
- ऐकलंत का! : दीपक परब
माधुरी दीक्षित - नेनेचा ‘पंचक’ येतोय...
श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा...’ असे बोल असलेले हे गाणे आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरू ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या या भावनिक गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत दिले आहे. तर अभिजीत कोसंबी याचा जादुई आवाज या गाण्याला लाभला आहे. या गाण्याच्या शब्दांमध्ये अनेक भावना आहेत.
चित्रपटात अनेक घडामोडी घरात घडत आहेत आणि त्या सगळ्यांना अनुसरून या गाण्याचे बोल रचले आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात वेगवेगळ्या पातळीवर द्वंद्व सुरू आहेत. त्यामुळे यातील शब्दांमध्ये आर्तता आहे. अभिजीत कोसंबीने आपल्या आवाजाने हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. संगीतही त्याच दर्जाचे आहे. गुरू ठाकूर यांनी अत्यंत सुंदर शब्दात जीवनातील सफर मांडली आहे. ज्याला मंगेश धाकडे यांनी उत्तम संगीताची साथ लाभली आहे. खूप भावनिक आणि मनाला भिडणारे हे गाणे आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारे हे गाणे आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशीष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.
एंटरटेनमेंटच्या डिलिव्हरीसाठी येतोय ‘डिलिव्हरी बॉय’...
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की, डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता थोड्या फार प्रमाणात कमी होणार आहे. कारण आता ‘डिलिव्हरी बॉय’चे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून ते सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरमध्ये एका आलिशान खुर्चीवर प्रथमेश परब विराजमान झालेला दिसत असून त्याच्या मागे अंकिता लांडे पाटील डॉक्टरच्या ऍप्रनमध्ये दिसत आहे. तर प्रथमेशजवळ पृथ्वीक प्रताप आहे. या पोस्टरमध्ये विशेष लक्षवेधी ठरत आहेत. त्या आठ गरोदर बायका... त्यामुळे आता नेमके काय आहे हे प्रकरण, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ९ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
सिनेपोलीस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे मोहसीन खान दिग्दर्शक आहेत. डेव्हिड नादर निर्माते असून फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. चित्रपटाच्या टॅगलाईनवरूनच हा चित्रपट किती गंमतीशीर असेल, याचा अंदाज आपण बांधू शकतो. चित्रपट अतिशय मजेशीर असला तरीही त्यातून थोडासा सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. या विषयाचे गांभीर्य घालवू न देता अतिशय हलक्या-फुलक्या पद्धतीने तो मांडण्यात आला आहे.