- क्राइम : अॅड. रिया करंजकर
बँकेकडून लोकांना अनेक प्रकारच्या लोनच्या ऑफर येतात. ज्यांना गरज आहे ते त्या त्या प्रकाराचे लोन घेऊन आपल्या गरजा पूर्ण करतात. काही लोकांची स्वतःच्या मालकीची घरं असतात, त्यांना आपल्या मुलांच्या लग्नात किंवा इतर कारणासाठी जर लोन हवं असेल तर आपलं घर बँकेकडे गहाण ठेवून म्हणजेच मॉर्गेज लोन घेतलं जातं.
राजू याला काही रकमेची गरज होती म्हणून त्याने आपला राहता फ्लॅट मॉर्गेज करून लोन घेण्याचं ठरवलं. त्यासाठी तो बँकेत गेला आणि बँकेतील मॅनेजरशी मॉर्गेज लोनबद्दल बोलणं केलं. राजूला दारूचं व्यसन होतं. बँकेच्या मॅनेजरने राजूला लोन डिपार्टमेंटकडे पाठवलं. त्यांच्याशी सविस्तर बोलावं, असंही लोन डिपार्टमेंटच्या लोकांना मॅनेजरने सांगितलं. राजूने आपल्या बिल्डिंगच्या सोसायटीला मला मॉर्गेज लोन पाहिजे त्यासाठी तुम्ही एनओसी द्यावी अशी विनंती करून, मार्गदर्शनासाठी एक अर्ज सोसायटीला दिला होता आणि सोसायटीने तो अर्ज मान्य करून त्याला मॉर्गेजसाठी परमिशन दिली होती. ती कागदपत्रं घेऊन राजू मॉर्गेज डिपार्टमेंटला गेला आणि त्याने लोनसाठी अर्जही केला. स्वत:च्या घराचे पेपर बँकेकडे घाण ठेवून त्याने आपल्या घरावर मॉर्गेज लोन घेतलं. पण लोन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी काही ब्लँक चेकवर त्याच्या सह्या घेतल्या आणि त्याला सांगितलं की तुम्ही जर हप्ते भरले नाहीत, तर सेफ्टीसाठी आमच्याकडे ब्लँक चेक आहेत. बँकेवर विश्वास ठेवून त्याने ब्लॅक चेकवर सह्या केल्या. राजू नियमित हप्ते भरत हाेता. दोन-तीन महिने झाले नाही तो एक बाई आणि काही माणसं राजू राहत असलेल्या सोसायटीत आले व राजूला घर खाली करण्यासाठी सांगितले. राजू म्हणाला की, हे माझं घर आहे. मी खाली का करू? तर त्या बाईने आम्ही बँकेकडून घर विकत घेतले आहे असं सांगितलं, तेव्हा राजूला नेमकं काय झालं आहे तेच कळालं नाही म्हणून तो बँकेकडे गेला. बँकेला म्हणाला मी मॉर्गेज लोन केलं होतं. मी घर कुठे विकलं? त्यावेळी लगेचच मॅनेजरने लोन डिपार्टमेंटला बोलून घेतलं. लोन डिपार्टमेंटच्या त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, याने घर विकलेलं आहे. ताे राज्याला म्हणाला की, तू दारू पिऊन आला होतास, त्यामुळे तुला माहीत नाही. राजू म्हणाला मी दारू पीत असलो तरी मी शुद्धीत होतो. मी मॉर्गेजसाठी अर्ज केला होता. घर विकण्यासाठी नाही. दोन-तीन महिने झाले आहेत. मी माझे हप्ते नियमित भरत आहे. मग माझं घर विकलं कोणी? बँकेतले लोन अधिकारी, तू घर विकलेलंच आहेस, असं ठामपणे म्हणू लागले. त्यावेळी हे सगळं प्रकरणं सोसायटीमध्ये आलं. सोसायटीतल्या लोकांनी पोलीस कम्प्लेंट केली आणि सांगितलं की राजूने आमच्याकडे मॉर्गेज लोनसाठी एनओसी पाहिजे म्हणून अर्ज केलेला होता आणि मॉर्गेज लोनसाठी एनओसी आम्ही दिलेली होती. राजूला घर विकण्यासाठी आम्ही परमिशन दिलेली नव्हती. हा भक्कम पुरावा सोसायटीने पोलीस स्टेशनला दिला व बँकेतील लोन अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्यांनी पोलीस कम्पलेंट केली. बँकेची पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी असं समजले की, लोन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी परस्पर राजूच्या घराचे पेपर त्या स्त्रीला एग्रीमेंट म्हणून देऊन स्वतःच ते घर विकलेलं होतं आणि राजूकडून जे ब्लँक चेक घेतलेले होते, त्या चेकवर रूमची रक्कम आलेली होती ती, स्वतःच परस्पर स्वतःच्या खात्यात वळवली होती, म्हणजेच राजूनी मॉर्गेजसाठी घराचे ओरिजिनल पेपर बँकेकडे मॉर्गेज ठेवले होते. तेच पेपर तिथल्या अधिकाऱ्यांनी घेऊन राजूची रूम परस्पर विकली होती. त्याची कानोकान खबर राजूला आणि सोसायटीला माहीत पडू दिली नाही. पण सोसायटीच्या नियमानुसार लोन घेण्याच्या अगोदर किंवा घर विकण्याच्या अगोदर सोसायटीची परमिशन घेण्यासाठी ज्या वेळी पत्रव्यवहार होतो. तसाच व्यवहार राजूने मोर्गेज लोनसाठी एनओसीसाठी केलेला होता. तो भक्कम पुरावा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध सोसायटी आणि राजूकडे होता, म्हणून आज राजूचं घर वाचलं. लोन अधिकाऱ्याला अटक केल्यावर असं समजलं की, अशाच प्रकारची लोकांची मार्गेजमध्ये आलेली घरं बँकेतले काही विकृत अधिकारी विकत होते. त्यांची एक मोठी साखळीच होती. घेणाऱ्या लोकांनाही वाटत होतं की, बँकेकडून कर्ज घेऊन घेतलेले रूम हप्ते वेळेवर न भरल्यामुळे बँक ते आपल्या ताब्यात घेते व ते दुसऱ्यांना विकते. आशा प्रकारे विकत घेणारे लोकही या जाळ्यामध्ये फसत गेले, म्हणून कोणतेही लोन घेताना किंवा ब्लँक चेक देताना आपण बँकेची व्यवहार कशा पद्धतीने करत आहोत आणि बँक आपल्याशी व्यवहार कशा पद्धतीने करत आहे हे अचूकपणे पाहिलं पाहिजे.
(सत्यघटनेवर आधारित)