Wednesday, July 17, 2024

Shilpa Kher : सोबती

  • ओंजळ : पल्लवी अष्टेकर

लहान मुलांची खेळणी, वह्या अशा वस्तू विकणारी लहान मुले अनवाणी फिरताना दिसतात, तेव्हा हे होरपळलेले, मूक बालपण पाहताना आपले काळीज गलबलते. अनेकदा गरिबीमुळे, असुरक्षित पालकत्वामुळे शिक्षणाचा मूलभूत अधिकारही त्यांना मिळत नाही. अशाच आर्थिक रेषेखालील शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांकरिता काम करणाऱ्या शिल्पा खेर यांच्या कामाविषयी जाणून घेऊया.

‘बालपणीचा काळ सुखाचा’ ही म्हण उगीच नाही पडली. आपल्या प्रत्येकाचे बालपण हे विविध अनुभवांनी परिपूर्ण असते. आई-वडिलांच्या निर्मळ प्रेमाची पाखर, शाळा, शिक्षकांचे संस्कार, मित्रमंडळ, आजी-आजोबांशी गप्पा यात दिवस, वर्ष, महिने कसे उडून जातात तेही कळतही नाही. पण सर्वांचेच बालपण असे असते असे नाही. जेव्हा आपल्याला सिग्नलच्या कोपऱ्यावर टिश्यू पेपर, कचऱ्याच्या पिशव्या (गार्बेज बॅग्ज), लहान मुलांची खेळणी, वह्या अशा वस्तू विकणारी लहान मुले अनवाणी फिरताना दिसतात, तेव्हा हे होरपळलेले, मूक बालपण पाहताना आपले काळीज गलबलते. अनेकदा गरिबीमुळे, असुरक्षित पालकत्वामुळे शिक्षणाचा मूलभूत अधिकारही त्यांच्यापासून डावलला जातो.

आर्थिक रेषेखालील शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता काम करणाऱ्या शिल्पा खेर यांच्या कामाविषयी जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याशी संपर्क साधला. येता-जाता, बाहेर फिरताना असे बालक शिल्पाताईंच्या नजरेस पडले की, त्या अस्वस्थ होत. काॅलेजमध्ये असल्यापासून बालकांसाठी काही काम करावं अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात होती. त्यांच्या इच्छेला साथ देणारे त्यांचे पती डाॅ. जितेंद्र खेर यांच्यामुळे त्या जीवनाकडे प्रगल्भपणे पाहायला शिकल्या, असे त्या म्हणतात.

शिल्पाताई म्हणतात, “काॅलेजमध्ये असल्यापासून माझी बालकांसाठी काही काम करावं अशी तीव्र इच्छा होती. या इच्छेला मूर्तस्वरूप म्हणून त्यांचे पती डाॅ. जितेंद्र खेर यांनी २००७ मध्ये ‘भाग्यश्री फाऊंडेशन’ची स्थापना करून दिली. या संस्थेमार्फत सुरुवातीला त्या व त्यांचे सहकारी आर्थिक रेषेखालील शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे आयोजन करीत असत. तसेच या मुलांची शाळेची फी भरून त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे काम ‘भाग्यश्री फाऊंडेशन’ करीत असे.

कुठलेही कार्य म्हटले की, त्यात अडचणी येणे अपरिहार्य आहे. फाऊंडेशनच्या सुरुवातीच्या दिवसांत शिल्पाताई महानगरपालिकांच्या शाळेत जात, तेव्हा शाळा आर्थिक मदतीचा स्वीकार करण्यास उत्सुक असत; परंतु मुलांची शिबिरे घ्यायची असतील, त्यांच्या प्रगतीची पाहणी करायची असेल, तर प्रतिसाद थोडा थंड असायचा. कित्येकदा प्राचार्यांची परवानगी घेण्यासाठी तासनतास त्यांच्या ऑफिसबाहेर बसावं लागायचं. त्यांचं काम नवीन असल्यामुळे शाळेकडून तेवढा उत्साह दाखविला जायचा नाही. तेव्हा शिल्पाताईंना कित्येकदा नैराश्य येत असे. आपण आपले काम मनापासून करतो आणि समोरच्याला त्याची कदर नाही असे वाटायचे. तेव्हा त्यांच्या पतीने त्यांना समजावलं की, “आपण जे काम करतो ते कुठल्याही अपेक्षेने, अगदी कोणी कृतज्ञता दाखवावी किंवा कोणी मान द्यावा अशी भावना सामाजिक कार्यात ठेवणे योग्य नाही.” तेव्हापासून शिल्पाताईंनी कर्तव्यभावनेने काम करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणतात, “तुमच्या वागण्यामध्ये जर विनम्रपणा असेल व कार्यात सातत्यपणा असेल व ते काम आपण कर्तव्यभावनेने करत असू, तर अशा कार्यात अडचण फार काळ टिकत नाही.”

शिल्पाताई व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं की, जर विद्यार्थी व शिक्षक यांचे संबंध जिव्हाळ्याचे असतील, तर या सर्व गोष्टींचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर होतो. आज ‘सक्षम नागरिक मोहिमेअंतर्गत ‘रोजनिशी उपक्रम’ व ‘आत्मनिर्भर युवक उपक्रम’ हे महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये राबविले जात आहेत.

भिवंडी महानगरपालिकांच्या शाळा, ठाणे महानगरपालिकांच्या शाळा, केणी विद्यालय, शिवाई विद्यालय, अगस्ती विद्यालय, नूतन भारत विद्यालय-पुणे, विक्रोळी विद्यालय, शहापूरमधील ५० आदिवासी शाळा, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळा अशा विविध शाळांचा त्यात समावेश आहे.

प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर व अन्य ज्येष्ठ सैन्य अधिकारी लेफ्टनंट जनरल डाॅ. दत्तात्रय शेकटकर अशा थोर व्यक्तींचे मार्गदर्शन या प्रकल्पाला लाभले आहे. याशिवाय भायखळा कारागृहातील महिला बंदी, पी. आर. सी. पुणे येथील अपंग सैनिक यांच्याकरिता उपक्रम, तसेच आरोग्य शिबिरे अशा विविध क्षेत्रांत भाग्यश्री फाऊंडेशनने काम केले आहे.

आपल्या बालपणातील जडण-घडणीचे श्रेय त्या आपले आजोबा (कै. विश्राम फणसेकर) यांना देतात. त्यांच्या आजोबांचे साधे, सरळ, मेहनती व्यक्तिमत्त्व, खरे बोलणे, जमेल तशी इतरांना मदत करणे, काटकसरी वृत्तीने राहाणे या गोष्टी शिल्पाताईंनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आजोबा शिवाजी विद्यालय, काॅटनग्रीन येथून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. आजोबांच्या आग्रहामुळे शिल्पाताईंना मराठी शाळेत घातलं गेलं. नंतर कुटुंबीय गिरगावहून घाटकोपरला शिफ्टं झाले, तेव्हा इयत्ता पाचवीमध्ये त्यांना कुर्ला येथील हाॅलिक्राॅस हायस्कूलच्या मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्यात आलं. तेव्हा त्या भागातील बहुतांशी मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असत व तिथे केवळ आजूबाजूला राहणाऱ्या आर्थिक रेषेखालील कुटुंबातील मुले मराठी माध्यमाच्या शाळेत जात; परंतु तेथील मुलांबरोबर त्यांची फार छान मैत्री झाली. सोबत आपल्या मित्रमंडळींना घेऊन शाळेतील गॅदरिंगसाठी कार्यक्रम बसविणे व नववी-दहावीत असताना शाळेच्या वेळेनंतर थांबून त्यांच्या अभ्यासातील अडचणी सोडविणे या गोष्टी त्या उत्साहाने करत.

आपल्या एका सुंदर आठवणीबद्दल शिल्पाताई सांगतात, “फणसे (देवगड) या गावी आजोबांबरोबर त्या जेव्हा सुट्टीत जात असत, तेव्हा गावच्या सर्व मुलांना एकत्र करून त्यांचे आजोबा अभ्यास घेत. सर्वांनी एकत्र शिधा (तांदूळ, भाजीचा फणस) करून, वनभोजन करताना जी गंमत येत असे, त्यातील आनंद अविस्मरणीय असे. त्यावेळी गावातील मोठी मंडळी देखील उत्साहाने या वनभोजनात सामील होत. कुणी लाकडे आणून देत, कुणी भांडी आणून देई.” पूर्वीच्या काळी एकमेकांच्या सहवासातून हे आपुलकीचे बंध सहजासहजी निर्माण होत असत, त्याची गरज आधुनिक काळात जास्त आहे.

शिल्पाताईंनी बी.एस्सी.नंतर पदव्युत्तर शिक्षण योगशास्त्रात घेतले. नव-नवीन गोष्टी शिकण्याची आवड त्यांच्यात लहानपणापासून होती. काॅलेजमध्ये असताना पोहणे, ड्रायव्हिंग, ब्यूटिपार्लर, बाहुल्या बनविणे, कुकिंग असे विविध कोर्स त्या शिकल्या. पुढील आयुष्यात देखील मानसशास्त्र डिप्लोमा, योगशिक्षिका डिप्लोमा, फ्रेंच भाषा, फोटोग्राफी, फॅशन डिझायनिंग डिप्लोमा असे विविध प्रकारचे शिक्षण त्या घेत राहिल्या. “स्पर्धा भावनेने कधी-कधी हा आनंद आपण घालविताे” असेही त्या प्रांजळपणे सांगतात.

शिल्पाताई स्वत: लेखिका असून मुख्यत्वे त्यांनी विविध पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘सत्यमेव जयते’, ‘सोल्जर इन मी’ – भाग १ व २, ‘यश म्हणजे काय?’ – भाग १ व २, ‘शिवाची शक्ती’ -भाग १ व २, ‘ए मेरे वतन के लोगो’, ‘सुवर्णकण’, ‘योग: कर्मसु कौशलम्’ ही पुस्तके ‘ग्रंथाली प्रकाशनाने’ प्रकाशित केली आहेत. तसेच ‘भोसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक बाळकृष्ण मुंजे यांच्या जीवनावर आधारित मराठी व हिंदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. ‘जस्ट बिलिव्ह’ हे त्यांचे पहिले इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या संवेदनशील मनाच्या शिल्पाताईंच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -