Friday, March 21, 2025
Homeक्राईमAnjali Patil : अभिनेत्री अंजली पाटील ठरली 'ड्रग इन पार्सल'ची शिकार; तब्बल...

Anjali Patil : अभिनेत्री अंजली पाटील ठरली ‘ड्रग इन पार्सल’ची शिकार; तब्बल ५ लाखांची झाली फसवणूक

मुंबई : हल्ली सायबर क्राईममध्ये (Cyber crime) प्रचंड वाढ झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने लाखो करोडो रुपयांची फसवणूक (Online Fraud) करण्यात येते. सामान्य माणसांसह अनेक सेलिब्रिटीजही (Celebrities) या फसवणुकीची शिकार होत आहेत. त्यातच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री अंजली पाटील (Anjali Patil) देखील या फसवणुकीला बळी पडली आहे. अंजलीची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

सध्या ‘ड्रग इन पार्सल’ (Drug in Parcel) पद्धत वापरुन अनेकांची फसवणुक होत आहे. या पद्धतीने अंजलीही या सापळ्यात अडकली आणि ५ लाख रुपये गमावून बसली. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्याने त्याच्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे भासवून अंजलीची फसवणूक केली. एवढंच नाही तर त्याने अंजलीला तीन बँक खात्यांमध्ये मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात गोवले.

नेमकं काय घडलं?

अंजलीला २८ डिसेंबर रोजी दीपक शर्मा नावाने एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्याने FedEx कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याने अंजलीला सांगितले की, तिच्या नावाने तैवानला जाणाऱ्या एका पार्सलमध्ये ड्रग्ज होते, त्यामुळे कस्टम विभागाने हे पार्सल जप्त केले. या पार्सलमध्ये अंजलीच्या आधार कार्डची प्रत सापडल्याचा दावा त्याने केला. आधार कार्डचा गैरवापर झाला आहे, त्यामुळे तू मुंबई गुन्हे विभागाशी संपर्क साध, असा सल्ला त्याने अंजलीला दिला.

पुढे फोन कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर काही वेळातच अंजलीला स्काईपवर बॅनर्जी नावाच्या एका व्यक्तीचा कॉल आला. ज्याने आपण मुंबई गुन्हे विभागाचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने अंजलीचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणाशी जोडले. तिचे आधार कार्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या तीन बँक खात्यांशी जोडले गेले होते, असं तो म्हणाला. त्याच्या पडताळणी प्रक्रियेसाठी, त्याने ९६,५२५ रुपये प्रक्रिया शुल्क मागितले. अंजलीने देखील त्याच्या नंबरवर ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केले.

यानंतर फसवणूक करणार्‍याने दावा केला की, ज्या खात्यांमध्ये तिचे आधार कार्ड मनी लाँड्रिंगसाठी वापरले गेले होते त्या बँक अधिकाऱ्यांचा या घोटाळ्यात सहभाग असू शकतो, ज्याच्या चौकशीसाठी त्याने आणखी ४,८३,२९१ रुपये मागितले. कोणताही आढेवेढे न घेता अंजलीने तिच्या खात्यातून फसवणूक करणाऱ्याच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात पैसे पाठवले. अशाप्रकारे अंजलीची तब्बल ५ लाखांची फसवणूक झाली.

घरमालकाच्या लक्षात आला फसवणुकीचा प्रकार

अंजलीने झालेला संपूर्ण प्रकार तिच्या घरमालकाला सांगितला. त्यांना या प्रकरणात फसवणूक झाल्याचा संशय आला. यानंतर अंजलीलाही आपण फसवणुकीची शिकार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने २९ डिसेंबरला पोलिसांत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणूक आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -