Monday, August 4, 2025

Thane Rave Party : ठाण्यातील रेव्ह पार्टी आयोजित करणारे तरुण केवळ १९ आणि २० वर्षांचे

Thane Rave Party : ठाण्यातील रेव्ह पार्टी आयोजित करणारे तरुण केवळ १९ आणि २० वर्षांचे

कुठून आले चरस, गांजासारखे अमली पदार्थ?


ठाणे : भारतात वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की सर्व अधिकार मिळतात. पण काही अनुचित गोष्टी २० वर्षांच्या तरुणांकडून घडणेदेखील धक्कादायक वाटते. असाच एक धक्कादायक प्रकार ठाण्यात नववर्षाच्या (New year) निमित्ताने आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीतून (Rave party) समोर आला आहे. काल रात्री पोलिसांनी धाड कारवाई करत या रेव्ह पार्टीतील मद्यधुंद असलेल्या १०० जणांवर कारवाई केली. त्यांच्या कसून केलेल्या चौकशीत या रेव्ह पार्टीचं आयोजन करणारे तरुण केवळ १९ आणि २० वर्षीय असल्याचं समजलं आहे.


ठाण्यातील घोडबंदर परिसरातील गायमूख कासारवडवली या भागात रात्री करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीत अमली पदार्थांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड कारवाई केली. नुकताच प्रौढ झालेला वर्ग या पार्टीत सामील होता. या प्रकरणी पोलिसांनी ५ तरुणींसह ९५ तरुणांवर कारवाई केली आहे.


प्राथमिक चौकशीत डोंबिवलीतील रहिवासी २३ वर्षीय तेजस कुणाल आणि ठाण्यातील कळवा येथे राहणाऱ्या १९ वर्षीय सुजल महाजन यांच्यावर पार्टी आयोजित करण्याचा आरोप ठेवला गेला आहे. त्यांनी एक हजार रुपये प्रवेश शुल्क घेऊन सदर पार्टी आयोजित केली होती. दोन्ही आरोपींनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोन पार्टी सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी पार्टीचा पत्ता आणि माहिती पोस्ट केली होती.


पोलिसांनी सांगितले की, १९ ते २० वर्षांमधील तरूण मुले पार्टीत सामील होते. त्यांनी अमली पदार्थ आणि मद्याचे सेवन केले होते. तसेच मोठ्या आवाजात गाणी लावून धांगडधिंगा सुरू होता. पोलिसांनी २०० ग्रॅम गांजा, ७० ग्रॅम चरस, ०.४० ग्रॅम एलएसडी आणि एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या आहेत. ताब्यात घेतलेले तरूण ठाणे, मीरा रोड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई येथील रहिवासी आहेत.


दरम्यान, या पार्टीत अमली पदार्थ कुणी पुरविले, याची माहिती पोलिस गोळा करत आहेत. भारतीय दंड संहिता आणि एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या १०० जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment