Tuesday, March 25, 2025
Homeसाप्ताहिककोलाजWomen education : महिला सक्षमीकरणाचे माध्यम शिक्षणच...

Women education : महिला सक्षमीकरणाचे माध्यम शिक्षणच…

  • मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी यांनी वेद अध्ययन करून विद्वत्ता धारण केली. विष्पला सैन्यात अधिकारी होती; परंतु नंतर मात्र स्त्रीभोवती आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीला शोभेची बाहुली, उपभोग्य वस्तू किंवा दासी बनविली. चूल व मूल हेच तिचे क्षेत्र. चार भिंतींची चौकटी हीच तिची मर्यादा. या उंबरठ्याबाहेर लक्ष्मण रेषा अशा खुळचट कल्पनांच्या जोरावर समाजाला दिशाभूल केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली तरी हे उदासीन्यच. १९व्या शतकात सतीबंदी करणाऱ्या राजाराम मोहन राय, १९व्या शतकात विधवेशी विवाह करणारे महर्षी कर्वे, १९व्या शतकात मूल दत्तक घेणारे महात्मा फुले आणि शेण, चिखल दगडांचा मारा सहन करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई आजही त्यांच्या प्रेरणात्मक आदर्शतून आपल्याला हेच तर सांगतात की, त्यांची मूल्य जपली तरच आपली उद्दिष्टे साध्य, सफल ठरेल. हीच ठरेल खरी त्यांना आदरांजली.

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपल्याला अस्तित्व निर्माण करण्यासाठी झुंजावे लागले तरीही प्रत्येक स्थानी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा स्त्रीने उंचच उंच रोवला, सर्व शिखरे पादाक्रांत केली. आकाशाला गवसणी घालत चंद्रावरही पोहोचलेली स्त्री. डॉ. आनंदी जोशी, क्रांतीज्योती सावित्रीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई, प्रियदर्शनी इंदिरा गांधी, पंडिता रमाबाई, किरण बेदी, सानिया मिर्झा, पीटी उषा, कल्पना चावला, लतादीदी, प्रतिभाताई पाटील, सुनीती विल्यम्स, सिंधुताई सकपाळ, मेधा पाटकर, सुधा मूर्ती इत्यादी स्त्रिया आपल्या आदर्श आहेत. कला, क्रीडा, शिक्षण, राजकारण, साहित्य समाजकारण इथे उमटवणाऱ्या प्रत्येक महिलेचा आदर्श तिचे व्यक्तिमत्त्व आपली मान उंचावतात.

“सुसंस्कृत समाजाचे सुंदर दर्शन म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन” असे आचार्य विनोबा भावे यांनी म्हटले आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून मुळातच स्त्रीला आपल्यामधील शक्तीची जाणीव होणे गरजेचे आहे. या शक्तीची जाणीव शिक्षणातूनच होणार. म. फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई महर्षी कर्वे यानी स्त्रियांचे माणूसपण ओळखून आपल्या देशात प्रबोधन केले ते शिक्षणानेच. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना संधी मिळायलाच हवी. स्वतःच्या जिद्दीवर, दृढ निश्चयाच्या बळावर स्वतःबरोबर कुटुंबाचा, राष्ट्राचा विकास करण्यासाठी स्त्री साक्षर होणे गरजेचे आहे, तरच ती निर्भय स्वयंसिद्ध विज्ञाननिष्ठ होईल. २१व्या शतकात तिला स्वतंत्र व्यक्ती म्हणून मानाचे स्थान हवे. स्त्रियांना सन्मानाने जगायचे असेल, तर त्यांनी स्वतःला बदलायला हवं आणि अभिमान बाळगून माणूसपण ओळखायला हवं, जपायला हवं, घडवायला हवं, धडपडायला हवं तर हे सारे घडेल शिक्षणानेच!

