Monday, April 21, 2025

नाटकाचे बीज

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

महाविद्यालयीन जीवनातील तो दिवस माझ्या कायम स्मरणात राहिला आहे. आमच्या शशिकांत जयवंत सरांनी विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाची तीन तिकिटे हाती ठेवली. तो प्रयोग नेहरू सेंटरमध्ये होता. आमच्यातल्या नाट्यवेड्यांकरिता आवर्जून सरांनी ती तिकिटे काढून आणली होती. तेंडुलकरांचे मराठी नाटकांतील वेगळेपण समजण्याइतकी तितकीशी परिपक्वता नव्हती, पण तेंडुलकरांनी मराठी नाटकांना नवी दिशा दिली हे कळत होते. आम्ही मध्य उपनगरात राहात असल्याने आमच्याकरिता नेहरू सेंटर तसे दूर होते. दादर येथे बराच वेळ अन्य दोघांची वाट पाहून मी वेळेत नेहरू सेंटर येथे पोहोचले. दोन रिकाम्या खुर्च्या नि मी एकटी मधोमध.घाशीराम पाहिले. कोरसद्वारा, समूह संगीतातून उभी राहिलेली भिंत! दिग्दर्शक जब्बार पटेल, संगीतकार भास्कर चंदावरकर नि सर्वच कलावंतांनी उभ्या केलेल्या नाटकाची जादू पुरती भिनली होती. जयवंत सरांनी दिलेले ते अनमोल देणे होते. सरांनी जे पेरले होते ते खोलवर रुजत गेले. पुढे मीही प्राध्यापकीच्या क्षेत्रात प्रवेश केला. अभ्यासक्रमात एखादे नाटक असायचे. पण नाट्यानुभव मुलांना द्यायचा तर त्यांना नाटकात सामील करून घेणे गरजेचे होते. मग आय. एन. टी. रंगवैखरी, अमृतकुंभ इत्यादी स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरू झाले. मुलांनी एकांकिका पहाव्या म्हणून त्यांना आवर्जून सांगणे, नाटकाचे अभिवाचन, विविध नाट्यकृतींचे ग्रंथालयातील प्रदर्शन, एकपात्री अभिनय स्पर्धा, एकत्र नाटक पाहणे हे सर्व उपक्रम यातूनच सुरू झाले.

परवा बीएच्या शेवटच्या वर्षाच्या मराठी विषयाच्या विद्यार्थिनींसोबत प्रशांत दळवींचे ‘चारचौघी’ पाहिले. चारचौघी हे खरं तर तिसेक वर्षांपूर्वीचे नाटक! या नाटकातील सशक्त स्त्रीव्यक्तिरेखा आजच्या पिढीलाही आकर्षित करतात. नाटकातील संवादांच्या जागांना कुठे दाद द्यायची हे मुलींना समजत होते. त्यांना नाटकातील विद्याची लढाई कळत होती. वैजयंतीने स्वत:च्या लग्नाचा निर्णय घेतला होता नि सोबत जोडली गेलेली निर्णयाची जबाबदारीही स्वीकारली होती. ती स्वीकारताना होणारी तिची तगमग मुलींपर्यंत पोहोचत होती. नव्या पिढीच्या विनीचे आंतरिक द्वंद्व उमगत होते. मुख्य म्हणजे मुलींसोबत ठामपणे उभी राहणारी ‘आई’ त्यांना प्रभावित करून गेली. दळवींनी केलेला चारचौघीचा शेवट मुलींना सकारात्मक जगण्याचे सूत्र देऊन गेला. आपली कानउघाडणी, उलटतपासणी आपणच करायची, कारण आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते. मुली नाट्यानुभवाने भारून गेल्या होत्या. त्यातल्या एकीने तर रंगभूमीवरचे जिवंत नाटक पहिल्यांदाच पाहिले होते.

मुली आता जमेल तसे, जमेल तेव्हा नाटक पाहायचेच, यावर बोलत होत्या. नाटक पाहण्यातून समजून घ्यायला हवे या उर्मीचे जयवंत सरांनी माझ्या मनात पेरलेले बीज मुलींच्या मनात रुजले होते. नाटकाचा प्रयोग ही सोपी गोष्ट नाही. मराठी नाटक जगविणे ही जबाबदारी फक्त नाट्यवेड्या कलावंतांचीच नाही, ती मुख्य म्हणजे मराठी भाषकांची, नव्या पिढीची, येणाऱ्या पिढीचीही आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -