Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनचला नव्या वर्षात सकारात्मक जगू या!

चला नव्या वर्षात सकारात्मक जगू या!

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

उद्यापासून नवीन दिवस, नवे वर्ष, नवीन आव्हाने, नवभविष्य आपल्या सर्वांचेच वाट पाहत उभे असेल. आजचा २०२३चा शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवशी जेव्हा आपण उभे आहोत तेव्हा आपसूकच आपले संपूर्ण लक्ष १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या संपूर्ण कालखंडावर जाते. काय गमाविले, काय मिळविले याबाबतीत प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाच्या आठवणी नक्कीच वेगवेगळ्या असतील. कुणासाठी हे वर्ष खूप आनंदाचे, उत्साहाच गेले असेल. कुणासाठी खूप काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील. कुणाच्या आयुष्यात दुःख आले असेल, दुरावा आला असेल, एकांत आला असेल, कुणीतरी गोंधळलेले असेल, कुणाच तरी नियोजन फिस्कटल असेल, तर कोणाला तरी नवा उत्साह मिळाला असेल. अशा प्रकारे प्रत्येकासाठी प्रत्येक क्षण वेगळा गेला असेल, पण या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांना एक अनुभव नक्की आला असेल तो म्हणजे हे वर्ष २०२२ पेक्षा जरा जास्तच वेगाने धावत गेलं आणि या वर्षात त्या वर्षाबरोबर धावताना आपलीही दमछाक झाली. आयुष्यात सतत घडणाऱ्या चांगल्या, वाईट घटनांचा सामना करताना, त्यांचा सामना करताना आपलीही नक्कीच दमछाक झाली.

जग यावर्षी जरा जास्त वेगाने धावत धावू लागलायं असे नक्कीच वाटते. या सरणाऱ्या वर्षाने चांगल्या – वाईट घटना पाहिल्या; आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीयने अगदी आपल्या स्थानिक पातळीवर पण अनेक चांगल्या – वाईट घटना घडल्या. हे सगळं घडत असताना आयुष्याचे हे सगळे अनुभव आपण घेत असताना आपलं मन, आपला मेंदू आणि नकळत आपले शरीर थकून गेलंय याची जाणीव अशा वेळी होते. खूप धावलो, खूप मेहनत केली, खूप कष्ट केले, खूप काम केले की शरीर हे दमणारच. पण कष्ट करणे हे प्रत्येक माणसासाठी उद्याची नवी ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेतूनच त्याचं भविष्य घडत असते, त्यामुळे कामासाठी कष्ट करणे हे नेहमी चांगले असते; परंतु आज-काल अनेक चांगल्या – वाईट घटना आजूबाजूला घडत असतात, समाजमाध्यम अधिक बळकट झालेली असल्यामुळे या घटना आपल्या समोर काही क्षणात येतात, या घटनांचे चांगले – वाईट परिणाम आपल्यावर होत असतात. त्यातही नकारात्मक, वाईट घटना, वाईट गोष्टी प्रकर्षाने समोर येतात किंवा आपले मन सगळ्यांमध्ये अशा गोष्टी अलगद टिपत असते आणि याच प्रमाण वाढले की आपले मन थकत जाते. असाच काहीसा थकवा आपल्याला आला आहे असे वाटत असेल तर यावर नक्कीच विचार करण्याची गरज आहे.

उद्या नवीन वर्ष आहे. नव्या उत्साहाने त्याला सामोरे जायचे आहे. अशा वेळी आपल्या तब्येतीची, आपली, घरातली, आर्थिक, व्यावसायिक, सामाजिक जुळणी करायची असेल तर यासाठी आपले मन अधिक सशक्त असणे आवश्यक आहे. २०२०, २०२१ आणि २०२२ ही वर्ष कोरोनाची वर्ष म्हणून पाहिली गेली. खूप काळाकुट्ट ढगांनंतर २०२३ मध्ये काही आशेची किरणं आजूबाजूला डोकावू लागली होती. २०२४ मध्ये हे चित्र अधिक आशादायी होण्याची गरज आहे. अर्थात २०२४ या वर्षाची सुरुवात करताना आपणही बदललं पाहिजे, आपले विचारही बदलले पाहिजेत. मनावरची नकारात्मकतेची काळीकुट्ट जळमट दूर केली पाहिजेत. त्यातून सकारात्मकतेची सूर्यकिरण डोकावली पाहिजेत. तरच येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना आपण सहज सामोरे जाऊ शकतो. कुठलाही दिवस, कुठलाही काळ आणि वेळ सारखी नसते, प्रत्येक दिवशी ते बदलत असते. सुखाचे काही क्षण असतात, पण सुखामागोमाग दुःख हे येतच असते. जशी भरती पाठोपाठ ओहोटी असते तसेच आपल्या या सुखदुःखांच्या जाणिवांचे असते. अशा वेळेला नव्या वर्षात परिपक्वतेकडे एक पाऊल टाकत असताना या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज आपल्या मनात असणे आवश्यक आहे. खरंतर भौतिक सुखाच्या मागे धावण्याऐवजी आत्मिक सुख कसे मिळेल, समाधान कसे मिळेल, आयुष्यात शांतता कशी मिळेल, एकमेकांशी असलेल्या ऋणानुबंध अधिक घट्ट कधी होतील.

समाज माध्यमांमधील काल्पनिक विश्वापेक्षा प्रत्यक्ष एकमेकांना आपण कसे भेटू, एकमेकांच्या दुःखात कसे सहभागी होऊ याची जाणीव जेव्हा प्रत्येकाला होईल त्यावेळेला आपण आणि आपला समाज अधिक समृद्ध होईल. याची सुरुवात १ जानेवारी २०२४ पासून प्रत्येकाने केली पाहिजे. प्रत्येकाच्या मनात एक रोज नवा सकारात्मक विचार आला पाहिजे. एखादी वाईट घटना घडली तरीही त्यातून त्यात कुढत बसण्यापेक्षा त्यातून नवे पाऊल कसे टाकता येईल, त्यातून पुढे कसे जाता येईल ही जाणीव करण्यासाठी हा विचार मनात येण्यासाठी मन सशक्त करायला पाहिजे. यासाठीच यावर्षी आपण आपल्या मनाची मशागत करूया. त्याच्या माध्यमातून चांगल्या सकारात्मक मार्गाकडे आपण वळू या आणि येणाऱ्या आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ हा चांगला आनंदी आणि समाधानाचा करूया, असा संकल्प करीत आपण नवीन वर्षात पाऊल ठेवूया आणि अन्य संकल्पनांपेक्षा हा संकल्प कायम जपूया. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

anagha8088@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -