नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या (New Year 2024) उत्साहासोबत कोरोनानेही (Corona) सर्वांची धाकधूक वाढली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८४१ नवे रुग्ण आढळले असून गेल्या सात महिन्यांतील एका दिवसांत विक्रमी रुग्णांची संख्या वाढण्याचा हा उच्चांक आहे. या आठवड्यात (२४-३० डिसेंबर) भारतात कोरोनाचे ४६५२ रुग्ण आढळले. गेल्या आठवड्यात हाच आकडा ३८१८ होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाचा नवा प्रकार जेएन.१ (JN.1) च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढत होत आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे याची लक्षणे सौम्य आहेत.
जागतिक स्तरावरही रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जागतिक स्तरावर, यूएस, काही युरोपीय देश, सिंगापूर आणि चीनमध्ये जेएन.१ च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या उत्साहासोबतच कोरोनाची भितीही सर्वांच्या मनात आहे. भारतात आतापर्यंत जेएन.१ चे एकूण १७८ रुग्ण आहेत. ज्यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक ८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांच ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अलीकडेच, दिल्लीमध्येही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सब-व्हेरियंट जेएन.१ चा पहिला रुग्ण आढळला. मात्र, उपचारानंतर आता हा रुग्ण बरा झाला आहे. येत्या काही दिवसांत कोविड विषाणूच्या नवीन प्रकारांचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
दरम्यान, डब्ल्यूएचओमधील एका डॉक्टरांनी शनिवारी बोलताना सांगितले की, “मर्यादित अहवाल देणाऱ्या देशांमधून, कोविड-१९ हॉस्पिटलायझेशन आणि आयसीयूमध्ये गेल्या महिन्याभरात ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ते पुढे म्हणाले की, कोविड, इन्फ्लूएंझा आणि इतर श्वसन रोगांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी उपाय योजले पाहिजेत.