चूल व मूल एवढीच तिची मर्यादा नाही, तर बदलत्या जगाबरोबर बदलायला हवं. तू खुद को बदल, तू खुद को बदल तभी तो जमाना बदलेगा! नका घालू मला बंधन, नाही दिशा मज खुल्या आंदण!! कृतिशील व ज्ञानपूर्ण होण्यासाठी सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे. तुमच्या-आमच्यासारखं माणूस म्हणून जगणं, स्वाभिमानाचं जीणं, अस्तित्व मिळणं त्यासाठी ‘बाईमाणूस’मधील ‘बाई’ऐवजी फक्त तिला ‘माणूस’ म्हणून अधिकार, हक्क, संरक्षण शिक्षण आणि न्याय मिळावा. कारण तिलाही मन आणि भावना आहेत जिवंत सजीव. समाजात सुधारणा एका दिवसात घडत नसतात, त्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणाने जाणिवा संवेदनशील होतात. विकासातून त्या स्वतःला व पर्यायाने कुटुंबाला, राष्ट्राला परिपूर्णता देतात. हे विधायक कार्य शिक्षणानेच होते.

सुप्रसिद्ध विश्वकोषकार साहित्यिका डॉ. विजया वाडांचे वाक्य आठवते, “संस्काराची पाळीमुळे जेव्हा मातीत घट्ट रोवली जातात, तेव्हा स्वातंत्र्याच्या पंखांना भय नसते” अगदी खरे! स्त्रीच्या सर्वांगीण विकासाचे परिणामकारक साधन म्हणजे ‘शिक्षण’. आत्मभान जागृत करून आत्मविश्वासपूर्ण शिक्षणाच्या जोडीला हवे व्यक्तिमत्त्व, तरच होईल आत्मउद्धार. प्रत्येक स्त्रीला व्यक्ती म्हणून सन्मानाचे आदराचे स्थान देण्यासाठी संघटितपणे प्रतिकार कायद्याचे ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकास या त्रयींची अत्यंत निकड आहे. यासाठी हवे स्वावलंबन, वाचन, लेखन, चिंतन, आत्मविश्वास स्वत्त्वाची जपणूक करणे हे अत्यंत गरजेचे आहे. पुढे जायचे असेल, तर यशाचे शिखर गाठण्यासाठी कामाची आखणी, नियोजन, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन, आधुनिक विचारांची सांगड, दूरदृष्टी, अभ्यास, व्यासंग, प्रगल्भता, परिपक्वता आणि परिपूर्णता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अत्याचार, अन्यायावर मात करून आदर्श निर्णयशक्ती, हक्क व कायद्याचे ज्ञान या सर्वांमुळे आपण शोषण अत्याचार यावर मात करू शकतो आणि समाज परिवर्तन ही करू शकतो ते सारे होईल शिक्षणानेच आणि जनजागृतीने शिकलेली आई घरादाराला पुढे नेईल म्हणजे स्वतः जागृत होऊन घराघरांतून चित्र बदलावे ती स्त्री निर्णय शक्तीने सुसंस्कृत होते, सामर्थ्यवान होते, बलवान, स्वावलंबी होते. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवराय घडविले.

श्यामच्या आईने साने गुरुजी घडविले. तेव्हा या साऱ्या वंदनीय दीपस्तंभानी उजळू द्या, स्वप्ने आणि उद्याचा आपला भारत देश स्त्री साक्षरतेच्या सक्षमीकरणाच्या दिशेने प्रभावित उज्ज्वल उत्तुंग उदयोन्मुख व्हावा. लिंगभेदाची लक्ष्मणरेषा पुसून टाकून सक्षमीकरणाची ज्योत पेटवणारी ही मशाल अवघ्या देशाला प्रेरक ललकारी देणारी ठरावी. तुमचा आमचा आनंददायी भारत समानतेच राष्ट्राला परिपूर्णत्वाच्या दिशेने देणारा नैतिक मूल्यपैकी स्त्री पुरुष समानता ही नैतिक मूल्य जपणारा असावा फुले, महर्षी, डॉ. आंबेडकरांच्या ध्येय तत्त्वाला स्मरून विधायक नागरिकत्व साकारणारा आपल्यातील प्रत्येक जण आणि प्रत्येकातील आपलेपण जपणारा असावा. लिंगभेदाची दरी बुजवून त्यावर समानतेचा पूल बांधला जावा हे प्रत्येक नागरिकाने कर्तव्य बजावले पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -