार लावत असल्याने त्यांच्या उद्योगाची भरभराट झाली आहे. मेहनत करण्याची जिद्द आणि विश्वास असल्यास कोणीही उद्योगात अपयशी होणार नसल्याचे ते सांगतात.

राजस्थान, उत्तर प्रदेशमधील लोक मुंबईत येऊन चार-पाच वर्षांत करोडपती होतात. मग मी का उद्योगपती होऊ नये, अशी जिद्द लोकांनी करायला हवी. व्यवसाय सुरू करण्यासाठी गुजराती लोक पटापट निर्णय घेतात. तसे मराठी लोक निर्णय घेत नाहीत, अशी खंत ते व्यक्त करतात. व्यवसायात क्वालिटी आणि कमिटमेंट असेल तर कोणताही व्यवसाय मुंबईत वाढू शकतो, असे त्यांचे मत आहे. या व्यवसायाबरोबर चौहान यांनी स्वतःचा मसाले ब्रँड निर्माण करण्याची तयारी सुरू केली असून लवकरच हा व्यवसाय सुरू होईल, असे नियोजन त्यांनी केले आहे.

सफाई कामगार ते व्यावसायिक

वैष्णवी भोगले

नेहमी हजारो टन कचरा, टाकलेलं अन्न, प्लास्टिक, बाटल्या, रस्त्यावर मारलेल्या पिचकाऱ्या हे स्वच्छ करणारे हजारो हात आहेत. शहराचा रोज घाण होणारा चेहरा साफ करण्याचा प्रयत्न प्रत्येक सफाई कामगार करत असतो. ते करत असतानाच सुनील चौहान यांनी व्यावसायिक क्षेत्रात पाऊल ठेवले. कठोर मेहनतीच्या जोरावर ते पूर्णही केले. महापालिकेत सफाई कामगार म्हणून काही वर्षे काम करणारे सुनील चौहान यांनी नोकरीला अलविदा ठोकत कागदी पिशव्यांचा व्यवसाय सुरू केला आणि आज ते अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.

कौटुंबिक परंपरेने आलेले सफाई कामगाराचे काम काही वर्षे केल्यानंतर त्यानंतर मात्र सुनील चौहान यांनी ते थांबवले. त्यांचे आजोबा महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करायचे. हे काम पिढीजात असल्याने त्यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव झाली होती. पण आपण या चाकोरीत न अडकण्याचा मानस सुनील चौहान यांनी केला.

मुंबईतला प्रत्येक व्यक्ती हा सूट बूट घालून काम करतो. मात्र आपण शिक्षित असूनही सफाई कामगार म्हणून का काम करत राहायचे? असा विचार ते नेहमी करायचे. आपल्या मुलाला हे काम करायला लागू नये म्हणून त्यांनी आपल्या मुलाला शिकवले. आज तोही आपल्या व्यवसायात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पाड पाडत असल्याचे चौहान सांगतात.

कोरोना काळात अनेकांचे नोकरी, व्यवसाय बंद झालेले होते. त्या काळात त्यांनी कागदी पिशव्यांचे प्रशिक्षण घेऊन कागदी पिशव्यांचा व्यवसाय सुरू केला. कोणताही व्यवसाय सुरू करताना जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी, भांडवल आणि प्लॅनिंग असणे गरजेचे असते, असे सुनील चौहान यांनी सांगितले. आज सफाई कामगार ते कागदी पिशव्यांचे मालक म्हणून सगळ्यांसाठी ते आदर्श व्यक्तिमत्त्व बनले आहेत.

ठाणे, मस्जिद बंदर, वाशी, माटुंगा अशा अनेक ठिकाणी त्यांच्या कागदी पिशव्या, कागदी स्ट्रॉ, कंटेनर, चमचे, टिश्यू पेपर यांना मागणी आहे. आज ८० हॉटेल्समध्ये त्यांनी कागदापासून बनवलेल्या वस्तूंची विक्री होते. त्यांच्या या व्यवसायाची ३ कोटींहून अधिक उलाढाल होत आहे. या सोबतच ते सफाई कामगारांचे प्रश्न शासनासमोर मांडतात. सफाई कामगार आपल्या हक्कांपासून वंचित राहू नये यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सफाई कामगारांची वेतन वाढ, महिलांची सुरक्षितता, सफाई कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण, राहण्याची व्यवस्था अशा अनेक प्रश्नांसाठी ते संघटनांसोबत कार्य करत असतात.

सफाई कामगाराची उद्योजकतेकडे यशस्वी भरारी

सीमा पवार

मुंबई पालिकेत काही वर्षे सफाई कामगार म्हणून काम करणारे सुनील चौहान यांनी आज आपली एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली आहे. सफाई कामगार म्हणून मिळालेल्या कामाचे त्यांना समाधान नव्हते. हे काम सोडून त्यांनी उद्योग क्षेत्रात झेप घेतली. आज कागदी पिशव्यांचा उत्पादक म्हणून त्यांच्याकडे अभिमानाने पाहिले जाते.

जाफ्राबाद येथून त्यांचे आजोबा मुंबईत दाखल झाले. अन्न, वस्त्र, निवारा मिळणार होता म्हणून आजोबांनी मुंबई पालिकेत सफाई कामगार म्हणून कामाला सुरुवात केली. आजोबांनंतर वडिलांनीही तीच नोकरी पत्करली. वडिलांनंतर मी स्वतःही तीच नोकरी करण्यास सुरुवात केली. पण मन तयार होत नव्हते. का मी दुसऱ्याची घाण साफ करायची असे अनेकदा मनात येऊन गेले. त्यात जे सगळ्यात खालच्या थराचे काम करत असताना हातात मात्र तितका पगार येत नव्हता. परत हे असे का? यामुळे संताप व्हायचा. अखेर बंड केले आणि मैदानात उतरलो. बरीच वर्षे संघर्ष केला. पण अखेर घरातल्या तीन माणसांना सुखाचे त्याहीपेक्षा समाधानाचे आयुष्य जगता येईल असा हक्काचा पगार मिळवला. पण त्यानंतर ठरवले, आता बस ही घाण मी नाही उचलणार आणि नाही माझ्या मुलाला उचलायला लावणार, असा पक्का निश्चय केला. अखेर त्या घाणीतून बाहेर पडलो आणि स्वतःच्या व्यवसायाकडे वळलो. कपड्याचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली आणि नंतर प्लास्टिकच्या पिशव्या बंद होणार आहेत तू कागदाच्या पिशव्या तयार कर असे अनेकांनी सुचविले. मग ठरले आणि सुरुवात केली. २०१७ मध्ये बीएमसीला राजीनामा दिला आणि बाहेर पडलो. त्यानंतर पाठीमागे वळून पाहिलेच नाही आणि आज वर्षाला ३ कोटींच्या वर टर्नओवर असलेला एक उद्योजक म्हणून उभा आहे. बीएमसीमधून काही वर्षांनंतर बाहेर पडलो त्यावेळी सरकारी नोकरी सोडल्याचा कोणताही पश्चाताप नव्हता. या उलट सोडल्याचा अधिक आनंद होता. रस्त्यावर एखादा गर्दुला घाण करतो आणि ती आम्ही साफ करायची अशी परिस्थिती जेव्हा येते त्या व्यक्तीला सगळं करण्याची हिंमत आपोआप येते. मुख्य म्हणजे ही मुंबई आहे, हे विसरून चालणार नाही. तुमच्यामध्ये ती हुशारी असेल तर ही मुंबई तुम्हाला इथे यशस्वी करतेच. असे सांगताना सफाईच्या कामाचा राजीनामा दिला आिण व्यवसायाकडे वळलो यासाठी कौतुकाची थाप केंद्रीय सूक्ष्म, लघू आिण मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडून मिळाली हे सांगताना एक विशेष समाधान सुनील चौहान यांच्या चेहऱ्यावर होते.

भिवंडीमध्ये त्यांनी जागा घेतली आणि कागदी पिशव्यांचा उद्योग सुरू केला. आज मुंबईतील अनेक हॉटेल्सला ते आपला माल पोहोचवतात. यात मागणीप्रमाणे कागदी पिशव्या, कंटेनर, स्ट्रॉ, बाउल्स अशा कागदापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचा समावेश आहे. हा व्यवसाय उभा करण्याकरिता चौहान यांना सुरुवातीला बरीच मेहनत घ्यावी लागली. माझे प्रोडक्ट किती महत्त्वाचे आणि गरजेचे आहे हे समोरच्याला पटवून देण्याचे कसब आपल्यात असेल तर ती वाट अडखळत नाही. उलट मार्ग आपोआप दिसतो. फक्त त्या वाटेवरून जाताना आपल्यातला प्रामाणिकपणा जपायचा असतो. ग्राहकाने केलेली मागणी आणि तुम्ही दिलेला शब्द कोणतेही संकट आले तरी ते वेळेत पूर्ण करा, हे व्यवसायाचे यशस्वी सूत्र आहे. ते सुनील चौहान यांनी पाळले आणि आज ते एक यशस्वी उद्योजक म्हणून उभे आहेत. हे करत असताना सामाजिक कार्याकडेही त्यांचा कल आहे. कारण जिथून ते बाहेर पडले तिथून अनेकांनी बाहेर पडावे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -