Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजNew year : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी....

New year : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी….

  • दरवळ : लता गुठे

खरं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. आपले सण-उत्सव हे ऋतुमानाप्रमाणे आपण साजरे करतो‌. गुढीपाडव्याला झाडांची जुनी पालवी गळून नवीन पालवी फुटते. सर्वसृष्टी नवचैतन्याने बहरून जाते, त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये निसर्गाकडे पाहताना आनंदाचा बहर येतो. आज-काल हे आपण विसरत चाललो आहोत आणि १ जानेवारीपासून आपण नवीन वर्ष साजरे करू लागलो आहोत.

सरत्या वर्षाला जेव्हा आपण निरोप देतो तेव्हा मनामध्ये नवीन आशा-आकांक्षा जन्म घेतात. नव्या उमेदीने त्या साकार करण्याची इच्छा मनात जागृत होते. ज्या वेळेला जुन्या वर्षात घडलेल्या अप्रिय घटना विसरून आपण नवीन वर्षात पदार्पण करतो, त्या वेळेला नवीन सकारात्मक ऊर्जा आपल्या सुप्त मनात कार्य करू लागते.

खरं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. आपले सण-उत्सव हे ऋतुमानाप्रमाणे आपण साजरे करतो‌. गुढीपाडव्याला झाडांची जुनी पालवी गळून नवीन पालवी फुटते. सर्वसृष्टी नवचैतन्याने बहरून जाते, त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये निसर्गाकडे पाहताना आनंदाचा बहर येतो. आज-काल हे आपण विसरत चाललो आहोत आणि १ जानेवारीपासून आपण नवीन वर्ष साजरे करू लागलो आहोत. याचं कारण म्हणजे, आपल्या देशावर अनेक धर्मांचे राज्यकर्ते आले, राज्य केले आणि निघून गेले. जाताना त्यांनी त्यांच्या संस्कृतीच्या काही खुणा मागे सोडल्या आणि नकळत त्या आपल्या संस्कृतीमध्ये मिसळल्या गेल्या. त्यापैकी एक ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाचा निरोप देऊन १ जानेवारीला नवीन वर्षाचं स्वागत करायची ही पद्धत इंग्रजांची. आपण मोठ्या मनाने अंगीकारली. रात्री उशिरापर्यंत पार्ट्या, खाणं-पिणं, नाच-गाणं करून रात्री बाराला नवीन वर्षाचे स्वागत करायचे. हे चित्र आजकाल सर्वत्र दिसत आहे. मोठ्या उत्साहाने संपूर्ण जगभर नवीन वर्षाचं स्वागत करण्याची आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याची पद्धत आहे.

परंतु काही देशांमध्ये नवीन वर्ष हे वेगळ्या पद्धतीने साजरे करतात. याचा अनुभव मला आला तो आपल्याशी वाटण्याचा मोह मला होत आहे तो अनुभव असा… चार-पाच वर्षांपूर्वी मी एका साहित्य सहलीच्या निमित्ताने जानेवारी महिन्यामध्ये बालीला गेले होते, जाण्याआधी एवढेच समजले होते की, बालीमध्ये हिंदू धर्माचे तसेच बौद्ध धर्माच्या विचाराचे, तत्त्वांचे पालन केले जाते. आम्ही ज्या बसमध्ये फिरत होतो त्या बसच्या गाईडला मी विचारले, ‘तुमच्याकडे नवीन वर्ष कसे साजरे करतात? त्या वेळेला तो म्हणाला, “आमच्या आजूबाजूला जी मंदिरं आहेत तिथे आम्ही सर्वजण ३१ डिसेंबरला रात्री एकत्र जमतो, सर्वांसाठी सामुदायिक प्रार्थना केली जाते, त्यानंतर जप, तप, ध्यान-धारणा करून आम्ही नवीन वर्षाचे स्वागत करतो. एकमेकांना शुभेच्छा देतो आणि नवीन संकल्प करून ते सिद्धीस जाण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करतो.”

मला त्यांची ही पद्धत खूप आवडली आणि ती वैज्ञानिकदृष्ट्या कशी योग्य आहे याचेही कारण समजलं. मन हे अतिशय चंचल आहे आणि जे आपण संकल्प करतो त्याची पूर्ती होण्यासाठी ते सुप्त मनात आकार घेऊ लागतात. जेव्हा मन शांत असेल तेव्हा सकारात्मक विचार रुजले जातात. जप, तप, ध्यान, धरण्यामुळे जे आपल्या ठिकाणी असलेली सुप्त केंद्र आहेत, त्या केंद्राच्या ठिकाणी वैश्विक ऊर्जा एकवटलेली आहे; परंतु ती या केंद्राच्या ठिकाणी बंदिस्त आहे. जेव्हा आपण जप-तप, ध्यान- धारणा करतो त्या वेळेला मन आपोआप शांत होतं. मनातील विकार दूर होऊ लागतात. मग आपोआपच ही केंद्र उघडली जातात आणि ती वैश्विक ऊर्जा सकारात्मकतेने आपली इच्छापूर्ती होण्यास मदत करते. हे यामागचं शास्त्रीय कारण आहे. आपण नवीन वर्षाचे संकल्प तर करतो; परंतु ते संकल्प सिद्धीस जाण्यासाठी, ते विचार फलित होण्यासाठी सकारात्मक ऊर्जेची गरज असते. ती जप, तप, ध्यान-धारणेतून मिळते. हे बालीवासीयांना चांगल्या प्रकारे समजलेले आहे. कारण त्यांच्या शाळेमध्ये लहानपणीपासून मुलांना संस्कृत हा विशेष शिकवला जातो. रामायण, महाभारत आपले धर्मग्रंथ तसेच पतंजलीची योगसाधना या विचाराने त्यांची मनं घडविली जातात. चांगले जीवन जगण्यासाठी ह्या संस्काराचे पालन करणे महत्त्वाचे वाटते; परंतु आपण या आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीपासून, संस्कारापासून दूर चाललो आहोत. हे आपलं दुर्दैव आहे.

नवीन वर्ष सुरू झालं की आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. जेव्हा आपण शुभेच्छा देतो, त्या शुभेच्छा अशा‌… ‘आपणास येणारे वर्ष सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करतो. या वेळेला जेव्हा आपण ईश्वरचरणी या गोष्टीची प्रार्थना करतो त्यावेळेला आपल्यासाठी वेगळे काही मागायची गरजच पडत नाही. कारण या प्रार्थनेमध्ये सकारात्मक ऊर्जा आहे. जेव्हा आपण चांगल्या गोष्टीचा विचार करतो त्या वेळेला ती ऊर्जा आपोआपच आपल्या मनामध्ये कार्य करू लागते आणि आपले संकल्प सिद्धीस जातात. मला या वेळेला संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाची आठवण होते… । जो जे वांच्छिल तो तें लाहो प्राणिजात॥

हे पसायदान म्हटलं की आपलं अंतकरण आपोआपच शुद्ध भावनांनी भरून जातं. अशा वेळेला जे आपण देतो तेच आपल्याकडे परत येते हा वैश्विक नियम आहे.

नवीन वर्षाची चाहूल लागली की, आपल्याला जाणवू लागतं ते आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झाले आहे; परंतु कमी झालेल्या वर्षांनी आपल्याला अनुभव संपन्न केलं आहे हे आपण विसरतो. नवीन वर्षाला सामोरं जाताना आनंदाने खूप ऊर्जा घेऊन काही अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सामोरं जायला हवं. हे तर आपल्या हातात आहे‌‌ ना! पुढच्या वर्षाच्या मुठीमध्ये परमेश्वराने आपल्यासाठी काय लपवून ठेवलं आहे हे मात्र आपल्याला माहीत नाही, त्यामुळे येणारे वर्ष नक्कीच आपल्यासाठी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे वर्ष येईल अशी आशा करून आपण नवीन वर्षात पदार्पण करू या मला वाटतं प्रत्येक वर्षे हे ३६५ पानांच्या कादंबरीसारखं असतं. जीवनाची अनेक स्थित्यंतरे त्यामध्ये असतात तसेच पूर्ण, अपूर्णतेचा अनुभव पात्रांच्या संगतीने आपण जगत असतो. प्रत्येक पान काहीतरी देऊन जातं, अनुभव संपन्न बनवतं. आपल्या अनेक प्रश्नांची उकल होते. ती पात्र आपले जीवन जगत आहेत असा अनुभवही येतो. अनेक नातेसंबंधाच्या रेशीमगाठी कधी सैल होतात तर कधी जास्त घट्ट. आपल्याही आयुष्यात येणारी नवीन माणसं कधी दूर जातात, तर कधी जवळ येतात. नवीन नातीसंबंध निर्माण होतात. असंच काहीसं. एक वर्ष ही आपल्या आयुष्याची कादंबरीच असते‌‌. कादंबरी संपल्याची हुरहुर जाणवते तेव्हा आपण नक्कीच चिंतन-मनन करतो‌. त्या कादंबरीने आपल्याला काय दिलं? याचा विचार आपण करतो. तसंच आहे जेव्हा वर्ष सरतं त्यावेळेला आपण नकळत भूतकाळ डोकावतो. आपल्याला आलेल्या कडू-गोड आठवणी घेऊन आपण नवीन वर्षात पदार्पण करतो. नवीन वर्षाचं स्वागत करताना मनात एक हुरहुर असते.

चला तर मग मित्र आणि मैत्रिणींनो‌…
नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या ओंजळीत या शब्दरूपाने टाकत आहे. सर्वांना नवीन वर्ष खूप सुखाचे, समाधानाचे, आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -