- हलकं-फुलकं : राजश्री वटे
ही जाहिरात बघितली की डोळ्यांसमोर यायचा वाफाळलेल्या चहाचा कप… आणी धुंद होऊन तबला वाजवणारा झाकिर!! मस्त… दिलखेचक जाहिरात… चहाबाजांसाठी तर पर्वणीच… पाहताच तल्लफ उफाळून येते चहाची…
चहाचे दर्दी खूप असतात आजूबाजूला… चहाची वेळ झाली की चुळबूळ सुरू होते चहाबाजांची… केव्हा घशाखाली गरम चहा ढकलतो याची वाट पाहत असतात हे चहाबाज! आणि गरम म्हणजे अगदी तोंडातच गाळावा इतका गरम हवा!!
चहाला कोणत्याही ठिकाणी, कुठल्याही वेळी भारी महत्त्व… त्याच्याशिवाय पूर्णत्व नाहीच बैठकीला… कडक आणी फक्कड चहा हवाच! वेगवेगळ्या ऋतूंमध्ये चहाची चव व कपाचा आकार बदलत जातो. पावसाळा, हिवाळ्यामधे अद्रकशिवाय चहा कपात पडतच नाही, नंतर पडेल घशात… गवती चहा येतो मग उकळत्या पाण्यात उडी मारायला… मग बनतो कडक मिठी चाय… अन् चहाचा भाव अधिकच वधारतो… चहाबाजांच्या नुसत्या उड्या वाफाळत्या कपावर… रतीब! उन्हाळ्यात मात्र विलायचीचा हलका स्वाद असलेला अर्धा कप चहा समाधान करून देतो! थंड पेयांची दादागिरी चालू असते. पण चहा आपली जागा सोडत नाही.
चहाचे अनेक नातेवाईक… हिरवे, पिवळे, सोनेरी, काळे धक्काबुक्की करायला अवतरलेली पण विजय कडक चहाचाच! चहा ओळखी वाढवतो, मैत्री वाढवतो… तरतरी आणतो, मरगळ घालवतो… उत्साह वाढवतो, काय काय जादू करतो… हा कप चहाचा! गप्पांच्या मैफलीत चहाचा कप अग्रेसर… मैफलीत रंग भरणारच नाही याचा कान धरल्याशिवाय… अन् ओठाला लावल्याशिवाय!! ‘च्याय पिते का बे…’ म्हटले की दोस्त खल्लास… एका पायावर तय्यार… च्याय नंबर वन !!!
मुलगी बघणे म्हणजे चहा-पोह्याचा कार्यक्रम असंच नाव पडलंय… हल्ली हॉट नाहीत… पण भेटी मात्र चहापासून सुरू होतात… पोहे सोडून अनेक पदार्थांवर येऊन लग्न फिक्स होतात!!
रेल्वे स्टेशनवर सकाळी ‘चा…य’ असं ओरडणारं पोरगं नजरेस पडलं की चेहरा फुललाच! नुसत्या पाण्याने बोंबाळलेल्या कळकट्ट टिचभर ग्लासात वाफाळलेला कटिंग च्याय पण अमृतासमान भासतो… सकाळी सकाळी ताज्या चहाने फुललेला चेहरा दिवसभर किती कटिंग ढोसतो याचा तर काही हिशोबच लागत नाय… चहाबाजच ते! थकून भागून बसल्यावर आयता चहाचा कप समोर येतो तो स्वर्गीय क्षण!
खूप दुवा मिळतात चहा देणाऱ्याला… ती व्यक्ती घरची असो वा टपरीवाला असो… बाजारात फिरताना दमतो तेव्हा नजर जाते वाफाळत्या चहाच्या ठेल्यावर… उकळ उकळ… उकळत असतो कडक चहा… अन् नंतर एका भांड्यात कळकट कापडाच्या तुकड्यांने तो गाळला जातो.
कापडाच्या दोन्ही बाजू कान पिळाव्या तशा धरून उरलेल्या चोथ्यातून शेवटचा थेंब निथळेपर्यंत पिळला जातो… अन् असा चहा प्यायला नुसती झुंबड… पण चव भारी असते हां…कडक… टेष्टी… कृती पाहू नये… ठेल्याकडे पाठ करून पिण्यात मजा … झक्कास!!
‘वाह… ताज’ म्हणून असा रट्ट-गट्ट चहा पिण्यात जी मजा येते ती ‘ताज’ हॉटेलच्या सोनेरी किनारीच्या कपात आहे की नाही? सांगता येत नाही. ‘ताज’ हैं लाजवाब… बस… नाम ही काफी है!!!
चलो…चाय के बहाने एक मुलाकात करते हैं, जिसने चाय की लत लगाई उस चाय वाले को याद करते हैं!!