
- नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
काही गाण्यांचे नुसते चार शब्द जरी कानावर पडले तरी मनातल्या मनात लगेच त्या गाण्याची चाल आठवतेच! मन त्या गाण्याच्या ठेक्यावर डोलू लागते आणि नकळत सगळा मुडच बदलून जातो. असेच एक गाणे होते १९६३ सालच्या ‘भरोसा’मध्ये.
भरोसाचे निर्माते होते वासू मेनन. सुदर्शन बब्बर यांच्या पटकथेला दिग्दर्शन होते के. शंकर यांचे. प्रमुख भूमिकेत होते गुरू दत्त, आशा पारेख, मेहमूद, ओम प्रकाश, कन्हैयालाल आणि सुलोचना चटर्जी. याशिवाय सिनेमात तीन मराठी कलाकारही होते - नाना पळशीकर, ललिता पवार आणि शुभा खोटे!
जुन्या काळात प्रेमिकांची कशी बशी साधलेली भेट आणि त्या चोरट्या भेटीचा रोजच अनिच्छेने घ्यावा लागणारा निरोप हा तसा अनेक सिनेमातील गाण्यांचा विषय असायचा! यात प्रेयसीला घरी जाण्याची घाई असणे आणि तिने अजून थांबावे असे प्रियकराला वाटत राहणे हेही तसे नेहमीचेच! या अगदी साध्या प्रसंगावर कितीतरी अवीट गोडीची गाणी हिंदीतील गीतकारांनी लिहिली आहेत.
असेच एक गाणे राजेंद्र कृष्णन यांनी लिहिले होते, ज्याला संगीत दिले होते रवी शंकर शर्मा अर्थात ‘रवी’ यांनी. या अतिशय गोड आणि लोभस गाण्याला आवाज दिला होता महेंद्र कपूर आणि लतादीदीने! अजूनही अनेकांच्या मनात त्या गाण्याचा ठेका सहज घुमू शकतो. कोणत्याही स्थितीत श्रोत्याचा मूड प्रसन्न, अगदी ताजातवाना करून टाकणारे त्या गाण्याचे शब्द होते -
‘आजकी मुलाक़ात बस इतनी,
कर लेना बाते कल चाहे जितनी.’
तिचे बरोबरच नाही का? ‘अरे बाबा, आज भेटले ना, आता पुरे. मला घरी जावे लागणार आहे. उद्या बोलू की अजून जे काय बोलायचे ते. आता मला घरी जाऊ दे.’ असे गोमतीचे (आशा पारेख) प्रांजळ निवेदन आहे. पण प्रियकर बन्सी (गुरुदत्त) मात्र आपल्या प्रेमाचा हवाला देऊन म्हणतो, ‘इतका हट्टीपणा चांगला आहे का? थांब की अजून थोडा वेळ!’
अच्छी नहीं होती है ज़िद इतनी,
देखो हमें तुमसे है प्रीत कितनी...
किती साधे शब्द, साधा प्रसंग. पण आमचे दिग्दर्शक संगीतकार, गीतकार तोही इतका गोड करून टाकतात की ज्याचे नाव ते! तिला तरी कुठे जायची इच्छा आहे! पण जनरितीची जाणीव, लोकलज्जा ही स्त्रीमनाला अधिक असते. म्हणून आशा विचारते. ‘प्रेम आहे तर त्याची जाणीव अशी वारंवार करून देणे गरजेचे आहे का रे? अशा गोष्टी पुन्हा पुन्हा ओठावर आणायच्या असतात का?’ -
प्यार जो किया हैं जताते हो क्यो,
बात ऐसी होठोंपे लाते हो क्यों?
आता यावरही गुरुदत्तचा किती स्वाभाविक प्रश्न येतो पाहा. तो म्हणतो, ‘मी नुसते विचारले तर मला का बरे सतावतेस? आताच तरी आलीस ना, मग लगेच जायच्या गोष्टी का करतेस?
और हम जो पूछे सताते हो क्यों?
अभी अभी आये अब जाते हो क्यों?
आजकी मुलाक़ात...
प्रेमातली अशी लाडीक जुगलबंदी खुलवावी ती आपल्या जुन्या गीतकारांनीच! आता प्रियकर खूपच रोमँटिक मूडमध्ये आहे. त्याची इच्छा स्वाभाविकपणेच त्याच्या ओठावर येते. तो म्हणतो, ‘असे कधीतरी न बोलावताही, स्वत:हुन येत जा ना! आणि मग सगळा दिवस बरोबर घालवून अगदी चंद्र उगवला की मग घरी
जात जा!
कभी कभी ऐसे भी आया करो,
चाँद निकले तो घर जाया करो...
राजेंद्रजींनी प्रेमिकातील नोकझोक, लाडीकपणा, खोडकरपणा अगदी बारकाव्यासह या गाण्यात टिपला होता. आता तो केवढ्या अजीजीने विनवतोय तिला भेटीविषयी आणि तिचे मात्र वेगळेच! ती म्हणते माझे मी ठरवीन. मला वाटेल तेव्हा येईन, वाटेल तेव्हा जाईन. तू प्रेम आहेस म्हणतोस ना, मग जरा प्रेमिकेचे नखरेही उठवावे की माणसाने!
आयेंगे जायेंगे मर्ज़ीसे हम...
प्यार हैं तो नाज़ भी उठाया करो...
बिचारा प्रियकर मग पुन्हा पुन्हा तीच विनंती करत राहतो. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण आणि देखण्या गुरुदत्तने आणि आशा पारेखने केलेला अतिशय खेळकर आणि सहज अभिनय. एक नव्यानेच प्रेमात पडलेली प्रेमी जोडी त्यांनी इतकी सहज उभी केली होती की, आपण सिनेमा पाहत आहोत हे क्षणभर विसरूनच जातो. गुरुदत्त म्हणतो -
अच्छी नही होती हैं जिद इतनी
देखो हमे तुमसे हैं प्रीत कितनी...
गोमती आता काही थांबत नाही असे लक्षात आल्यावर बन्सीच्या लटक्या सबबी सुरू होतात. ‘थांब ना, आता तू निघून जाशील, तर मग मी तुझा चेहरा कसा आठवू? अगदी थोडं थांब, मला तुझा गोड चेहरा माझ्या डोळ्यांत जरा सामावून घेऊ दे! माझ्या मनाला जरा भानवर येऊन तोल तरी सांभाळू दे ना!
‘ठहरो मैं दिलको सँभालु ज़रा,
पलकोमें तुमको छुपा लूँ ज़रा...’
यावर आशा पारेख अगदी नैसर्गिक अभिनय करत गुरुदत्तला चिडवत म्हणते. ‘तुला अजून प्रेम काय तेही नीट समजले नाहीये रे बाबा! थांब, इकडे ये, आता मीच तुला ते समजावून देते.’
सीनमध्ये मागे गाण्याचा ठेका सतत सुरू आहे. तोही रवीने असा निवडलाय की श्रोत्यांना तिला असलेली घाई सहजच लक्षात येते. सतत जाणवत राहते.
‘समझे न अबतक मोहब्बत है क्या,
आओ तुम्हे ये भी समझा दू ज़रा...’
आजकी मुलाक़ात बस इतनी...
आज, आता, हे वर्ष संपते आहे. एका वर्षाला कायमचा निरोप द्यावा लागणार. पुन्हा आपल्याला वर्तमानकाळात “३१ डिसेंबर २०२३” हे शब्द कधीही लिहिता येणार नाहीत. या वर्षात झालेल्या काही नव्या भेटी, परिचय, मैत्री, आठवणी उद्या ‘गेल्या वर्षीच्या’ ठरणार.
त्यातल्या काही स्मृती सुखद असतील, तर काही कायमचे द्यावे लागलेले निरोप अस्वस्थ करतील, हुरहूर लावतील, हळवे करतील! तरी देवाने आकाशाच्या छताखाली, क्षितिजाच्या भिंतीवर टांगलेल्या काळाच्या अजस्त्र कॅलेंडरमधली ही तारीख काही तासांनी भूतकाळात गडप होणार. आपल्या नॉस्टॅल्जिक भूतकाळाला दिलेली आपली ही सुखद भेट इतकीच! ‘आजकी मुलाकात बस इतनी!’ आता ही भेट संपणार!
पण अरे हो, राजेंद्र कृष्णन साहेबांनी पुढचीही ओळ लिहिली आहेच की - “कर लेना बाते कल चाहे जितनी...”